आशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)

देशाचे स्वातंत्र्य, सुरक्षितता आबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाच्या लष्कराचे योगदान सर्वात मोठे आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. तेव्हापासुन आपल्या देशाच्या लष्कराची कामगिरी कायमच गौरवशाली राहिली आहे. लष्कराच्या याच अभिमानास्पद कामगिरीचे प्रतिक आहे अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय.

अहमदनगर जवळ सोलापुर रस्त्यावर शहर इंडियन आर्मड कोअर सेंटरचे मुख्यालय आहे. त्यामुळे इथे लष्कराशी निगडीत असणार्या रणगाडे, तोफगोळ्यांचे तसेच लष्करातील अनेक दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय आहे. १९९४ ला या संग्रहालयाचे उद्घाटन लष्कराचे तत्कालीन जनरल बी.सी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जगातील दुसर्या क्रमाकांचे आणि आशियातील एकमेव असे हे संग्रहालय आहे. वेगवेगळ्या काळात वापरण्यात आलेले गोळाबारूद व रणगाडे या ठिकाणी आहेत. पहिल्या व दुसर्या महायुद्धातील अनेक रणगाडे येथे बघायला मिळतात. त्याची सविस्तर माहिती सुद्धा याठिकाणी देण्यात आलेली आहे.

येथे ठेवण्यात आलेल्या प्रत्येक रणगाड्याचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्यांची माहिती घेताना आपल्याला आपल्या सैन्याच्या पराक्रमाची कल्पना येते. याच ठिकाणी पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाशी निगडीत आठवणींचे वेगळे दालन दोन विभागात साकारण्यात आले आहे. ब्रिटीश व्हॅलेंटाईन २, चर्चिल एमके ७, जपानी पद्धतीचे काही रणगाडे तसेच भारतीय बनावटीचे विजयंता टॅंक असे काही परदेशी तर काही भारतीय बनावटीचे रणगाडे आपल्याला पहायला मिळतात.

दररोज सकाळी ९  सायंकाळी ५ यावेळेत हे अद्भुत संग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते. लष्कराची शिस्त, त्याग, शौर्य समजुन घेण्यासाठी आणि हा अनुभव साठवून ठेवण्यासाठी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला हवी.

ज्योती भालेराव.

Leave a Reply