“Maheshwar” Punyashlok Ahilyabai Holkar’s Capital – (Born 31 May 1725 – Died 13 August 1795)

“महेश्वर” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी – (जन्म ३१ मे १७२५ -मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ )

महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताला आपल्या अलौकिक राज्यकारभार आणि न्यायबुद्धीसाठी वंदनीय ठरणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला तरी त्यांची राजकीय कारकिर्द उत्तरप्रदेशातील इंदौर, महेश्वर याठिकाणी बहरली. त्यांनी महेश्वर ( Maheshwar) याठिकाणी होळकर संस्थानाची राजधानी वसवली. राज्यकारभारासह त्यांनी याठिकाणी अनेक मंदिरांची स्थापना करून एक प्रकारे पर्यटन विकसीत केले. अहिल्याबाईंच्या या महेश्वरची सैर करणे खरोखर एक अविस्मरणीय सहल ठरते.  

Maheshwar

महेश्वरमधील ( Maheshwar) मंदिरांचे वैभव.

भारतीय संस्कृतीतील मंदिराचे वैभव पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येत असतात. मंदिरातील दगडावर कोरीव काम करून साकारलेल्या मूर्ती तसेच नक्षीकाम हे कायम मनाला भुरळ घालणारे असते. त्यामुळेच तर हेमाडपंथी धाटणीचे मंदिर म्हटले की, त्याची कलाकुसर पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये कोरीवकाम पहावयास मिळते. या कोरीव कामाचे वैभव पाहण्यासाठी मध्य प्रदेशातील महेश्वरची ट्रीप नक्की करावी लागेल.

Maheshwar

अहिल्यादेवींनी साकारलेले मंदिर हे त्यांच्या भक्तीचे प्रतिक.

महेश्वर ( Maheshwar) येथे नर्मदा किनारी उभारण्यात आलेले महादेवाचे भव्य मंदिर आणि त्याची कलाकुसर नजरेत एका क्षणात भरणारी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी घडविलेले मंदिर हे, त्यांची महादेवावर असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी अहिल्यादेवींच्या महालासमोरून मार्ग आहे. अहिल्यादेवींचा महाल पाहण्यासाठी जाताना पुढे आपण डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत याची कल्पनाही आपल्याला नसते.

Maheshwar

चांदीचे टाक आणि देव्हार्‍याने वेधले लक्ष.

एका मोठ्या प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर महाला समोर आपल्याला दिसते ती अहिल्यादेवींची हातात पिंड असलेली उभी मूर्ती. अहिल्यादेवींच्या महालात त्यांनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. तर त्यांचा देव्हाराही येथे पाहायला मिळतो. या देव्हार्‍यातील देव वेगळ्याच धाटणीचे असल्याचे दिसून येते. तर चांदीचे देव, टाक पाहून आपसूकच आपले हात जोडले जातात. अहिल्यादेवींनी तयार केलेली शिवलिंगेही येथे पहायला मिळतात.

महेश्वर ( Maheshwar) विषयी.

मोठे घाट, मंदिरं यांसाठी वाराणसी प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेशमधील वारानसी म्हणून महेश्वर या ठिकाणाची ओळख आहे. येथेही वाराणसी प्रमाणेच काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. मात्र येथे वाराणसी प्रमाणे गर्दी गोंगोट नाही. येथे अनेक महाल, मंदिरं, घाट आपलं लक्ष वेधून घेतात. नर्मदा किनारी वसलेले महेश्वर ( Maheshwar) भटकंती करणाऱ्या प्रत्येकाचे आवडते ठिकाण ठरू शकते.

सुबांधु नावाच्या राजाने या नगरीची स्थापना केली होती. पुढे जाऊन इंदौरचे शासक असणाऱ्या होळकर घराण्याने त्यांची राजधानी म्हणून महेश्वरला पसंती दिली. अहिल्याबाई होळकरांनी महेश्वरसह ( Maheshwar) देशातील अनेक मंदिरांचा जिर्णौद्वार केला. नर्मदा नदीच्या किनारी विस्तृत घाटांची निर्मीती केली. महेश्वरचे प्राचिन नाव महिष्मती होते असेही सांगण्यात येते. या शहरात एक असिम शांतता नांदते.

येथे होळकर किल्ला, राजवाडा, राज राजेश्वर मंदिर, नर्मदा घाट, काशी विश्वेश्वराचे मंदिर, अनेक महात्म्यांच्या स्मृतीत बांधलेल्या छत्री असे बरेच काही पाहण्यासारखे आहे. मात्र ज्यांना ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधे रूची आहे अशांसाठी होळकर महाल आणि आजूबाजूटा परिसर भूरळ घालणारा ठरतो. इतकया अफाट बुद्धीच्या आणि कर्तृत्ववान महिलेचे वास्तव्य ज्याठिकाणी होते ती जागा खरोखर खुपच प्रेरणादायी आहे. येथील भेट त्यामुळेच विशेष ठरते.  

Narmada Parikrama

भव्य मंदिरात कलाकुसरीचे वैभव.

या महाल परिसरात स्थापण्यात आलेले महादेवाचे मंदिर अतिशय भव्य आहे. या मंदिराचे दगडामध्ये केलेले कोरीवकाम विलोभनीय आहे. मंदिर परिसर खूप मोठा असून येथे बांधलेला घाटही भव्य आहे. येथे आल्यावर शिल्पकला आणि कलाकुसरीचे वैभव आपल्या नजरेत आणि कॅमेरात टिपण्याची अनेकांची धडपड सुरू असते. चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी अनेक जण ही जागा निवडतात. तर नर्मदा किनारी असलेला घाट सेल्फी पॉइंट होत आहे. येथे नर्मदेचे पात्र मोठे आहे. या मंदिरात हत्ती, घोडे, विविध देवी-देवता, रक्षक तसेच फुले-पानांची नक्षी कोरण्यात आली आहे. 

इतर राज्यातील मंदिरांच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव – अहिल्यादेवींनी केवळ मध्यप्रदेशातच  नव्हे तर भारतातील इतर राज्यातही अनेक मंदिरे, घाट, पाणपोई, विहिरींचा जिर्णोध्दार केला आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, गुजराथ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विविध गावातील मंदिरे, घाट, पाणपोई, विहिरींचा जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे अनेक मंदिरांच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव कोरले गेले आहे. 

विश्वाच्या कल्याणार्थ कोटी लिंगार्चनाचा संकल्प.

चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील अहिल्यादेवी यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला. त्यांनी आपल्या जीवनात प्रजेच्या कल्याणासाठी अनेक बाबी केल्या. आपल्या भक्तीच्या मार्गातूनही त्यांनी प्रजेचे हित जोपासले. प्रजेच्या कल्याणासाठी एका पाटावर १३२५ शिवलिंग असे १०८ पाट तयार करून त्यांचे उद्यापन करण्याचा संकल्प सोडला होता. त्यांच्या पश्चात आजही हा संकल्प सुरू आहे. अहिल्यादेवींनी विश्वाच्या कल्याणार्थ कोटी लींगार्चनाचा सोडलेला संकल्प तिथल्या नागरिकांनी अविरतपणे सुरू ठेवला आहे. 

महिलांना खुणावते बाजारपेठ.

महेश्वरला आल्यानंतर नौकाविहार करण्याचा आनंदही आपल्याला घेता येतो. मंदिरातून नदीच्या बाजूला जाताना आणि पायर्‍यांचा घाट उतरून नदीपात्र लागते. निळेशार पाणी ओंजळीत घेऊन आपल्या चेहऱ्याला लावल्यावर आलेला सगळा क्षीण निघून जातो. तर नौकाविहारासाठी नावाडी सज्ज असतात. याशिवाय येथील महेश्वर सिल्कच्या साड्यांच्या खरेदीचा आनंद मोठा आहे. या साड्यांची येथे बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे महेश्वर सिल्कचे कलेक्शन आपल्या साड्यांमध्ये केल्याशिवाय महिलांना महेश्वरची ट्रीप पूर्ण झाल्याचे वाटत नाही.

महेश्वर ( Maheshwar) साडीचा इतिहास.

महेश्वर आणि येथील प्रसिद्ध साडी यांचे अतुट नाते आहे. हस्तकलेचा ही साडी म्हणजे एक उत्तम नमुना आहे. महेश्वर हे यासाठीटे जन्मस्थळ आहे. सुरूवातीला ही साडी फक्त रेशमी धाग्यांमधे विणली जात, मात्र काळानुरूप त्यात बदल करत आता ती सुती धाग्यांमधेही विणली जाते.

महेश्वर ( Maheshwar) साडीच्या निर्मीतीचा इतिहास बराच रंजक आहे. होळकर वंशाच्या शासक अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. एकदा त्यांच्याकडे शाही पाहुणे येणार असल्याने त्यांना खास भेटवस्तू स्वरूपात साडी देण्यासाठी अहिल्याबाईंनी सुरत, माळवा, हैदराबाद आदि शहरांमधून विणकर बोलावले. त्यांच्याकडून विशेष साडी विणून घेताना अहिल्याबाईंनी त्यांच्या नक्षिकामात विशेष लक्ष दिले होते.

हि साडी विणून त्याच्या विशेष ब्रँड तयार करण्यामधे अशा प्रकारे अहिल्याबाई आणि त्याच्या महेश्वर या राजधानीचा वाटा मोठा असल्याकारणाने ही साडी महेश्वर या नावानेच प्रसिद्ध झाली. सुरुवातीला फक्त राजेशाही परिवारांमधे प्रसिद्ध असणारी ही साडी कालांतराने राजे महाराजांचा काळ संपल्याने मागे पडली. मात्र १९७८ मधे होळकर परिवाराने या कलेला परत पुर्नजिवीत करण्यासाठी संस्थेची स्थापना करून तीला परत देशविदेशामधे ओळख दिली. अशाप्रकारे आहिल्याबाईं या उत्तम प्रशालक तर होत्याच मात्र त्यांना कलेचीही किती जाण होती हे समजते.  

महेश्वरमधील ( Maheshwar) अहिल्याबाईंचा महाल, त्यांनी वसवलेली मंदिरे आणि येथील साड्या यांमुळे  महेश्वरच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो. ही सगळी श्रीमंती पाहण्यासाठी एकदा तरी महेश्वरला जायलाच हवे….

तनिष्का डोंगरे

या ठिकाणी भेट जायला कसे जाल ?

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!