Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
मुंबई : 30-04-2026
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर आता आणखी एक मोठी घटना घडत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.
बच्चू कडू यांच्या शिवसनेच्या प्रवेशावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यातच आमदारकीसाठी पक्ष संघटना विलीन करणार नसल्याती ठाम भूमिका बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रहार संघटना विलीन होणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे कडू यांनी स्पष्ट केले होते. प्रहार ही कार्यकर्त्यांनी उभी केलेली संघटना असून, तिचे राज्यभर जाळे आहे. एका पदासाठी सत्तेसोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेतही कडू यांनी यापूर्वी दिले होते. मात्र, आता त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.
या सर्व चर्चेदरम्यान, बच्चू कडू यांनी दावा केला की, प्रहार जनशक्ती संघटनेचे महाराष्ट्राभरात अंदाजे 1 लाख सदस्य आहेत आणि 5 ते 6 लाख दिव्यांग व्यक्ती या संघटनेशी संबंधित आहेत. प्रहार केवळ विदर्भ किंवा अमरावतीपुरता मर्यादीत नाही, तर शिक्षक, कामगार आणि दिव्यांग संघटनांच्या माध्यमातून राज्यात अस्तित्व आहे.
प्रहार संघटना म्हणून कायम राहणार (Bacchu Kadu)
पेरणीपासून ते कापणीपर्यंत चर्चा झाली, दिव्यांगांच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, तो हात असेल तर विरोध का ? असेही कडू म्हणाले. संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे. माझं काम आहे, कार्यकर्ता म्हणून प्रमाणिकपणे काम करणं, जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा, असंही कडू पुढे म्हणाले. प्रहार संघटना राहील, ज्याला सामाजिक काम करायचं आहे, त्यासाठी प्रहार राहील, तर राजकीय इच्छुकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
अनेक मुद्द्यांवर व्यक्त केले मत (Bacchu Kadu)
पेरणी ते कापणीपर्यंतची कामे MRGS च्या माध्यमातून झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. हमीभावाचा मुद्दा आहे. शिंदेसाहेबांनी आमचा विचार केला तर आमचाही प्रस्ताव आहे, आम्ही पदासाठी आमदारकी घेणार नाही. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारे नाही, तर बच्चू कडूची युती मुद्दयाची आहे. आमचे जे काही आहे ते महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावरील भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही एकनाथ शिंदे यांना देऊ, निव्वळ आमदारकीसाठी जावं, एवढा नालायक बच्चू कडू नाही, असेही कडू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.