Saint Mahadamba – The first poetess in Marathi ( Born 1238 AD -Died 1308 AD)

Saint Mahadamba

संत महदंबा – मराठीतील पहिल्या कवीयत्री ( जन्म इ.स.१२३८- मृत्यू इ.स.१३०८ )

भारत हा देश आपल्या सांस्कृतिक परंपरा, कला आणि वैविध्यापूर्ण जीवनशैलीसाठी ओळखला जातो. भारताच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा भाग म्हणजे देशातील विविध भाषांमधील साहित्य आणि ते साहित्य निर्माण करणारे साहित्यकार. या साहित्यकारांमध्ये देशातील संतांना मोठे स्थान आहे. हे संत आणि त्यांचे साहित्य हे देशाचा मोठा वारसा आहे. आज आपण अशाच एका संत कवियत्री विषयी ‘महदंबा’ (Saint Mahadamba) यांच्याविषयी मिसलेनियस भारतच्या या भागात जाणून घेणार आहोत.

कोण होत्या महदंबा ?

महदंबा (Saint Mahadamba)  या मराठीतील पहिल्या संत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. महदंबा या यादव काळात होऊन गेल्या. मराठी भाषेतील पहिल्या कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना ‘महदाइसा’, ‘रूपाईसा’ या नावानेही ओळखले जाते.

संत कवयित्री महदंबा (Saint Mahadamba)  यांच्या विषयी –

संत महदंबा (Saint Mahadamba) यांचा जन्म जालना जिल्ह्यातील रामसगाव येथे झाला. सुरूवातीला त्यांचे कुटुंब सध्याचे पुरी पांढरी, जिल्हा बीड येथे वास्तव्यास होते. नंतर ते रामसगाव येथे रहावयास गेले. महदंबा उर्फ महाईदसा (Saint Mahadamba)  यांचा बालविधवा ते विद्वान संन्यासिनी असा खडतर प्रवास आहे.

आयुष्याच्या या खडतर प्रवासाच्या दरम्यान त्यांनी स्वत:च्या काव्य रचना मांडल्या आहेत. त्या महानुभव पंथातील महत्त्वाच्या अनुयायी होत्या. महदंबा यांचा जन्म इसवीसन १२३८ मध्ये झाला. तर मृत्यू इसवीसन १३०८ मध्ये झाल्याचा उल्लेख आढळतो. महादंबा (Saint Mahadamba)  यांचा उल्लेख १३ व्या शतकातील श्री चक्रधरस्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी म्हणून केला जातो.

त्या या पंथाच्या अग्रगण्य व्यक्ती होत्या. त्यांचे पंथातील स्थान आई सारखेच होते. त्यामुळे सर्वजण त्यांना ‘आऊ’ असे संबोधत होते. महादाईसाचे (Saint Mahadamba)  घराणे विद्वानांचेच होते. त्याकाळी लहान वयात विवाह करण्याची पद्धत होती. त्याप्रमाणे त्यांचाही विवाह लहान वयातच झाला होता. परंतु त्यांच्या पतीचे निधन लवकर झाल्याने बाल वयातच त्यांना वैधव्य आले.

त्यानंतर त्या वडिलांकडे राहण्यासाठी आल्या. या काळात त्यांना परमार्थाची ओढ लागली. दादोस यांच्या त्या शिष्या झाल्या. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने पुढे जात होत्या. या काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. त्यांनी अनेक पुरुष, स्त्रियांना या पंथात सहभागी करून घेतले. हा पंथ संन्यासाला प्राधान्य देणारा होता. त्यांचे नियम कठोर आणि कडक होते. तरीही त्यांचा आचारधर्म महदाइसेने (Saint Mahadamba)  स्वीकारला होता. हे संन्यासिनीचे जीवन जगताना चक्रधर स्वामींच्या भक्तीत त्या रममाण झाल्या होत्या.

चक्रधर स्वामींची महती –

श्री चक्रधर स्वामींना कलियुगातील परमेश्वराचा अवतार समजले जाते. त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. चक्रधर स्वामींना जसे अध्यात्माच्या क्षेत्रात फार मोठे स्थान आहे, तसेच समाजसुधारणेच्या क्षेत्रातसुद्धा त्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा जन्म गुजरातमधील भडोच येथे शके ११४२च्या भाद्रपद महिन्यात झाला.

पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कृतीपूर्ण घटना घडल्या. त्यांनी संन्यास घेऊन अनेकवर्ष एकाकी भ्रमण केले आणि त्याकाळचे लोकजीवन जवळून पाहिले. त्यातून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांनी त्यांच्या प्रवचनातून वैदिक परंपरेला नाकारून स्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार आहे असे सांगितले.

त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला चरित्रग्रंथ म्हणून ओळखला जातो. चक्रधरस्वामींचे रामदेव दादोस हे प्रमुख शिष्य होते. त्यांच्यामार्फत पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा महादाइसा (Saint Mahadamba), उमाइसा इत्यादी शिष्यपरिवार मिळाला.

संत महदंबा यांच्या काव्याविषयी –

महदंबा (Saint Mahadamba)  यांच्या मध्ये असलेली काव्याची ओढ या काळात जागी झाली. त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होती. त्यामुळे भक्तीतून येणारे काव्य साकारण्याचे कार्य त्यांच्याकडून घडले. महदाइसा उर्फ महदंबा (Saint Mahadamba)  यांना श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती. त्या स्वत: विदग्ध पंडिता नव्हत्या. त्यामुळे त्यांचे त्यांच्यासमोर असलेले साहित्य हे जात्यावरच्या ओव्या, त्याकाळी सांगितल्या गेलेल्या कथा, स्त्रीगीतं, कहाण्या अशा स्वरूपातच होत्या.

परंतु त्यांनी महानुभव पंथाचे तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांच्या असलेल्या जिज्ञासू वृत्तीतून केला होता. त्यांना या पंथाबाबत पडलेल्या प्रश्‍नांचे निरसन त्या चर्चा करून पडलेले प्रश्‍न विचारून करून घ्यायच्या. त्यांनी रचलेल्या काव्यामधून सांप्रदायिक तत्वज्ञानही मांडले आहे. महादंबा यांच्या रचना या सहज, सुंदर सोप्या शब्दात आणि लगेचच समजतील अशा साध्या होत्या.

महदंबा (Saint Mahadamba)  यांच्या रचना या अतिशय साध्या आहेत. त्यांनी ‘धवळे’, ‘मातृकी रुक्मिणी स्वयंवर’, ‘गर्भकांड ओव्या’, स्फुट ओव्या, आरती अशा त्यांच्या रचना आहेत. परंतु या व्यतिरिक्तही त्यांच्या रचना आहेत, परंतु त्याबाबतचे साहित्य उपलब्ध नसल्याने त्या प्रकाशझोतात नाहीत.

‘धवळे’ अजरामर रचना प्रकार –

चक्रधर स्वामींचा विहार राज्यभर असायचा. त्यामुळे त्यांच्या अनुज्ञेनेच महदाइसा गोविंदप्रभू यांच्याजवळ रहात असे. गोविंदप्रभूंनी महदाइसा यांना ‘वर’ (नवरा) विषयक गीते म्हणण्यास सांगितले. त्यांनी गायलेल्या गीतांमध्ये विवाहाच्या आरंभापासून अखेरपर्यंतचे वर्णन आढळून येते. याशिवाय कृष्णाची करवली म्हणून महदाइसा यांना गीते म्हणावयास सांगितली होती.

हीच गीते महानुभाव सांप्रदायात प्रसिद्ध आहेत. विवाहावेळी ‘वरा’ विषयी म्हणण्याची गाणी म्हणजे ‘धवळे’ हा वाङमयीन प्रकार महदाइसा यांनी अजरामर केला आहे. महदाइसा यांचा ‘धवळ्‍या’चा मुख्य विषय रुक्मिणी स्वयंवराचा आहे. त्यांनी रचलेल्या या प्रकारामध्ये आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग मांडलेला आहे. पूर्वार्धात ८३ ओव्या आहेत. उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन त्यांनी ६५ कडव्यांमध्ये स्वयंवराचे वर्णन त्यांनी केले आहे. यातून त्यांचे शीघ्रकवित्व दिसून येते.

या अख्यान काव्यात द्वारकेचे वर्णन महदाइसा असे करतात ‘कौडी संख्या कळस तेथ मीरवताय गगन सुदेवो म्हणे वानु नेणीजे हे रचना अमरावती सत्यलोक कैलास होय वैकुंठ भुवन त्याहीहूनि सहश्रगुणी बरवी द्वारका कृष्णरायाचे कृ (क्री)डास्थान।। ‘मातृकी रुक्मिणी स्वयंवर’च्या आरंभीच्या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण, दत्त, चक्रपाणी, गोविंदप्रभू, चक्रधर यांचे स्मरण करण्यात आले आहे.

यामध्ये विविध व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यात आले आहे. कृष्णाचे वर्णन करताना त्या म्हणतात ‘‘कांसे पीतांबर कंठी कुंदमाळा। कांतु शोभे सावळा रुक्मिणीचा।।’’ याशिवाय कृष्णाला पाहताच रुक्मिणीची झालेली अवस्थाही महदाइसा यांनी सविस्तरपणे वर्णन केली आहे. इतकेच नव्हे तर कृष्ण रुक्मिणीचा एकांतातील शृंगारही ओव्यांतून त्यांनी रंगविला आहे.

या काव्याचा आवाका छोटा आहे पण त्यामध्ये गतीमानता, उत्कटभाव, व्यक्तिचे केलेले रेखाटन मनाला भावणारे आहे. हे रुक्मिणीस्वयंवर ओव्यांमध्ये पूर्ण होताना महदाइसा म्हणतात ‘‘वाखाणीले गीत माहादाई कींकरी देवा कृपा करी भक्तिभावे।’’

महदंबेच्या ‘गर्भकांड’ ओव्या

‘गर्भकांड ओव्या’ हे महदंबा (Saint Mahadamba)  यांनी लिहिलेले आध्यात्मिक स्वरूपाचे छोटेसे प्रकरण आहे. त्यांचे महानुभाव संप्रदायात स्थान महत्त्वाचे होते. त्यांनी पंथाचे नियम सांभाळून मठव्यवस्था पाहिली आहे. मठामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांची उठबस त्या करायच्या. चक्रधर स्वामींचा पूजावसर त्या सांभाळायच्या. त्यांच्यासमवेत असलेल्या सन्यासिनींना योग्य मार्गदर्शन त्या करायच्या. पंथाची शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले आहे.

चक्रधर स्वामींवर निष्ठा –

महदाइसा (Saint Mahadamba) यांची गुरूंवर अर्थात चक्रधर स्वामींवर निष्ठा होती. त्यांनी स्वामींना संन्यास दीक्षा देण्यास सांगितले. परंतु महदाइसा यांच्या वडीलांना त्यांनी संन्यास घेतल्याचा निर्णय आवडला नाही. त्याकाळी स्त्रियांनी संन्यास घेणे हे रुढीप्रिय तर नव्हतेच शिवाय समाजमान्यही नव्हते. त्यातच ब्राह्मण समाजातील एका विद्वान घराण्यातील स्त्रीने संन्यास घेणे हे समाजमान्य नव्हते. परंतु त्या काळात एका सामान्य स्त्रीने हे धैर्य दाखविले.

महदंबेच्या (Saint Mahadamba)  प्रश्‍नांनी व्यापलेले ‘लीळाचरित्र’

‘लीळाचरित्र’मधून महदंबेच्या (Saint Mahadamba)  व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा दिसून येतात. त्याचा अधिकाधिक भाग त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनी व्यापलेला आहे. वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्‍न त्यांनी विचारले आहेत. महदंबा (Saint Mahadamba)  चक्रधरांमध्ये बाप, भाऊ अशी विविध रूपे पाहते. त्यांच्या संवादातून मिळालेली माहिती ‘लीळाचरित्र’मध्ये वाचावयास मिळते. या माध्यमातून मांडलेले महदंबेचे (Saint Mahadamba)  चित्र हे ज्ञानाभिलाषी तपस्विनीचे असल्याचे दिसून येते.

अशा या संत महदंबा यांच्या विषयी आणखी अभ्यास होणे आवश्यक वाटते. संत परंपरेतील अशा या महान स्रीचे स्मरण साहित्यविश्वाला आणि अध्यात्मिक जगाला कायम होत राहिल हे निश्चित.

  • तनिष्का डोंगरे

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!