Trisha Sharma Death : लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांतच मृतावस्थेत सापडलेल्या ट्विशा शर्माच्या मृत्यूने संपू्र्ण देशात खळबळ उडवली आहे. सासरच्या लोकांकडून ट्विशाचा मानसिक आणि शारिरिक छळ केला जात होता असा आरोप कुटुंबाने केला आहे.
भोपाळ : 19-05-2026
भोपाळमध्ये झालेल्या त्रिशा शर्माच्या (Trisha Sharma Death) मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. 33 वर्षांची त्रिशा शर्मा 12 मे रोजी तिच्या सासरच्या घरी मृतावस्थेत आढळली. त्यानंतर या मृत्यूविषयी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. सुरूवातीला पोलिसांनी या प्रकऱणाला आत्महत्येचे प्रकऱण मानले होते.
पण ट्विशाच्या आई-वडिलांनी या प्रकरणाला एक वेगळेच वळण दिले. त्यांनी आरोप केला की, तिचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही तर हुंडा आणि मानसिक छळामुळे झाला. पालकांच्या या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण आणखी गंभीर झाले असून पोलिसांद्वारे याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाबाबत ट्विशाचे अनेक चॅटस देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात ती सासरच्यांकडून तिला होणाऱ्या छळाचे वर्णन करत आहे.
मॉडलिंग आणि फिल्म इंडस्ट्रिमध्ये केले होते काम (Trisha Sharma Death)
त्रिशा शर्मा ही उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवाशी होती. तिने MBA मध्ये शिक्षण पूर्ण केले होते आणि यासोबतच मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातही ती कार्यरत होती. दिल्लीमध्ये ती बऱ्याच काळापासून नोकरी करत होती. ‘मिस पुणे’ हा किताबही तिने पटकावला होता. अनेक तेलगू चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. यासोबतच ती एक योग ट्रेनर देखील होती.
2025 रोजी भोपाळचे समर सिंह यांच्यासोबत तिचा विवाह झाला होता. समर सिंह यांची आई गिरिबाला सिंह या माजी न्यायाधिश होत्या. इतक्या प्रतिभावंत घरात लग्न झाल्यामुळे ट्विशा शर्माचे आई-वडील आनंदी होते. मात्र काही महिन्यांतच तिला सासरच्या जाचाला तोंड द्यावे लागले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार 12 मे च्या रात्री त्रिशाने आपल्या सासरच्या घरात फाशी घेऊन स्वतःच आयुष्य संपवलं. या घटनेनंतर तिला रूग्णालयात नेण्यात आले होते तिथे तिला मृत घोषित कऱण्यात आले. त्या रात्री ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात होती आणि तिने घर सोडून जाण्याचं वक्तव्य केले होते.
कुटुंबाने केलेल्या आरोपांनुसार, लग्नानंतर त्रिशाचा मानसिक आणि शारिरिक छळ केला जात होता. ती गरोदर असताना नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर प्रश्न देखील केल्याचा आरोप आहे. आईसोबत त्रिशाचे चॅटस समोर आल्यानंतर या घटनेने नवे वळण मिळाले. यात तिने आपल्यासोबत होणाऱ्या त्रासाचे वर्णन केले. तिने यात म्हटले की, त्या घरात तिला अडकल्यासारखं वाटत आहे.
सासरच्यांचेही त्रिशावर आरोप (Trisha Sharma Death)
दुसरीकडे आरोपी पक्षाने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. सासू, गिरिबाला सिंग यांनी त्रिशाला अंमली पदार्थांचे व्यसन असून ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे. याचिकेत असंही म्हटलं गेलंय की, तिच्या वागणूकीत बदल दिसून आला होता आणि कुटुंबालाही याची माहिती होती. तर त्रिशाच्या वडिलांनी आरोप केले की, प्रभावशाली कुटुंब असल्याकारणाने तपास योग्य पद्धतीने होत नाहीये.
त्यांनी निष्पक्ष चौकशी आणि न्यायालयीन देखरेखीची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबाने अंत्यसंस्कार पुढे ढकलत दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी केली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, जोपर्यंत निष्पक्ष तपास होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.