Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 3

शिवनेरी गड

 महाराष्ट्रातील शिवनेरी गड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असले तरी, त्या अवशेषांवरून त्याचे वेगळेपण समजते. या किल्ल्याविषयीच्या या काही वेगळ्या गोष्टी आहेत.    

Shivaji Maharaj Shivneri Fort

सात दरवाज्यांची वाट :

 या गडाची सुरक्षा किती भक्कम होती याचा पुरावा गडावरील सात दरवाजे देतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. आपण जसे जसे पुढे गडावर चालत जावू तसे आपणास जुन्नर परिसरातील असलेल्या लेण्याद्रीची लेणी गडाच्या उत्तर बाजूस दिसू लागतात. 

अंबरखाना :

 शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गडावरती ज्यावेळी वस्ती होती त्यावेळी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. आता या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेची कल्पना येते.

कोळी चौथरा : निजामशाहीच्या पाडावानंतर आदिलशाहीचे आणि मोगलांचे त्यांच्या सीमावर्ती भागाकडे थोडेसे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी  मोगलांनी महादेव कोळ्यांवर आक्रमण करून, शिवनेरीला वेढा दिला. त्यात महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याचा पाडाव झाला. मुघल सैन्याकडून महादेव कोळी सैनिकांचे अतोनात हाल करण्यात आले. गडाच्या माथ्यावरील चौथऱ्यावर महादेव कोळी सैनिकाचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्यास कोळी चौथरा म्हणतात.

शिवकुंज : अंबरखान्यापासून गडाकडे जाणारा दुसरा मार्ग शिवकुंजाकडे घेवून जातो. या मार्गाने जात असताना वाटेत पाण्याची अनेक टाकी लागतात. त्यात गंगा जमुना टाके देखील आहेत. शिवकुंजाजवळच कमानी मशिद आहे. त्याखाली पाण्याचे टाके आहे. कमानी मशिदीजवळून पुढे चालत गेल्यास हमामखाना आहे. तेथून पुढे उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवजन्म स्थानाची इमारत आहे.

बदामी टाके : शिवजन्म स्थळाकडून कडेलोट टोकाकडे जाताना गोल आकाराचे पाण्याचे ‘बदामी टाके’ आहे. बदामी टाक्याचा संपूर्ण घेर दगडी बांधकामाचा असून, तळास देखील दगड आहे. बदामी टाक्यापासून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकाकडे जातो.

कडेलोट टोक : शिवनेरी किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोक आहे. अपराध्यांना शिक्षा देण्याकरिता कडेलोट टोकावरून त्याचा कडेलोट केला जात असे. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर अगदी जवळ भासतो.

शिवजन्मस्थान असलेला हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात कधीच नव्हता. थेट १७३३ मध्ये शाहूमहाराजांच्या काळात हा किल्ला मराठी सत्तेत आला. 

शहाजीराजांच्या काळात शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार सिधोजीराव विश्वासराव यांच्या मुलीचे शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या थोरल्या मुलाशी म्हणजेच संभाजींशी लग्न लावण्यात आलेले होते.

अशा अनेक वैशिष्ट्यांसह आजही हा गड उभा आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे याठिकाणी खुप चांगल्या पद्धतीने स्वच्छता ठेवण्यात आली आहे. संपुर्ण गड फिरताना ते जाणवते. अगदी गडाच्या पहिल्या दरवाजापासुन ते जाणवते. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने येथे आणखी काही सोयी सुविधा, शिल्लक असणार्या गडाच्या अवशेषांवर नव्याने डागडुजी करण्यात यावी असे मात्र वाटत राहते.

 ज्योती भालेराव.

Leave a Reply