Gas Cylinder Shortage : संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कऱण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी दिले.
मुंबई : 13-03-2026
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक (Gas Cylinder Shortage) वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कऱण्याचे निर्देश संंबंधित यंत्रणांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याची नागरिकांनी निश्चंतता बाळगावी, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध असून युद्घाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन (Gas Cylinder Shortage)
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन कऱण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा त्या समित्यांमध्ये समावेश असेल. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर कऱणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
मुंबई-ठाणे रेशनिंग क्षेत्रात नियंत्रक, रेशनिंग यांच्या नियंत्रणाखाली स्थापन केलेल्या समितीत पोलीस उप आयुक्त आणि उपनियंत्रक (रेशनिंग) समितीत समावेश करण्यात येणार असून मुंबई आणि ठाणे शहरातील सर्व उपायुक्तांशी सह पोलीस आयुक्त (प्रशासन) समन्वय साधणार आहेत. पर्यायी इंधनाच्या वापराची शक्यता तपासण्याते निर्देशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोळसा, रॉकेल आदी पर्यायांचा विचार केला जाणार आहे. तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच जिल्हास्तरीय समित्यांनी हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांसोबत बैठक घेऊन पर्यायी इंधनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत.
आत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने (Gas Cylinder Shortage)
रूग्णालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय शाळा, महाविद्यालयांची मेस, मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना घरगुती, व्यावसायिक गॅसचा पुरवठा प्राधान्याने देण्यात येणार असून अशा संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने देण्यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रमगी निश्चित केला जाणार आहे.
गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरू नयेत. यसाठी दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन तसेच मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय आणि जिल्हा समित्या यासंदर्भातील जबाबदारी पार पाडणार आहेत. समाज माध्यमांवर याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहेत. गॅस बुकिंग ॲप आणि मिस्ड कॉल सेवांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कऱण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. राज्य विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करून तक्रार निवारणासाठी व्हॉटसअप सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आगामी धार्मिक सण व उत्सवांचा विचार करून सार्वजनिक संस्थांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा अखंड ठेवण्यासाठी प्राधान्य राहील. गॅस सिलिंडर पुरवठ्या संदर्भात नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. एलपीजी वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सींना आवश्यक पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज साठी स्थिती व अद्यावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक कऱण्यात आले आहेत
राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही (Gas Cylinder Shortage)
महाराष्ट्रात दररोज सरासरी 9 हजार मेट्रिक टन एलपीजी ची मागणी असते. ही मागणी पू्रण कऱण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले असून,गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन 9 हजार मेट्रिक टनांवरून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंक वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही. घरगुती गॅसची मागणी पूर्ण कऱण्याइतके पुरेसे उत्पादन आणि साठी उपलब्ध आहे. व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चिक कऱण्यात आले आहेत. त्यानुसार रूग्णालये, शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा, सामुदायिक स्वयंपाकगृहे, तसेच शासकीय शाळा व महाविद्यालयांच्या मेस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे. उपलब्ध उत्पादनातून या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.