Dehu Palakhi Sohala : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूनगर पंचायत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध करून संपूर्ण तयारी केली आहे. गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता, निवास आणि आवश्यक सेवांसाठी विविध ठिकाणी फिरती शौचालये व इतर सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
देहूगाव : 05-07-2026
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या (Dehu Palakhi Sohala) पार्श्वभूमीवर देहूनगर पंचायत प्रशासनाने वारकरी भाविकांच्या सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली असून संपू्र्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. भाविकांची दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेता, विविध ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावरील तसेच मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सोसायट्या, धर्मशाळा आणि दिंडी थांबणाऱ्या भागांमध्ये विशेष व्यवस्था कऱण्यात आली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने 1009 फिरती शौचालये उभारण्यात आली असून जर्मन टेंट परिसरात आणखी 100 फिरती शौचालये बसविण्यात येणार आहेत.
सुरक्षा असणार कडक (Dehu Palakhi Sohala)
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी एकूण 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 22 ठिकाणी टँकरची व्यवस्था कऱण्यात आली असून महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशझोत उभारण्यात आले आहेत. इंद्रायणी नदी परिसरात महिलांसाठी स्वतंत्र चेंजिग रुमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येक दिंडीसाठी प्राथमिक उपचार पेटी देण्यात येणार असून आरोग्य व प्रवासासंबंधी कोणतीही मदत आवश्यक असल्यास एकाच ठिकाणी संपर्क कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. स्वच्छता आणि साफसफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त कऱण्यात आले आहे.
वारकरी भाविकांचे स्वागत आणि सेवा कऱण्यासाठी देहूनगर पंचायतीने सर्वंकष नियोजन केले असून पालखी सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्द असल्याचे चित्र दिसून येत आहे.