अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )

Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

मध्ययुगीन भारतात म्हणजे साधारण १३४७ ते १५१८  या काळात दक्षिणेकडील भारतात बहामनी (Bhamani satta) या मुस्लिम सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. अल्लाउद्दीन बहमन शहा (Allaudin Bahaman Shaha)हा त्याचा संस्थापक. पुढे १५१८ मध्ये या सत्तेचे विघटन होऊन त्याची पाच शकले झाली. त्यातून अहमदनगरची निजामशाही (Nijamshahi),वर्हाडातील इमादशाही(Imadshahi),बीदर येथील बरीदशाही(Bridshahi), विजापुरातील आदिलशाही (Aadilashahi) आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही (Kutubshahi) ही सत्ताकेंद्रे प्रस्थापित झाली.

निजामशीहीचा संस्थापक मलिक अहमद निजामशहा याने प्रथम जुन्नर येथे आणि नंतर सीना नदीच्या (sina river) परिसरात आपली राजधानी निर्माण केली. या भागाला त्याने आपल्या नावावरून अहमदनगर असे नाव दिले. त्यानेच या भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली. त्याच्या कल्पनेनुसार हा अंडाकृती किल्ला बांधला गेला. तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती करण्यात आली होती.पुढे हुसेन निजामशहा याच्या काळात १५५९ ते १५६२ या दरम्यान  या किल्ल्याचा विस्तार करण्यात आला .

अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. या १२५ वर्षाच्या काळात या शहराचे आणि या किल्ल्याचे युद्धानीतीसाठीचे  महत्त्व आबाधीत होते. याच्या सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या यामुळे  शत्रुच्या दृष्टिपथात न येण्यासारखी याची बांधणी करण्यात आलेली आहे. या खंदकांमध्ये शत्रुला हल्ला करता येऊ नये यासाठी मगरी सोडण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते.

वर्तुळाकार असणाऱ्या या किल्ल्याला २२ बरूजे आहेत. १८ मीटर उंचीच्या याच्या भींती आहेत. संपुर्ण परीघ सुमारे १.७० किलोमीटरचा आहे.   मलिक अहमद निजामशहाने या बुरूजांना आपल्या कर्तबगार प्रधान, सेनापतींची नावे  देऊन त्यांचा सन्मान केला होता. तटबंदीच्या आत एकुण सहा राजमहाल  होते. सोनमहल,मुल्क आबाद,गगन महल, मीना महल,बगदाद महल अशी त्यांची काही नावे होती.

राजघराण्यातील मुलांचे शिक्षण किल्ल्याच्या आतच होईल अशी सोय येथे करण्यात आली होती. त्यासाठी येथील महालांच्या मध्यभागी एक मदरसा बांधण्यात आला होता. राजसत्तेच्या काळात दिलकशाद आणि हबशीखा अशा इतर वास्तूंची निर्मितीही करण्यात आली. एक संपुर्ण गावच किल्ल्याच्या आत नांदत होते. आता एखाद्या गावाप्रमाणे येथे लोकवस्ती असल्याकारणाने तेवढ्या लोकांच्या अन्न-पाण्याची सोयही करण्यात आली होती. चार मोठ्या विहीरी येथे खोदण्यात आल्या होत्या. गंगा, यमुना,मछलीबाई,शक्करबाई अशी त्यांची नावे होती.

अशा या वैभवसंपन्न किल्ल्याचे अस्तित्व  काळाच्या ओघात लुप्त झाले. मात्र त्याचे अवशेषही आपल्याला त्या काळचा अनुभव देतात. त्याकाळी या शहराला कल्पकतेने वसवण्यात आले होते. त्या भागाला कोटबाग निजामशहा म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो,बगदाद,पॅरिससारख्या शहरांसोबत व्हायची असे उल्लेख इतिहासात सापडतात. आज हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असून, किल्ल्याची बाहेरील भाग, तटबंदी, काही बुरूज,ब्रिटीशांनी केलेल्या अंतर्गत बदलासह उभा आहे.

या किल्ल्याचा इतिहास बराच मोठा आणि त्याची वास्तूवैशिष्ट्येही विपूल आहेत.  पुढील भागात इतिहासातील कोणत्या व्यक्तींनी येथील रक्तरंजीत राजकारण अनुभवले, कोणत्या प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध व्यक्ती येथे कैदेत होत्या आणि कसा हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला हे जाणुन घेणार आहोत.

क्रमशः

ज्योती भालेराव  

1 thought on “अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )”

Leave a Reply

अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )