Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi Sthal – Vadu – Tulapur (Born – 14 May 1657 – Died – 11 March 1689)

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ – वढू – तुळापूर  (जन्म – १४ मे १६५७ – मृत्यू – ११ मार्च १६८९ )

ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधी ‘तुळापूर’ या ठिकाणी आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज व त्यांचा मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले होते. तो काळा दिवस होता  ‘११ मार्च १६८९’. औरंगजेबाने शंभुराजांचा अनन्वित छळ करून त्यांचा अंत घडवून आणला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते नदीच्या परिसरात टाकले. पुढे याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मृती स्थळ बांधण्यात आले आहे.

Chatrapati Sambhaji Maharaj

तुळापूर नावाचा इतिहास व माहिती.

पुण्यापासून हे ठिकाण ३२ किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे.आजचे तुळापूर असणारे हे गाव पूर्वी या गावाचे नाव ‘नागरगाव’ असे होते. शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर मुरारजगदेव यांनी या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या चोवीस तुळा दान केल्यामुळे या गावाला तुळापूर असे नाव पडले. तुळापूरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आळंदीपासून येणाऱ्यांना १४ कीलोमीटरचा प्रवास करावा लागतो तर पुणे शहरातून ३० किलोमीटरवर हे ठिकाण आहे. येथे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांचा संगम झालेला आहे. श्रीक्षेत्र आळंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व तीची उपनदी भामा या तीन नद्यांचा संगम तुळपूर येथे झाला आहे.

Chatrapati Sambhaji Maharaj

“वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजूनी दात” ….

या एका ओळीनेच खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे. आणि याच ओळी प्रतित होतील असे शिल्प येथे तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे. गेल्यावर समोरच हे दृष्य आपल्याला दिसते. आणि मनाला शौर्याचा संदेश देते. या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगा मागची कथा अशी की, रायगडाच्या पायथ्याशी ‘सांदोशी’ नावाचे जंगल होते. तिशे शंभू राजांनी सिंहाशी झुंज दिली होती. त्याचा जबडा हाताने फोडून ठार केले होते. याच घटनेवर आधारीत हे शिल्प आहे. याची उंची सुमारे आठ फूट आणि लांबी दहा फूट आहे.

आत जाताच विविध प्रकारच्या झाडा-झुडुपांनी, निसर्गरम्य वातावरण अनुभवास येते. येथे पाऊल ठेवताच, शंभू राजांचे शौर्य आठवून आपले मन संमिश्र भावनांनी भरून येते. थोडे आत जाताच थोड्या  अंतरावर एका कंपाऊंडच्या आत शंभू राजांचा भव्य पुतळा आपल्या नजरेस पडतो. हाती तलवार घेऊन वर आकाशाकडे नजर असणारा हा पुतळा पाहून नक्कीच स्तिमीत व्हायला होते. एका मोठ्या चौथऱ्यावर असणारा हा पुतळा, त्याच्या मागील असणारा भगवा ध्वज आपल्याला स्तंभित करतो.

Chatrapati Sambhaji Maharaj

येथून पुढे जाताच निसर्गरम्य परिसर दृष्टीस पडतो. त्रिसंगमाच्या किनाऱ्यापासून जवळ एक सुंदर संगमेश्वराचे मंदिर आहे. शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्वार करून जिजाऊंच्या हस्ते त्याचे उदघाटन केले होते. रायरेश्वर किल्ल्याच्याही आधी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची नोंद येथे आहे. पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत उभे आहे. हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते.

मंदिराच्या बाहेरच संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) जिथे हत्या झाली त्या ठिकाणी समाधी दिसते. एका कुटिसदृश्य जागेत शंभू राजांचा अर्धपुतळा ठेवण्यात आलेला आहे.समोर मोठ्या समया,फुलांची आरास करण्यात आलेली असते.  त्यांच्या पुतळ्याच्या खाली जमिनीत त्यांचा अस्थिकलश ठेवलेला आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी नतमस्तक होताना डोळे पाणावल्याशिवाय रहात नाही. जाळीदार खिडक्या असणाऱ्या या समाधीस्थळाचे द्वार सहसा बंद असून पर्यटक, इतिहास प्रेमींना दाराच्या बाहेरूनच दर्शन घेता येते.

कवी कलश यांची समाधी.

कवी कलश हे श्री संभाजी महाराजांचे (Chatrapati Sambhaji Maharaj) जवळचे सल्लागार व काव्यसम्राट होते. त्यांनाही संभाजी महाराजांसह याठिकाणी ठार करण्यात आलं होतं. महाराजांच्या समाधीच्या अलिकडे कवी कलशांची समाधी आहे. एका चौकोनी छोट्या चौथऱ्यावर कवी कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे. कवी कलश हे शंभू राजांचे बंधू, सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते. आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली. मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती.

Chatrapati Sambhaji Maharaj

छत्रपति शिवाजी महाराजांसह आग्र्याहून सुटका होताना संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) कवी कलशांशी ओळख झाली होती. त्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत ही मैत्री आबाधित राहिली. त्यांची ही मैत्री जगासाठी एक वस्तूपाठ ठरली. शांत, रम्य संगमेश्वर मंदिर – तुळापूर गावात आणि शंभूराजांच्या बलिदान स्थळाच्या अगदी लगद हे मंदिर आहे. शंकराचे हे प्राचीन मंदिर आहे. कालांतराने याला संगमेश्वर मंदिर अशी ओळख मिळाल्याचे दिसून येते.

इ.स. १६३३ च्या दरम्यान आदिलशाही दरबारातील वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रूद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून या मंदिराची दुरूस्ती करून घेतली होती. येथे काही काळ शहाजी महाराज आणि बालशिवाजी यांचे काहीकाळ वास्तव्य होते. रायरेश्वर किल्ल्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वराज्याची शपथ घेतल्याचेही सांगण्यात येते. या अर्थानेही या स्थळाला मोठे ऐतिहासीक महत्त्व आहे.

तुळापूर आणि वढू बुद्रूकचच्या भूमीचे महात्म्य.

प्रत्येक मराठी माणसाचे काळीज येथे येऊन, येथील इतिहासाची उजळणी करून आरपार हलते. डोळ्याच्या कडा जशा ओलावतात तसेच ऊर अभिमानाने भरून येतो. या सगळ्या भावना असतात त्या आपल्या शूरवीर, पराक्रमी लाडक्या शंभूराजांसाठी….याच भूमीत शंभूराजांनी (Chatrapati Sambhaji Maharaj) आपल्या प्राणांचे बलिदान केले. येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यामुळे या भूमीला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाने या संभाजी महाराजांना कैद करून याच ठिकाणी आणले होते.

येथेच त्यांचा अनन्वीत छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या सगळ्या घटनाक्रमाची साक्षीदार म्हणजे तुळापूरची भूमी होय. फाल्गून अमावस्येला ११ मार्च १६८९ ला संभाजीमहाराजांचा शिरेच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदिच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती. वढू बुद्रूक आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे.

तुळापूरपासून पुढे वढू हे गाव आहे. क्रुरकर्मा औरंगजेबाने जेव्बहा संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) शरिराचे तुकडे करून नदी किनारी टाकले, तेव्हा नंतर गाववासीयांनी आपल्या राजाचे मिळतिल ते अंगे एकत्र करून त्यांचे विधिवत अंतिम संस्कार केले. अशी या आपल्या राजाच्या शौर्याची जीवनगाथा या तुळापुरी श्रांत झालेली आहे. अवघ्या ३२ वर्षांचे हे झंझावाती वादळ अखेर क्रुरकर्मा औरंगजेबाला सळोकीपळो करून शेवटी शांत झाले होते. औरंगजेबाला त्यांनी दिलेल्या शिकस्तीला खरोखर सलाम.

छत्रपती संभाजी राजे !

त्यांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सई बाई यांच्या पोटी ज्येष्ठ शुक्ल १२, शके १५७९ ( १४ मे १६५७ ) ला पुरंदर या गडावर झाला. शंभूराजे दोन वर्षांचे असतानाच सईबाईंचे निधन झाल्याने पुढे राजमाता जिजाऊंनीच त्यांचे पालनपोषण केले. शंभूराजांना (Chatrapati Sambhaji Maharaj) बालवयातच राजकारणाचे धडे दिले. विद्याअभ्यास, शस्त्रविद्या, कारभार,युद्धविद्या यासगळ्यात ते लवकरच पारंगत झाले. त्यांचे संस्कृत आणि हिंदी भाषेवर विशेष प्रभूत्व होते. म्हणूनच त्यांनी कमी वयात त्यानी बुधभुषण हा संस्कृत ग्रंथ लिहीला. ९ वर्षांच्या कारकिर्दित त्यांनी १२८ लढल्या होत्या.

अशा या पराक्रमी राजाची धास्ती औरंगजेबना घेतली नसती तर नवल. औरंगजेब पुरता घाबरून गेलेला होता. त्यामुळेच तो पुर्ण ताकदीनीशी सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजी राजांकडे (Chatrapati Sambhaji Maharaj) त्यावेळी फक्त तीस ते पस्तिस हजार सैन्या होते. विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना वाटेत ते संगमेश्वर येथे थांबले होते. ते साल होते, १६८९. मात्र फंदीफितूरीतून संगमेश्वर येथे मुगल सरदार मुकर्रबखान याने राजांना ताब्यात घेतले. तेथून त्यांची धिंड काढत अत्यंत क्रुरपणे १५ फेब्रुवारी १६८९ यादिवशी पेडगावच्या किल्ल्यात राजांना औरंगजेबासमोर आणण्यात आले.

औरंगजेबाने राजांना धर्म बदलण्याची अट घातली. ही अट लाथाडून राजांनी मृत्यूला जवळ केले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या अत्यंत पवित्र दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहांचे हाल करण्यात आले. मृत्यूसमयी राजांचे वय अवघे ३२ वर्षे होते.

कोणी केले संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार ?

सध्याच्या काळात हा मुद्दा बराच वादग्रस्त झालेला आहे. मात्र आजपर्यंत सांगण्यात आलेला  इतिहास हाच आहे की, वढू गावातील गोविंद महार (गायकवाड ) यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून एका चर्मकाराकडून शिवून घेतले आणि जंगलात नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. आज वढू गावात गोविंद महार यांची साधीशी समाधी बांधलेली आहे. याशिवाय काही समाजाचे, म्हणणे आहे की, गावातील  शिवले देशमुख यांनीच महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) शरीराचे तुकडे शिवून त्यावर अंतिम संस्कार केले आहेत.

मात्र काहींच्या मते राज्यावर अशी बिकट परिस्थीती आलेली असताना सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन राजांचे अंतिम संस्कार केले होते. मात्र या सगळ्या घटनाक्रमात एका स्रीचे महत्त्व सर्वात जास्त म्हणता येईल ती म्हणजे जनाबाई. या स्त्रीनेच नदीवर कपडे धूताना औरंगजेबाच्या हशमांनी राजांचे शरीर नदीकिनारी फेकताना पाहिले होते. तिनेच गावातील लोकांना याची माहिती देऊन जागे केले आणि त्यामुळे पुढे  राजांवर अंतिमसंस्कार होऊ शकले. वढू येथे महाराजांची समाधी आहे जिथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार झाले होते.

अतुल्य पराक्रमी, धर्माभिमानी राजांच्या समाधीला भेट देण्याचा अनुभव निश्चितच प्रेरणादायी ठरतो. अशा या ऐतिहासिक ठिकाणच्या रहिवाशांच्या बोलण्यातून संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) आणि त्यांच्या धर्माभिमानाविषयी आदर, प्रेम, अभिमान जाणवतो. जेव्हा कधी संकटांनी मन निराश होतं, आयुष्याचा मार्ग कठिण वाटायला लागतो तेव्हा आपल्या या राजाच्या समाधी स्थळाला भेट द्यावी आणि येथून निघताना आत्मविश्वास आणि जगण्यासाठीची दुर्दम्य इच्छा शक्ती घेऊनच नतमस्तक होत बाहेर पडावं.

ज्योती भालेराव.

याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

1 thought on “Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi Sthal – Vadu – Tulapur (Born – 14 May 1657 – Died – 11 March 1689)”

Leave a Reply

%d bloggers like this: