Omkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Narmada Parikrama

निसर्गाच्या सान्निध्यातील ओंकारेश्वर – मांदाता परिक्रमा  (२०२१)

भारतीय संस्कृतीमध्ये नदीला मातेचा दर्जा दिला जातो म्हणूनच आपण ‘गंगामय्या’ असं संबोधतो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गंगानदीला महत्त्व आहे, त्या प्रमाणेच मध्य प्रदेशात नर्मदा नदीला महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या तिचे महत्त्व मोठे आहे म्हणूनच कुंभमेळा, नर्मदा परिक्रमा अशा बाबींना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा (Narmada Parikrama) होय. ही प्रदक्षिणा नेहमी नर्मदा नदी आपल्या उजव्या हाताला येईल अशी केली जाते. मात्र ज्यांना ही संपूर्ण प्रदक्षिणा करणे शक्य नाही ते भक्तगण ओंकारेश्वर ते मादांता अशीही प्रदक्षिणा करतात. अशाच या निसर्गरम्य आणि अध्यात्मिक शांतीचा अनुभव देणाऱ्या ओंकारेश्वर – मांदाता परिक्रमेचा हा वृत्तांत. 

Narmada Parikrama
Narmada Parikrama

नर्मदा परिक्रमेचे महत्त्व – Importance of Narmada Parikrama

सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदि म्हणून जरी गंगेचे महत्त्व असले तरी परिक्रमा ही नर्मदेचीच केली जाते. कारण ही नदी दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहते. त्यामुळे नदी जशी वाहते तशी तिच्या काठावरून करण्यात येणारी प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama) होय. मध्य प्रदेशात वाहणाऱ्या नर्मदा नदीची परिक्रमा करणे ही अनेकांची मनीषा असते. अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र मानल्या जाणार्‍या या नर्मदा परिक्रमेचा (Narmada Parikrama)  एकूण टप्पा 3500 किलोमीटरचा आहे. ही परिक्रमा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. कोणी वाहनातून तर कोणी पायी. भाविक चार महिने, एक वर्ष, तीन वर्ष अशा कालावधीत ही परिक्रमा करतात. ’नर्मदे हर हर’ च्या जयघोषात ओंकारेश्वर येथून सुरू झालेली परिक्रमा पुन्हा ओंकारेश्वर येथे आल्यावरच पूर्ण होते.

Narmada Parikrama
Narmada Parikrama Route

नर्मदा परिक्रमा देते अध्यात्माचा अनुभव – Narmada Parikrama gives experience of spirituality

खरं तर आध्यात्मिक दृष्ट्या ही नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama)जीवनाचे सार सांगणारी आहे.  परिक्रमा करताना येणारे अनुभव अतिशय वेगळे आहेत. कोणतीही सुखवस्तू गोष्ट जो आनंद देणार नाही, तो या परिक्रमेत मिळतो. ही परिक्रमा करण्यासाठी भारतातील विविध राज्यातून भाविक येत असतात. एकमेकांना परिचित नसले तरी परिक्रमा मार्गात ते एकमेकांचे साथीदार होतात. मग कुठली आली ओळख? सगळे हेवे-दावे सोडून मनुष्यधर्म निभावण्याची खासियत या परिक्रमेत भाविकात दिसून येत असते.

असा असतो नर्मदा परिक्रमेचा दिनक्रम – This is the routine of Narmada Parikrama

या मार्गावर सूर्योदयाला नर्मदा मय्याची आराधना करून सुरू होत असलेली परिक्रमा सूर्यास्तानंतर थोडा काळ विसावते. भाविकांच्या विश्रांतीसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा, मंदिर परिसरामध्ये खोल्या उपलब्ध करून दिलेल्या असतात. मग मुक्कामाच्या ठिकाणी चूल थाटून जवळच्या सामानातूनच काहीतरी शिजवायचे आणि खायचे त्यातही वेगळाच आनंद आहे. कारण निसर्गाच्या सानिध्यात आणि नर्मदेच्या निळ्याशार संथ पाण्याची साथ मन प्रसन्न करणारी आहे.

ओंकारेश्वर मांदाता परिक्रमेतील निसर्ग सौंदर्य – Nature beauty of Omkareshvar Madanta Parikrama

नर्मदा नदीचे प्रत्येक ठिकाणचे पात्र वेगळे वाटते. अमरकंटक येथे मेकल पर्वतात नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. घनदाट जंगलामध्ये असलेले हे ठिकाण रमणीय आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3500 फूट इतकी आहे. उगमस्थानी असलेल्या नर्मदेचे रूप पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. सहसा संथ वाहणारी ही नदी उगमस्थानी मात्र रुद्र भासते.

नर्मदा नदीचे पात्र हे विस्तीर्ण आहे. मेघावर, नेमावर, ओंकारेश्वर आदी ठिकाणी असलेले नदीचे विशाल पात्र पाहून तिची भव्यता लक्षात येते. नर्मदेवर धरण बांधल्याने काही ठिकाणी तिचे पात्र आकुंचन पावत आहे. या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची स्वच्छता…. येथे येणार्‍या भाविकांची संख्या जरी मोठ्या प्रमाणात असली तरी तिचे पात्र अतिशय स्वच्छ ठेवण्यामध्ये तिथल्या नागरिकांचा मोठा वाटा आहे. नदी प्रदूषित होईल असे कोणत्याही प्रकारचे घटक त्यात टाकू नये ही शिस्त इथल्या नागरिकांनी तर अंगिकारली आहेच शिवाय भाविकांच्याही ती अंगवळणी पडताना दिसते आहे, ही बाब अनुकरणीय आहे.

आजकाल निर्माण झालेल्या सोयी सुविधा आणि वाहनांच्या उपलब्धतेमुळे सध्या नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama)करणार्‍यांची संख्या वाढते आहे. त्या प्रमाणात नवीन घाट बांधण्याचे कामही येथे सुरू आहे. अनेकांना ही पूर्ण परिक्रमा करणे शक्य नसते. त्यामुळे या सर्व परिक्रमेचे सार असणारी ओंकारेश्वर-मांधाता परिक्रमा केल्यासही हरकत नसते असे अनेक भाविकांचे मत आहे. चार तासांच्या या परिक्रमेत विविध मंदिर आपल्याला दिसतात. त्यासह प्रसाद वाटप केंद्रही आहे आणि शिवाय आपल्याला या प्रवासाचा क्षीण येऊ नये म्हणून जागोजागी वानरसेना स्वागतासाठी उभी असते.

ओंकारेश्वर मांदाता परिक्रमेच्या मार्गातील मंदिरे आणि त्यांची वैशिष्ट्ये – Temples on the Narmada Parikrama route and their features

नर्मदा नदीच्या तीरावर महादेवाची मंदिरे अधिक पहावयास मिळतात. त्यामागे अशी आख्यायिका सांगितली जाते की नर्मदा नदीचे रौद्ररूप शमवण्यासाठी तिचे पिता महादेव सदैव किनारी विराजमान असतात.नर्मदेच्या किनारी असलेली अनेक मंदिरे हेमाडपंथी आहेत. मंदिराची कलाकुसर लक्ष वेधणारी आहे. ओंकारेश्वर-मांदाता परिक्रमेदरम्यान बाराज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग ते म्हणजे ओंकारेश्वर पाहता येते. याशिवाय ऋणमुक्त महादेव मंदिर,झोपलेले हनुमान, तीन मजली महादेव मंदिर या मार्गावर पहावयास मिळतात. याशिवाय पेशवेकालीन शिवमंदिरेही येथे आजही दिमाखात उभी आहेत. मध्यप्रदेश राज्यातील नर्मदा किनारी असलेल्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीचा वास मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ओंकारेश्वर, मांधाता परिक्रमा मार्ग सध्या विकसित होत आहे. या मार्गावर गीतेच्या पहिल्या अध्यायातील श्लोकांच्या पाट्या मार्गावर लावण्यात आल्या आहेत, तर परिक्रमा मार्ग लक्षात येण्यासाठी तशा सूचना देणाऱ्या पाट्याही लावण्यात आल्या आहेत. 

पायऱ्या आणि रस्त्यांच्या मार्गाने आपण नर्मदेच्या त्रिवेणी संगमापाशी जातो. येथे शरयू, गुप्त सरस्वती आणि नर्मदा नद्यांचा संगम आहे. येथे आढळणारे गोटे अनेक भाविक आपल्या घरी घेऊन जातात, तर येथे उभारलेली 50 फूट उंच महादेवाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मार्गावर ठिकठिकाणी दगडी दरवाजांच्या कमानी भग्न अवस्थेत असलेल्या आपल्या दृष्टिस पडतात.

Narmada Parikrama

या परिक्रमेच्या अंतिम टप्प्यात महादेवाचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराचे दगड निखळलेले आहेत. परंतु मंदिरात प्रवेश करताच अतिशय शांत वातावरण अनुभवायला मिळते. याशिवाय बारा राशींच्या वृक्षांचे उद्यानही येथे तयार केले जात आहे. त्यामुळे हिरवाईने नटलेला निसर्ग आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी ही परिक्रमा नक्कीच केली पाहिजे. हे सगळे अनुभवताना क्षणभर विश्रांतीसाठी ठिकठिकाणी सिमेंटचे कठडे उभारण्यात आले आहेत. चार तासांच्या या परिक्रमा मार्गाच्या अखेरीस आपल्याला दृष्टीस पडते ते नर्मदा नदीवरील धरण, त्यामुळे येथे नदीचा प्रवाह काहीसा कमी झाल्याचे दिसून येते. पावसाळ्यात मात्र दुथडी भरून वाहणारी नर्मदा पाहण्यात काही वेगळीच मजा आहे. स्थानिक नागरिक यातीरा वरुन त्या तीरावर जाण्यासाठी नावेचा वापर करतात . अशीही पर्यटनाचा स्वर्गीय आनंद देणारी परिक्रमा कायम स्मरणात राहणारी आहे.

तनिष्का डोंगरे.

2 thoughts on “Omkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!