Purandra Airport Update : पुरंदर विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा येणार आहे. शेतकऱ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी शासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
सासवड : 02-07-2026
पुरंदर विमानतळ प्रकल्पातील (Purandra Airport Update) शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा देण्यात येणार आहे. तो भूखंड विकसित स्वरुपाचा असणार आहे. रस्त्यासाठी मुबलक प्रमाणात जागा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, फुटपाथ यासाठी जादा जागा लागणार आहेत. त्या जागा वगळून दहा टक्के भूखंड देण्यात येईल, यासाठी आताच जादा जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी शासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेनिमित्त जिल्हाधिकारी सध्या पुरंदरला ठाण मांडून बसले असून, दर सोमवारी थेट शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणींचे निवारण कऱण्यात येत आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी स्तरावरील केसेसचा जागेवरच निपटारा करून लगेच त्यांच्या संमती घेण्यात येत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या पुढील सोमवारी 6 जुलै रोजी भेटून त्यांच्या संमती घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एकुण 3 हजार एकर जागेचे भूसंपादन होणार (Purandra Airport Update)
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागेचे भूसंपादन करण्यात येत असून, जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत 1150 कोटींचे वाटप झाले असून येत्या आठवडाभरात आणखी एक हजार कोटींचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या अंतिम संमती प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्याधिकाऱ्यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले असून त्याद्वारे आणखी 251 हेक्टर म्हणजेच जवळपास 625 एकर जमिनीचे संपादन कऱण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
एकीकडे तीन हजार एकरचे भूसंपादन सुरू असताना पुन्हा नव्याने भूसंपादन होणार असल्याने शेतकरी पुन्हा संभ्रमावस्थेत सापडला आहे. शेतकऱ्यांना 10 टक्के परताव्या पोटी तीन हजार एकर साठी तीनशे एकर जमिनीची आवश्यकता आहे. मग आणखी जवळपास 325 एकर जादा का संपादित करण्यात येत आहे ? असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अतिरिक्त 325 हेक्टर जागा का संपादित कऱण्यात येत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला.
सर्व आराखडा तयार करूनच दहा टक्के परतावा (Purandra Airport Update)
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, तीन हजार एकर पोटी शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा म्हणून 300 एकर जागा देणार आहोत, हे बरोबर आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जागा देणार आहोत तिथे येण्याजाण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता भासणार आहे. रस्त्यांचे योग्य अंतर ठेवून व्यवस्थित प्लॉट पाडण्यात येतील. रस्त्याला लागून ड्रेनेज लाईन, विद्युत व्यवस्था, रस्त्यावरून चालताना फुटपाथ आवश्यक आहे. यासाठी जागेची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्व आराखडा तयार करूनच दहा टक्के परतावा देण्यात येईल. भविष्यात नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची शासन खबरदारी घेत आहे. त्यासाठी जागा जास्त प्रमाणात आताच घेत आहे, असे डुडी यांनी स्पष्ट केले आहे.