Mayor Manjusha Nagpure : महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र देत पुणे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम कऱण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे : 07-05-206
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यक्षम करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नसरापुर आणि म्हाळुंगे परिसरात नुकत्याच घडलेल्या बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे (Mayor Manjusha Nagpure) यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र देत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम कऱण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे शहरातील सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख चौक तसेत पोलीस चौक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असताना अनेक कॅमेरे नादुरूस्त असल्याचे आढळून आले. काही कॅमेऱ्यांची वॉरंटी संपल्यामुळे ते बंद पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते खोदकामादरम्यान केबल्स तुटल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. तसेच अनधिकृत बांधकामे, होर्डींग्ज आणि टपऱ्यांमुळे कॅमेऱ्यांच्या दृष्टीत अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. महापौर नागपुरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
महापौरांनी काय म्हटले आहे ? (Mayor Manjusha Nagpure)
शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कार्यरत आणि प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यत असल्याचे महापौरांनी अधोरेखित केले आहे. त्यानुसार शहरातील सर्व कॅमेऱ्यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट कऱण्यात यावे, नादुरूस्त कॅमेरे दुरूस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
तसेच सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटिव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री कऱण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच नियमित देखभाल आणि सातत्यपू्रण मॉनिटरींगसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी सूचनाही पत्राद्वारे देण्यात आली आहे. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा आणि त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
नसरापुरातील घटनेचे पडसाद (Mayor Manjusha Nagpure)
1 मेला पुण्यातील नसरापूर येथे झालेल्या बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने, सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काय करता येईल याचाच विचार सध्या सर्व पातळ्यांवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील नसरापुर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका 65 वर्षांच्या नरामधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडलेली आहे. ही चिमुरडी आपल्या आई-वडिलांसह पुण्यात रहात होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ती आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. 1 मेला अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू दाखवायचे आमिष दाखवून, आपल्या सोबत नेले. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही महिलांवर अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल होते. हे प्रकऱण उघडकीस आल्यानंतर, अता सर्वत्रच खबरदारीचे उपाय म्हणून यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.