Purandar Airport Land Acquisition : पुणे जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या पुरंदर विमानतळ निर्मितीला आता गती मिळाली आहे. मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांना एकरी किती भाव देणार हे जाहीर केले. त्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात केली.
पुरंदर : 06-05-2026
सासवड (पुरंदर) तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादन बरोबरच शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. केवळ दोनच दिवसात शेकडो एकर जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या संमती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र एकीकडे काही शेतकरी भूसंपादन आणि मोबदल्यासाठी संमती देत असतानाच दुसऱ्या बाजूला स्थानिक शेतकरी अद्यापही आपला विरोध जाहीर करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत संमती देणार नाही अशी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखरपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन कऱण्यात येत आहे. त्यासाठी 1285 हेक्टर म्हणजे तीन हजार एकर क्षेत्रावर विमानतळ प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्यात 3000 एकर क्षेत्र संपादित कऱण्याचे जाहीर करून तेवढ्या क्षेत्राची प्रत्यक्षात मोजणी करण्यात आली आहे.
मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांना एकरी किती भाव देणार हे जाहिर केले. त्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 450 एकर जमिनीचे भूसंपादन झाले. 7 मे पासून 10 जून पर्यंत संमती करारनामा तर 10 जून नंतर सक्तीने भूसंपादन कऱण्यात येणार असल्याते जिल्हाधिकारी दुडी यांनी जाहीर केले आहे. त्यादृष्टीने शासनाकडून अत्यंत वेगाने प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
संमती देण्यासाठी गुंतवणूकदार यांचीच गर्दी (Purandar Airport Land Acquisition)
विमानतळ जागेचे भूसंपादन होत असताना शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रांगा लावल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता प्रत्यक्षात ज्या गुंतवणूकदारांनी जमिनी काही लाखात खरेदी केलेले गुंतवणूकदार आता कोटयावधी रुपयांच्या लालसेने रांगा लावत असल्याचे पहायला मिळत आहे. केवळ गुंतवणूकदार शेतकऱ्यांच्या पुढाकारानेच भूसंपादन प्रक्रिया अत्यंत वेगात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम (Purandar Airport Land Acquisition)
एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विमानतळ जागेचे भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिक सातही गावातील शेतकऱ्यांनी आपला तीव्र विरोध पुन्हा एकदा जाहीर केला आहे. आम्हाला कोणताही मोबदला नको, आम्हाला आमची जमीन पाहिजे, शासनाने यासाठी आमच्यावर जबरदस्ती करू नये. आम्हाला पुन्हा आंदोलन करायला भाग पाडू नये असा इशाराच शेतकऱ्यांनिी शासनाला दिला आहे.