Pune Religion Conversion Case : धर्मगुरू देवनूर याच्यावर आपल्या प्रवचनातून धर्मांतराचा प्रसार केल्याचा आरोप आहे. देवालय चर्चमध्ये 6 ते 16 ऑगस्ट 2026 च्या दरम्यान चर्चच्या 141 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयोजकांनी आधीच खडक पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती, असे सांगण्यात येत आहे.
पुणे : 13-08-2026
कीर्तनाच्या माध्यमातून धर्मांतराचा ( Pune Religion Conversion Case ) प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ब्रिटिश धर्मगुरू पंकज जेम्स देवनूर याला एक लाख रुपयांचा वैयक्तित जातमुचलका आणि हमी रकमेवर पुणे सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर न्यायलयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायलयात बुधवारी सुनावणी झाली.
‘यातील तक्रारदराने कार्यक्रम हिंदू धर्माचा आहे आणि बॅनरवरील चर्चचे चित्र हे मंदिराचे आहे अशा गैरसमजातून कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कीर्तन, पोवाडा अभंग, भारूड, टाळ, वीणा मृदंग या गोष्टी केवळ एकाच धर्मापुरत्या मर्यादित आहेत या गैरसमजातून ही ‘एफआयआर’ दाखल केल्याते प्रथमदर्शनी दिसून येते.
ख्रिश्चन समाजाच्या कार्यक्रमात सर्वांना खुला प्रवेश होता, याचा अर्थ इतर धर्मातील लोकांना धर्मांतरित कऱण्यासाठी बोलावले होते असा होत नाही,’ असे निरिक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला,’
या प्रकरणात इंग्लडमधील अँग्लिकन एपिस्कोपल चर्च आणि मँचेस्टर येथील मराठी चर्चचे बिशप पंकज जेम देवनूर (मूळ रा.सिद्धनाथवाडी, वाई, सातारा) याच्याविरोधात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा आणि इमिग्रेशन व परदेशी नागरिक कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत, अमित राजू भोसले यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
ही घटना 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पावणेआठ ते सव्वा आठ या वेळेत पंच हौद चौकातील पवित्र नाम देवालय चर्चमध्ये घडली. त्यानंतर फादर देवनूर याने ॲड, विजयसिंह ठोंबरे आणि ॲड.रुपाली ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली.
वर्धापन दिनानिमित्त चर्चमध्ये कार्यक्रम ( Pune Religion Conversion Case )
पवित्र नाम देवालय चर्चमध्ये 6 ते 16 ऑगस्ट 2026 दरम्यान चर्चच्या 141 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयोजकांनी आधीच खडक पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती. निमंत्रण पत्रिकेत कुठेही इतर धर्मातील लोकांचे धर्मांतर कऱण्याचा हेतू असल्याचा उल्लेख नव्हता, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला.
अटींसह जामीन मंजूर ( Pune Religion Conversion Case )
फादर देवनूर यानी दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत खडक पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ नये, कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.