Chaturmas Mass 2025 : नुकतीच आषाढी एकादशी झाली. गेले महिनाभर महाराष्ट्रात पंढरपूपच्या वारीचे वातावरण होते. आता पंढरपूरच्या या सुंदर प्रवासाचे रिंगण पूर्ण झाले आहे. आषाढी एकादशीचा उत्सव झाल्यानंतर आता चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मास म्हणजे काय ? त्याचे काय महत्त्व आहे आणि या काळात कोणते धार्मिक व्रत-वैकल्य केले जातात ? हे आपण जाणून घेऊ.
लेख : 07/07/2025
चातुर्मास म्हणजे हिंदू धर्माशास्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ आहे. या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. हा चार महिन्यांचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या चातुर्मासात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण , भाद्रपद आणि अश्विन या तीन महिन्यांचे संपूर्ण 30 दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असतात. असा हा संपूर्ण काळ मिळून चातुर्मास असतो.
यावर्षी 6 जुलैला आषाढी एकादशी होती. संपूर्ण वर्षात मिळून एकुण 24 एकादशी असतात, जर अधिक मास आला तर दोन एकादशी जास्त येतात. या सर्व एकादशींमधील महत्त्वाची आणि मोठी एकादशी म्हणून आषाढी एकादशीला महत्त्व आहे. याच एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो.
चातुर्मास म्हणजे काय ? (Chaturmas Mass 2025)
चातुर्मासाची सुरूवात आषाढी एकादशीपासून सुरू होते. मात्र हिंदू धर्मात याला इतके महत्त्व का आहे ? हे जाणून घेऊ. हिंदू धर्मात असे मानतात की, चातुर्मास सुरू झाला की, भगवान विष्णू निद्राधीन होतात आणि सर्व सृष्टीचा पसारा हा भगवान शिवाच्या खांद्यावर देऊन ते निद्राधीन होतात. म्हणून चातुर्मासातील शिव आणि विष्णूची भक्ती केली जाते. विष्णूची भक्ती करणे शुभ मानले जाते, मात्र या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण या काळात भगवान विष्णू झोपलेले असतात, अशी मान्यता आहे. म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्य करण्याएवजी अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यावर जास्त भर दिला जातो. विविध पूजा, मंंत्र-जप, दान-धर्म करणे याकाळात चांगले मानले जाते.
यावर्षीच्या (2025) चातुर्मासाचा काळ (Chaturmas Mass 2025)
यावर्षी 6 जुलै ते 1 नोव्हेंबर हा काळ चातर्मासाचा काळ आहे. या चार महिन्याच्या काळात विविध व्रतवैकल्यं आणि सणवार साजरे केले जातात. भगवान विष्णू याकाळात निद्राधीन होऊन, संपूर्ण सृष्टीचे व्यवस्थापन भगवान शिवकडे सोपवतात. त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवाची भक्ती करणे महत्त्वाचे मानले जाते. अनेकजण या काळात अनेक नियम पाळतात. कोणी मांसाहार करत नाही, तर काहीजण फक्त एकवेळ जेवणाचा नियम करतात. काही जण या चार महिन्यात पहाटे उठून स्नान करण्याचा नियमही पाळतात.
आज जग तांत्रिक दृष्ट्या खुप पुढे गेले आहे. मात्र तरीही काही हजार वर्षांपासून सांगितले गेलेले नियम, चातुर्मासात पाळल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आजही विज्ञानाशी निगडीत आहेत हे विशेष. जसे की या चार महिन्यात भगवान विष्णू निद्राधीन असल्याने कोणतेही शुभ कार्य पार पाडले जात नाही. कारण भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही, असे समजतात. हा अध्यात्मिक दृष्टीकोन आहे. मात्र यामागे शास्रीय कारणही आहे. याकाळात भारतात पाऊस असतो. अशावेळी आरोग्याच्या आणि नैसर्गिक समस्याही जास्त भेडसावत असतात. त्यामुळे याकाळात जास्तकरून घरगुती सण, उत्सव आणि धार्मिक कार्यात मन रमवणे उचित समजतात. याशिवाय चातुर्मासात खाण्यापिण्याचे लावलेले नियमसुद्धा आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन देतात. पावसाळ्यात मांसाहार करणे पचनासाठी जड समजतात, म्हणून अनेकजण पूर्ण चातुर्मास किंवा श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य समजतात. आपण जर अनेक प्रथा बघितल्या तर या काळातील अनेक व्रत वैकल्याचा संबंध आपल्याला निसर्गाशी जोडलेला आढळतो.
चातुर्मास हा काळ देवतांच्या निद्रेचा काळ असल्याने या काळात वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे यासाठी भगवान शिवाची अराधना करतात, तसेच जीवनात शांतता अनुभवण्यासाठी व्रत-वैकल्ये, विधी, दान धर्म जास्त केला जातो. आपल्या पुराण ग्रंथातही चातुर्मासाचे महत्त्व सांगितले आहे. या दरम्यान निसर्गाशी नाते सांगणारे आणि धार्मिक महत्त्व असणारे अनेक सण येतात. ज्याची सुरुवात आषाढी एकादशी पासून होते. त्यानंतर येतो गणेशोत्सव, ऋषिपंचमी, गौरी पूजन, रक्षाबंधन, नागपंचमी, नवरात्र, दसरा आणि दिवाळी अशा सणांची रांगच लागलेली आहे. तेव्हा चातुर्मासाचे नियम जाणून घेऊन अध्यात्म, धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा चातुर्मास साजरा केला तर त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही फायदे नक्कीच मिळतात.
Leave a Reply