Modi-Trump Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडावरून परत येत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. नक्की काय चर्चा झाली या दोघांमध्ये? जाणून घेऊयात.
International News : 2025-06-21
जी-7 परिषदेमध्ये सहभागी होऊन कॅनडामधून मायदेशी परत येण्यासाठी निघालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. जी-7 परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांची थोडक्यात चुकामूक झाल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यामुळेच ट्रम्प यांच्या आग्रहास्तव दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. पहलगाममधील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प यांची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मोदींनी पहलगाम हल्ल्यासंदर्भातील माहिती ट्रम्प यांना दिली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. यावेळेस ट्रम्प यांनी मोदींना, भेटीसाठी तुम्हाला अमेरिकेला येता येईल का अशी विचारणाही केली. यावर मोदींनी सध्या तरी अमेरिकेला येणं शक्य नसल्याचं सांगितले.
Table of Contents
ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलणे
मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या प्रतिहल्ल्याची म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना, भारताने केलेला लक्ष्यभेद हा अचूक आणि केवळ दहशतवादी तळांवर करण्यात आल्याची माहिती दिली. या चर्चेदरम्यान भारताने कोणताही प्रस्ताव मान्य केला नाही तसेच भविष्यातही भारताला या विषयासंदर्भात कोणत्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं स्पष्टपणे अमेरिकेला कळवण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री यांनी या चर्चेसंदर्भातील सविस्तर माहिती दिली. मोदींनी ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या शस्रसंधीसंदर्भात अमेरिकेने कोणतीही भूमिका बाजवली नसल्याचं सांगितल्याची माहिती मिस्रींनी दिली.
ट्रम्प यांनी मोदींना दिलं अमेरिका भेटीचं आमंत्रण
यावेळी ट्रम्प यांनी मोदींना, ‘तुम्ही आताच्या आता अमेरिका दौऱ्यावर भेटीसाठी याल का?’ असा प्रश्न विचारला. यावर मोदींनी नम्र शब्दांमध्ये सध्या तरी हे शक्य दिसत नाही असं सांगत हे आमंत्रण तुर्तास बाजूला ठेवलं. मोदींनीच यानंतर ट्रम्प यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं. यावर ट्रम्प यांनी आपण भरत दौऱ्यावर येण्यासाठी उत्सुक असल्याचं मोदींना सांगितलं.
इस्रायल आणि इराण युद्धासंदर्भातही झाली चर्चा
सध्या इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धासंदर्भातही या दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या सध्य स्थितीबद्दलही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. इंडो-पॅसिफिक आणि क्वाड या दोन संघटनासंदर्भातील चर्चाही मोदी आणि ट्रम्प यांच्यात झाली.
खामेनींसाठी ट्रम्प यांची पोस्ट
ट्रम्प यांनी मोदींबरोबर चर्चा करण्याच्या काही तास आधीच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा सूचक उल्लेख करत त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर केली. इरणचे सर्वोच्च नेते कुठे लपलेले आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. मात्र सध्या तरी आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार नसून शहरी भागांमध्ये आणि अमेरिकी लष्करावर मिसाईल हल्ले होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आमचा संयम संपत चालला आहे. मात्र या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सर्वांचे आभार, असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
Leave a Reply