ST Bus Fare Hike : सध्या अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहेत. दूध, पेट्रोल, सीएनजी अशा अनेक वस्तूंचे दर वाढवण्यात आले आहे. अशातच सर्वसामान्यांच्या प्रवासाची सोबती असणाऱ्या एसटी बस प्रवासाचे दरही वाढणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
मुंबई : 18-05-2026
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. भारतात अनेक वस्तूंचे दर वाढवण्यात येत आहेत. प्रथम दूधाच्या, त्यानंतर सीएनजीच्या, पेट्रोल व डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. याच दरम्यान आता सर्वसामान्यांच्या चिंतेत आता आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. सामान्यांच्या प्रवासाची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटी बसचे ( ST Bus Fare Hike) भाडेदरही वाढणार असल्याचे संकेत, खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
डिझेलच्या दरवाढीमुळे राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर अंदाजे 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. परिणामी, एसटी बसचे भाडे वाढणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रताप सरनाईक यांनी एक ऑनलाईन बैठक घेतली होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बस भाडेवाढीच्या शक्यतेचे संकेत दिले आहे.
एसटीला सरकारक़डून किती निधी मेिळतो ? ( ST Bus Fare Hike)
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी बस प्रवासात महिलांना दिल्या जाणाऱ्या सवलतींना राज्य सरकार निधी पुरवते. तसेच. दिव्यांग आणि समाजातील विशिष्ट घटकांच्या मोफत प्रवासाचा खर्चही सरकार उचलते. सरकार 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास खर्च देखील देते.
मात्र, एसटी कॉर्पोरेशनने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेन वाटचाल केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नवीन बस खरेदी, बस स्थानकांचे बांधकाम, तसेच दुरूस्ती आणि सुधारणा यांसारख्या प्रकल्पांसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य घेतले जाते. याचदरम्यान परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, एसटीची भाडेवाढ पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. 31 मे पर्यंत कोणतीही भाडेवाढ होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.
2035 पर्यंत सर्व बस इलेक्ट्रॉनिक करण्याचे उद्दिष्ट ( ST Bus Fare Hike)
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, 2035 पर्यंत एसटी कॉर्पोरेशनच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक बसेसमध्ये रुपांतरीत कऱण्याचे उद्दीष्ट आहे, सध्या 8,000 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत, परंतु भविष्यात इलेक्र्टिक बसेस खरेदी कऱण्यावर भर दिला जाईल. या उद्देशान, राज्यभरातील एसटी कॉर्पोरेशनच्या 200 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बसवण्याची प्रक्रियाही सुरू कऱण्यात आली आहे.