Ashadhi Wari palakhi Sohala : राज्यासह पुणे शहराला पावसाने गेल्या दोन दिवसात झोडपले आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून, पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिंपरी : 07-07-2028
पुण्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे (Ashadhi Wari palakhi Sohala) देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले असून, बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. मात्र सलग सुरू असेलल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून, पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
देहू गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच आळंदीत जाण्यासाठी असलेल्या चारही पुलांवर पुराचे पाणी झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नदीकाठावरील पाण्याती पातळी धोकादायकरित्या वाढल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उभारण्यात आलेले स्वागत मंडप, पोलिसांचे टेहळणी नाके, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंडप, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य केंद्रे तसेच अन्नदानासाठी उभारलेली छत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
अनेक सुविधा झाल्या आहेत विस्कळित (Ashadhi Wari palakhi Sohala)
या परिस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या अनेक सोयी-सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. विशेषतः हजारो वारकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अन्नदान व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, अनेक अन्नछत्रे बंद ठेवावी लागली आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पालखी सोहळ्यात होणाऱ्या सर्व दिंड्या आणि वारकरी यांनी सध्या ज्या ठिकाणी आहेत, तेथेच थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केेले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यावर निसर्गाचे मोठे संकट ओढवले असून, प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि स्वयंसेवक युद्धपातळीवर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
वारकऱ्यांसाठी आवाहन (Ashadhi Wari palakhi Sohala)
राज्यभरात पावसाचा कहर झाला आहे. मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असून नदी-नाले आणि बहुतांशा भाग जलमय झाले आहे. तर आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यासह लगतच्या जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी या प्रचंड पावसामुळे इंद्रायणीला पूर आला आहे. परिणामी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.