Raj And Uddhav Thackeray

Raj And Uddhav Thackeray : तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय ते एकत्र रहाण्यासाठीच अशी मोठी घोषणा केली. 

मुंबई : 05/07/2025

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. तब्बल 20 वर्षांनी हे दोन्ही बंधू एका व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलोय ते एकत्र रहाण्यासाठीच अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

या विजयी मेळाव्याच्या सुरूवातीला राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. ” राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात “सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो” अशी केली. 

उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष भाषणापेक्षा त्यांच्या एकत्र दिसण्यावर असल्याचे नमूद केले. माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे, असेही ते म्हणाले. 

आता एकत्रच रहाणार 

राजकीय वर्तुळातून त्यांच्या एकत्र येण्यावर सुरू असलेल्या चर्चांनाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. ” आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र रहाण्यासाठी, असे उद्धव ठाकरे म्हणाले . 

आज मला कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबं कापतंय, कोण टाचम्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना बिझी सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!