Chatrapati Sambhajinagar Police Campaign : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध – 4 ‘ अंतर्गत धडाकेबाज कामगिरी करत 13 मुली आणि 4 मुलांसह एकूण 17 हरवलेल्या बालकांचा शोध लावला आहे आणि त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : 25-06-2026
कुटुंबापासून दुरावलेल्या लेकरं आणि त्यांच्या कुटुंबांना ग्रामीण पोलिसांनी (Chatrapati Sambhajinagar Police Campaign) पुन्हा आनंद फुलवला आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन शोध -4 मोहिमेत ग्रामीण पोलिसांनी 13 मुली आणि 4 मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे हरवलेले हास्य, तुटलेला विश्वास आणि विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आली. 8 ते 13 जूनदरम्यान ग्रामीण पोलिसांनी हरविलेल्या व अपह्रत बालकांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवली.
तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया तपास, सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे स्थानके, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणांवरील चौकशी तसेच विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधत प्रत्येक धाग्याचा पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांतून 17 बालकांचा शोध लागला. शोध लागलेल्या 17 बालकांपैकी 11 मुली प्रेमसंबंधाच्या प्रभावामुळे घरातू निघून गेल्याचे निष्पन्न झाले.
दोन मुलींनी रागाच्या भरात घर सोडले होते. मोठे शहर पाहण्याच्या आकर्षणातून तीन मुले घराबाहेर पडली होती, तर आई-वडिलांमधील सततच्या वादाला कंटाळून एका मुलाने घर सोडल्याचे तपासात समोर आले, पोलिस अधिक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, घरातून गेलेले मूल पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परत आणणे हा पोलिसांसाठी आनंद असतो.
इन्स्टाग्रामच्या आभासी जगाचा परिणाम (Chatrapati Sambhajinagar Police Campaign)
चिकलठाणा परिसरातील 17 वर्षीय मुलगी सोशल मीडियाच्या विशेषतः इंस्टाग्राम सक्रिय होती. आणि घरातील शिस्तीबाबत नाराज होऊन घरातून निघून गेली होती. तिच्या सोशल मीडिया खात्यांचा बारकाईने तपास करत पोलिसांनी संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली. त्यातून ती पुण्यातील एका मैत्रिणीकडे असल्याचे समोर आले. समुपदेशनानंतर तिला कुटुंबियांच्या स्वाधीन कऱण्यात आले.
आईं-वडिलांच्या भांडणांचा मानसिक ताण (Chatrapati Sambhajinagar Police Campaign)
करमाड परिसरातील 14 वर्षीय मुलगा घरातील सततच्या वादामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. घर सोडल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहिम राबवून अखेर त्याला मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात शोधून काढले. मुलगा व पालकांचे समुपदेशन करून कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यात आले.
मुंबई पहायची होती, तिघांचा प्रवास दादरपर्यंत (Chatrapati Sambhajinagar Police Campaign)
शिऊर परिसरातील 15 ते 16 वर्षे वयोगटातील तीन मित्रांनी मुंबई पाहण्याच्या उत्सूकतेतून घर सोडले होते. रेल्वे मार्ग, स्थानके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढत दादर रेल्वे स्थानक परिसरातून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अभ्यासाच्या तणावातून मुलीने सोडले घर (Chatrapati Sambhajinagar Police Campaign)
शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 17 वर्षीय मुलगी अभ्यासाच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली होती. पोलिसांनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडे चौकशी करत तिचा शोध घेतला. ती नातेवाईकांकडे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर समुपदेशन करून पालकांच्या स्वाधीन कऱण्यात आले.