Table of Contents
यश चोप्रा यांचा स्वित्झर्लंडमधील पुतळा – (2016 )
भारतीय चित्रपट निर्मीतीचा प्रवास फार रंजक आहे. जेव्हा तंत्रज्ञान फार प्रगत नव्हते त्याकाळापासून तंत्रज्ञानाच्या प्रगतीपर्यंतच्या या प्रवासात अनेक दिग्गज चित्रपट निर्माणकर्त्यांचा सहभाग आहे. कलात्मक दिग्दर्शकांचा मोठा वारसा भारतीय चित्रपट व्यवसायाला लाभला आहे. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra). या भारतीय दिग्दर्शकाच्या सन्मानाप्रित्यर्थ्य एक सुंदर पुतळा स्वित्झर्लंडच्या स्वप्ननगरीत वसवण्यात आलेला आहे.
स्विस सरकार तर्फे सन्मान.
यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांचे शुटींग स्वित्झर्लंडमध्ये (Yash Chopra Switzerland) करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडच्या निसर्गसौंदर्यांची ओळख आपल्या चित्रपटांद्वारे भारतीय प्रेक्षकांना करून देण्यात यश चोप्रा यांचे योगदान फार मोठे आहे. या योगदानाच्या सन्मानाप्रित्यर्थ आणि स्वित्झर्लंडचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून त्यांचा हा पुतळा येथे बसवण्यात आला आहे.

कोठे आहे हा यश चोप्रा यांचा पुतळा ?
स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती भागातील एका छोट्या इंटरलेकन या गावातील कँन्टोन बर्न येथील ‘कुरसाल’ गार्डनमध्ये यश चोप्रा यांचा ३५० किलोचा सुंदर पुतळा २०१६ मध्ये उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याची संकल्पना त्यांच्या मुंबई येथील स्टुडियोतील पुतळ्यावरूनच साकार करण्यात आलेली आहे.


कसा आहे हा पुतळा ?
एका सुंदर, विस्तिर्ण बगिच्यात चोप्रा (Yash Chopra) यांचा पुतळा एका कोपऱ्यात उभा आहे. आपल्या भल्यामोठ्या कॅमेऱ्यावर थोडेसे रेलून, आपल्या एखाद्या चित्रपटातील सीनचा विचार करत असलेले, टोपी घातलेले यशजी, अशा पोझमधील हा पुतळा आहे. कॉपर कलर मधील हा पुतळा प्रत्येक चित्रपट प्रेमी भारतीयांच्या अभिमानाचा विषय आहे.
यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या चित्रपटांची भूरळ !
स्वित्झर्लंडमधील बर्फाच्छादित डोंगरामध्ये प्लेन, कलरफूल शिफॉनच्या साडीतील हिरॉईन आणि विविध स्टाईलच्या स्वेटरमधील हिरो गाणं म्हणत, रोमान्स करत आहेत, असे काही बघण्याची सवय भारतीयांना लावली ती यश चोप्रा यांनी. त्यांच्या अनेक चित्रपटांतील गाणी स्वित्झर्लंडमधील इंटरलेकनसारख्या शांत, रम्य गावात चित्रित करण्यात आलेली आहेत. त्यांच्या फासले, चांदणी या चित्रपटांपासून स्वित्झर्लंडचे दर्शन प्रेक्षकांना होऊ लागले होते.
मात्र १९९५ मध्ये त्यांनी निर्मीती केलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाने खऱ्या अर्थाने भारतीय प्रेक्षकांना युरोप आणि स्वित्झर्लंडचे दर्शन घडवले. तो काळ इंटरनेट किंवा सोशलमीडियाचा नव्हता. त्यामुळे चित्रपट हे एकमेक माध्यम होते जे सामान्यांना बाहेरचा दुनिया दाखवत असे. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मीती केलेल्या चित्रपटांना असे एक वेगळे महत्त्व आहे.
यश चोप्रा यांच्याविषयी.
यश चोप्रा (Yash Chopra) हे एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ ला स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये झाला. आणि मृत्यू २१ ऑक्टोबर २०१२ ला झाला. यश चोप्रा (Yash Chopra) यांनी संगीतमय, भावनाप्रधान चित्रपटांची सुरूवात हिंदी चित्रपटसृष्टीत केली. त्यांच्या चांदणी या चित्रपटामुळे सुरेल गाण्यांची नांदी पुन्हा एकदा सूरू झाली. सुरुवातीला आपले आपले मोठे भाऊ बी.आर.चोप्रा यांच्या साथीने त्यांनी धुल का फुल, धर्मपुत्र यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. १९६५ मध्ये वक्त हा चित्रपट आल्यानंतर त्यांना भरपूर यश मिळाले.
त्यानंतर त्यांनी १९७३ ला यश राज फिल्म नावाची स्वतंत्र चित्रपट कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांचे दाग, दीवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिला, मशाल, विजय, चांदणी, लम्हे, दिल तो पागल हैं, वीरजरा अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा त्यांनी निर्माण केलेला चित्रपट. त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा याने दिग्दर्शित केला असला तरी त्यावर यश चोप्रा यांच्या स्टाईलचा प्रभाव नक्कीच जाणवतो.
यश चोप्रा यांना फिल्म फेयर पुरस्काराने चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. २००५ मध्ये त्यांना मानाचा पद्म भूषण पुरस्कार जाहिर झाला. अशा अनेक पुरस्कारासह स्विस सरकारने केलेला त्यांचा सन्मानही खास म्हणता येईल.

तुम्हाला स्वित्झर्लंडला कधी गेलात तर थोडी वाट वाकडी करून, इंटरलेकन येथील यशजींचा हा पुतळा नक्की बघायला जा. मोठे कारंजे, सुंदर बगीचा आणि हा पुतळा तुम्हाला नक्कीच एका वेगळ्या अनुभवाची ओळख करून देईल. हा पुतळा बघून असे जाणवते की मोठी स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरवा. हा पुतळा प्रत्येक भारतीयासाठी त्याचेच प्रतिक म्हणता येईल.
- ज्योती भालेराव
Leave a Reply