Hinjawadi-Shivajinagar Metro 3हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 3 चे उद्धाटन आणखी लांबणीवर, आता एकाच वेळी 16 स्थानके होणार सुरू

Hinjawadi-Shivajinagar Metro 3 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन -3 ची वाट पाहणाऱ्या पुणेकरांची, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

पिंपरी : 24-08-2026 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-3  (Hinjawadi-Shivajinagar Metro 3 )ची वाट पाहणाऱ्या पुणेकरांची, विशेषत: आयटी कर्मचाऱ्यांचे मेट्रोची वाट पहाणे आता आणखी लांबले आहे. पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांचे काम पूर्ण झाले असले तरी, औपचारिक उद्धाटनाची तारीख ठरलेली नाही. दरम्यान, उर्वरित चार स्थानकांच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यामुळे आता 12 ऐवजी थेट 16 स्थानके एकाच वेळी प्रवाशांसाठी खुली होण्याची चिन्हे आहेत.

सुरक्षा मंजुरी आणि कामाची स्थिती (Hinjawadi-Shivajinagar Metro 3 )

पहिल्या टप्प्यातील माण ते बालेवाडी (आर.के लक्ष्मण म्युझियम) दरम्यानच्या 13 किलोमीटर मार्गाला आणि 12 स्थानकांना 23 जुलै रोजीच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. या टप्प्यातील सुमारे 96.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. जिने व अन्य छोटी मोठी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

दुसऱ्या बाजूला. सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय आणि जिल्हा न्यायालय या उर्वरित चार स्थानकांच्या सीएमआरएस मंजुरीसाठी आवश्यक ती कागदपत्रे व डेटा अपलोड कऱण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीनंतर या स्थानकांना मंजुरी मिळताच ती पहिल्या टप्प्याशी जोडली जातील. प्रत्यक्ष उद्धाटन होईपर्यंत सर्व 16 स्थानकांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय घडामोडी आणि उद्धाटनाचा मुहूर्त (Hinjawadi-Shivajinagar Metro 3 )

मेट्रोच्या उद्धाटनाच्या संदर्भात पीएमआरडीए ने मुख्यमंत्री कार्यालयाकडे आधीच पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मेट्रो उद्घाटनाचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींना बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने, दोन्ही दौऱ्यांचा मेळ घालून या मेट्रोच्या उद्धाटनाचा मुहूर्त निश्चित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी  (Hinjawadi-Shivajinagar Metro 3 )

अनेक वर्षांपासून हिंजवडीमध्ये कामासाठी जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे त्यांना मेट्रो सेवेची बरीच गरज आहे. अशावेळी आता औपचारिक उद्धाटनासाठी ही सेवा सुरू होणे आता लांबणीवर पडले आहे. या परिस्थितीवर आयटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दररोजच्या भीषण वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पहिला टप्पा तातडीने सुरू करावा, अशी जोरदा मागणी विरोधी पक्ष आणि आयटी फोरमकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!