pune Sinhagad Fort : पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगड किल्ल्यावरील 20,000 चौरस फूटांहून अधिक बेकायदेशीर बांधकामे पाडून किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य जपले आहे. राज्याच्या गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी गड 29 मे पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो आता 5 जून पासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.
पुणे : 2025-06-04
पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी आणि किल्ल्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या आत गडावरील (Sinhagad Fort )सुमारे 20 हजार स्क्वेअर फुटांवरील अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली. यामध्ये आरसीसी आणि दगडी बांधकामांचा समावेश आहे. राज्याच्या गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत, सिंहगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी गडावरील पर्यटन 29 मे पासून बंद होते. ते आता 5 जूनपासून पुन्हा पुर्ववत होणार आहे.
पर्यंटकांसाठी किल्ला होता तात्पुरता बंद, 5 जून पासून पर्यटकांसाठी खुला
सिंहगडावरील (Sinhagad Fort )कारवाईदरम्यान पर्यटकांना काही इजा होऊ नये, कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी गुरूवारपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद होता. तो आता पुन्हा 5 जून पासून सुरु करण्यात येणार आहे.
पुणे प्रशासनाकडून करण्यात आलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी सिंहगडावरील कारवाई म्हणता येईल. विशेष म्हणजे नरवीर तानाजी मालसुरे यांच्या समाधास्थळाकडे जाणाऱ्या मुख्य पायी मार्गावरील विनापरवानगी उभारण्यात आलेल्या अरसीसी इमारतींची बांधकामेही पाडण्यात आली आहेत.
राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी
राज्य सरकारने राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मे पूर्वी काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने अतिशय गोपनीयता बाळगत गुरूवारी सकाळी गडावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरूवात केली होती. जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या समन्वयाने ही धडक मोहीम राबवण्यात आली. ज्यामुळे सिंहगड आता अतिक्रमणमुक्त झाला आहे.
सिंहगडाचे ऐतिहासिक पावित्र्य राखण्यासाठी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी भविष्यात गडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना कठोर आदेश दिले आहेत. डॉ. माने यांनी सर्व विभागांना भविष्यात यावर लक्ष ठेवण्याचे आणि अतिक्रमण रोखण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे आता सिंहगडाचे ऐतिहासिक पावित्र्य जपले जाणार असून, पर्यटनाला सुयोग्य चालनाही मिळणार आहे.
Leave a Reply