Vaishanavi Hagwane Case : गेल्या दोन तीन आठवड्यापासून महाराष्ट्रातील जनता विशेषतः महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे या तरूणीचा मृत्यू याला कारण आहे. वैष्णवीच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या कुटुंबियांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मात्र आता हगवणे कुटुंबाने नेमलेल्या विपुल दुशिंग या वकिलाच्या निर्बुद्ध आणि महिला विरोधी युक्तीवादाने महिलांमध्ये संताप दिसून येत आहे. दुशिंग यांच्या वैष्णवी विरोधी वक्तव्याचा खरपुस समाचार शिवसेना नेत्या (उबाठा) सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत घेतला आहे. 

पुणे : 2025-05-30 

पुण्यातील मुळशी येथील तरूणी वैष्णवी हगवणे हीने 16 मेला गळफास लावून आत्महत्या केली. ही हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास घेत आहेत. आरोपी हगवणे कुटुंबीयांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत. हगवणे कुटुंबीयांना सुनांचा छळ करताना कायद्याची भीती नव्हती. अशात आता त्यांनी नेमलेल्या वकिलांकडून वैष्णवीचे चारित्र्यहनन सूरु आहे. आपल्या अशिलाची बाजू मांडताना, दुशिंग यांनी जी विधाने केली आहेत त्याचा अनेक महिला नेत्या, कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत, कारवाईची मागणी केली आहे. यातील सुषमा अंधारे यांनी एका व्हिडीयोच्या मार्फत चांगलाच समाचार घेतला आहे.  

वैष्णवी आत्महत्या केस मध्ये सर्वच राजकिय नेत्यांनी पहिल्या पासून संवेदनशिलता दाखवल्याचे दिसते. मात्र उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यापासूनच या प्रकरणात अभ्यासपूर्ण भाष्य केल्याचे दिसते. आताही विपुल दुशिंग यांच्या वैष्णवी विषयीच्या असंवेदनशील वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे ? 

सुषमा अंधारे म्हणतात, ‘घोडा घाससे दोस्ती करेगा, तो खायेगा क्या’ ? जर या न्यायाने प्रत्येक वकिलाने फक्त आणि फक्त फिर्यादीचीच बाजू मांडायची ठरवली, आणि आरोपीची बाजू मांडायची नाही असे ठरवले तर कोर्टाचे कामकाज कसे चालणार ? भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात जितकी फिर्यादीची बाजू महत्त्वाची, तितकीच आरोपीची बाजूही महत्त्वाची. कारण याच देशाच्या न्यायव्यवस्थेने कसाब सारख्या अतिरेक्यालासुद्धा त्याची बाजू मांडण्यासाठी वकिल देण्याची परवानगी दिली होती, हे विसरून चालणार नाही. “वादे वादे जायते, तत्वबोधा” या युक्तीवादातूनच सत्य बाहेर येत असतं. त्यामुळे हगवणे कुटुंबाला सुद्धा आपली बाजू मांडायचा ह्कक आहे. आणि त्यासाठी महागातील महागात वकिल देण्याचा अधिकार आहे. आणि त्या वकिलानेसुद्धा त्याची बुद्धीमत्ता पणाला लावून आऱोपीची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.  तो यात त्याचे कौशल्य दाखवू शकतो.पण फक्त  बुद्धीमत्ता पणाला लावून.  पण हगवणेंचे वकिल बुद्धीमत्ता पणाला न लावता, ‘नितीमत्ता’ पणाला लावत आहेत. कारण जी आज हयातच नाही,आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती. ज्या या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्ममी बाणांनी जिचे अवघे आयुष्य घायाळ झाले होते, म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, जर तिला तुम्ही परत एकदा बदफैली ठरवणार असाल, तर हगवणेंचे वकिल हे बुद्धीमत्ता पणाला लावत नसून, नितीमत्ता पणाला लावत आहात. तुम्ही वकिल म्हणून या केसमध्ये हुशार ठराल, पण माणुस म्हणून तुम्ही कसे आहात हेही ठरणार आहे. परंतु तुमच्या घरातील मुली, सुनांना तुम्ही तोंड दाखवू शकणार का ? नवऱ्याकडून बायकोला जुजबी मारहाण होतच असते, असे कायद्याचे रक्षक वकिल म्हणत असतील, तर कौटुंबिक हिंसाचार कायद्याला काय अर्थ राहीला ?. मला वाटतं,हगवणेच्या वकिलांनी बुद्धीमत्ता भरपूर पणाला लावावी, पण नितिमत्त राखून ठेवावी. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!