Table of Contents
आंतरराष्ट्रीय महिला दिवस – 8 मार्च
आंतरराष्ट्रीय महिला दिवस (Women’s Day) हा दरवर्षी जगभरात 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. महिलांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी सूरू करण्यात आलेल्या या दिवसाने आज भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. आज समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांसह प्रत्येक महिला हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात. असा हा लोकप्रिय महिला दिन कधी सुरू झाला, कसा सुरू झाला याची सगळी माहिती आपण आज ‘मिसलेनियस भारत’च्या आजच्या भागात करून घेऊन.
आंतरराष्ट्रीय महिला दिन (Women’s Day) .
खरं तर ‘महिला दिन’ (Women’s Day) ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तो दरवर्षी कधी साजरा केला जावा हे तेव्हा ठरले नव्हते. जस जशा त्याकाळी महिला एकत्र होत गेल्या, त्यांच्या मूलभूत हक्कांच्या लढ्यासाठी एकत्र यायला लागल्या, त्यानंतर या दिनाची संकल्पना पुढे आली. २८ फेब्रुवारी १९०९ ला न्युयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पार्टीने आयोजीत केलेला महिला दिन हा जगातील पहिला महिला दिन होता.
खरं तर त्याकाळी जगातील कोणत्याही देशातील महिलांना अनेक सामाजिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. महिलांना मतदानासारख्या मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. म्हणूनच तेव्हा युरोप, अमेरिकेतील महिलांनी मिळून सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळ सुरू केली होती. महिला मतदार चळवळ, महिला कामगार चळवळ अशा चळवळींच्या माध्यमातून महिला दिन साजरा करण्याची संकल्पना अंमलात आली.
महिला दिन (Women’s Day) जगभरातील लोकांनी स्विकारून, तो जनमानसात रुजण्यासाठी बराच मोठा कालखंड जाऊ द्यावा लागल्याचे दिसून येते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडात महिलांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी स्रियांनी एकत्र येऊन, १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशनची स्थापना केली होती. मात्र हि असोसिएशन सर्व महिलांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी नव्हती. त्यात कृष्णवर्णीय आणि स्थलांतरित महिलांना वगळण्यात आलेले होते. पुढे
युरोपमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रिय समाजवादी महिला परिषद भरवण्यात येत येऊ लागली. अशी पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद जर्मनीमधील स्टुटगार्ट येथे भरवण्यात आली होती. ते वर्ष होते १९०७. पुढील दोन वर्षात म्हणजे, १९१० च्या कोपनहेगन येथील भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींनी एक विशेष महिला दिन (Women’s Day) दरवर्षी साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
यासाठी अमेरिकन कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटिकन हिने ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकन स्री-कामगार महिलांनी केलेल्या एतिहासिक कामगिरिप्रित्यर्थ, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्विकारला जावा असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि तेव्हा पासून ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. या घोषणेनंतर अमेरिका, युरोप मध्ये सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी अनेक मोहिमा उघडल्या गेल्या.
त्या सगळ्यांना यश येऊन १९१८ला इंग्लड मध्ये आणि १९१९ला अमेरिकेत महिलांच्या या मागणीला यश मिळाले. महिलांच्या या लढ्याला आणि महिला दिन साजरा करण्याला अशा मोठ्या संघर्षाचा इतिहास आहे.
क्लोरा झेटिकन चे महिला दिनासाठीचे योगदान.
क्लारा झेटिकन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती होती. सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्रियांचे कर्तव्य आहे, अशी घोषणा तिने केली होती. त्याचा परिणाम म्हणून ८ मार्च १९०८ या दिवशी न्युयॉर्क मध्ये वस्रोद्योगातील हजारो स्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड संख्येने जमून निदर्शने केली होती.

कामाच्या निश्चित वेळा आणि कामाची सुरक्षितता या त्यांच्या मागण्या होत्या, याशिवाय मतदानाचा हक्क हा लिंग, वर्ण, मालमत्ता, शैक्षणिक पार्श्वभूमी यांच भेदभाव न करता मिळावा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. या कृतीने क्लारा झेटिकन खुप प्रभावित झाली आणि महिलांच्या या कृतीची दखल संपूर्ण जगाने घ्यावी म्हणून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (Women’s Day) म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव तिने मांडला.
१९१७ या वर्षापासून म्हणजे रशियन क्रांतींसारख्या एका महत्त्वाच्या घटनेनंतर ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्या देशामध्येही राष्ट्रिय सुट्टी जाहिर करण्यात आली होती. तेव्हापासून समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
पुढे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जागतिक स्रीवादी चळवळीने ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून स्विकारे पर्यंत तो फक्त डाव्या चळवळीतील लोकांशी संबंधीत दिवस म्हणूनच ओळखला जात होता. मात्र हळूहळू संपूर्ण जगाने या दिवसाला आपलेसे केलेले दिसते.
भारतात महिला दिन (Women’s Day)कधी साजरा कधी सुरू झाला ?
भारतात महिला दिवस सुरू करण्यास बराच उशीर झाल्याचे दिसते. पहिला महिला दिवस मुंबई येथे ८ मार्च १९४३ ला साजरा करण्यात आला. या दिवसाच्या प्रेरणेने पुणे शहरात ८ मार्च १९७१ ला मोठा मोर्चा काढण्यात आला होता. अशाप्रकारे हळूहळू भारतात महिलांनी या दिवसाचे महत्त्व ओळखून आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढण्यास सुरूवात केली.
सुरुवातीला अमेरिका, युरोप मध्ये प्रसिद्ध असणारा हा दिवस जगातील इतर देशांमध्ये पोहोचला. शेवटी १९७५ ला संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतराष्ट्रीय महिला दिन (Women’s Day) साजरा करण्याचे ठरवून, महिलांचे अधिकार मिळवून देणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करून त्याचा हेतू अधिक व्यापक केला.
महिला दिन कसा साजरा केला जातो ?
खरं तर प्रत्येक देशात हा दिवस विविध प्रकारे साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अनेक संस्था, कंपन्या विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार देतात. तर काही ठिकाणी महिला सक्षमिकरणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या हक्कांसाठी विविध कार्यक्रम योजले जातात.
पुढारलेल्या देशांमध्ये महिलांच्या जीवनशैलीमध्ये आणखी सुधारणा, त्यांच्या प्रगतीसाठी नवीन क्षेत्र खुले कसे होतील याचा विचार केला जातो, तर जगातील असे अनेक देश आहे जे आजही विकसनशील आहेत, त्या देशांमध्ये महिलांच्या सबलिकरणासाठी काय करता येईल याचा विचार केला जातो.
तेव्हा जगातील सर्व महिलांसाठी, मिसलेनियस भारतच्या वाचकांसाठी महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा….
- ज्योती भालेराव