Udhampur Bus Accident : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात एक बस दरीत कोसळल्याने किमान 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या भीषण अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू कऱण्यात आले.
उधमपूर : 20-04-2026
जम्मू-कश्मिरच्या उधमपूर जिल्ह्यात (Udhampur Bus Accident) एक बस खोल दरीत कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राम नगर परिसरातील डोंगराळ रस्त्यावरील एका धोकादायक वळणावर बसचा अपघात झाला. या अपघातानंतर आता बचावकार्य सुरू असून घटनास्थळावरून अनेक लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बस एका दुर्गम गावातून उधमपुरकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. लष्कर, पोलीस आणि स्थानिक रहिवाशांची पथके जखमींना वाचवण्यासाठी काम करत असून, एक मोठे बचावकार्य सुरू आहे. अनेक प्रवाशांना जवळच्या रूग्णालयांमध्ये दाखल कऱण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले (Udhampur Bus Accident)
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे आश्वासन दिले आहे. गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ” मी नुकतेच उधमपूरचे डीसी मिंगा शेर्पा यांच्याशी बोललो आहे. मला कानोट गावात तासाभरापूर्वी झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताबद्दल समजले. हा अपघात रामनगरहून उधमपूरला जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक बससोबत झाला”.
सिंह पुढे म्हणाले, ” तात्काळ बचावकार्य सुरू कऱण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. सर्वतोपरी मदत केली जात आहे. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात येईल. गंभीर जखमींना एअरलिफ्ट कऱण्याची व्यवस्था केली जात आहे.”
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक (Udhampur Bus Accident)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भीषण बस अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले.
पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांनी असेही जाहीर केली की, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि प्रशासनाला मदत व बचाव कार्याला गती देण्याचे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत कऱण्याचे निर्देश दिले.