महादजी (Mahadji Shinde) शिंदे छत्री –
महादजी शिंदे (Mahadji Shinde) छत्री हे ठिकाण एका थोर लढवय्या सेनापतींचे चिरविश्रांतीचे स्थान आहे. महादजी शिंदे हे पेशव्यांच्या सैन्याचे शूर सेनापती होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (Panipat war) मराठा साम्राज्याची विसकटलेली घडी परत बसवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढील काळात त्यांच्या अतुलनीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला.

अशा शूर योद्ध्याचे स्मारक पुणे शहरातील वानवडी परिसरात पहायला मिळते. याठिकाणी प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच अतिशय सुंदर राजस्थानी आणि युरोपियन बांधकाम शैलीचे महादेव मंदिर दिसते. हे मंदिर स्वतः महादजी शिंदे (Mahadji Shinde) यांनी इ.स. १७९४ ला उभारले. त्याचवर्षी १३ फेब्रुवारी १७९४ ला त्यांनी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्यांच्या कुटुंबीयातील माधवराव शिंदे यांनी याठिकाणी महादजी शिंदे (Mahadji Shinde) यांच्या नावने येथे छत्री बांधली.

छत्री म्हणजे आदराप्रित्यर्थ बांधलेले समाधीस्थळ होय. ज्याठिकाणी महादजींचे अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी त्यांची समाधी व प्रतिकात्मक छत्री बांधली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पांढऱ्या रंगामध्ये ही समाधी बांधली असून आतमध्ये महादजींचा (Mahadji Shinde) पितळी टाक आहे. नित्यनेमाने त्याची पूजा केली जाते. शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून, त्याच्यामागे महादजी शिंदे यांची मूर्ती आहे.
शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरात ही वास्तू उभी आहे. तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला जाणीवही नसते की, इतकी सुंदर एतिहासिक वास्तू इतक्या चांगल्या अवस्थेत याठिकाणी असेल. तिकिट खिडकीतून नाममात्र पाच रूपये तिकिट काढून आत प्रवेश करता येतो.आत प्रवेश करताच समोरच तीन मजली महालासारखे दिसणारे मंदिर नजरेस पडते. यापुढचे किमान दोन तासतरी आपण शहरात असूनही त्याच्या गोंगाटापासून लांब अशा शांत, रम्य वातावरणात रमून जातो. शहरातील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या मानाने याठिकाणी गर्दी कमी असल्याचे जाणवते.

मंदिर आणि मंदिराच्या बाजूचा परिसर प्रशस्त, शांत, स्वच्छ आहे. आत प्रवेश करताच या वास्तूची नयनरम्यत लक्षात येते. मंदिराच्या आतील बाजूचे नक्षीकाम अतिशय मोहक आहे. मंदिराचे छत ज्या खांबावर तोललेले आहे, ते खांब व कमानी यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. घुमटातील आतील भागातील सज्जे आणि वरचा संपुर्ण मजला युरोपियन आणि राजस्थानी बांधकाम शैलीची ओळख करून देतो.





छतावरील झुंबर, लाकडी कातिव काळ्या खांबांमुळे त्यावेळच्या वैभवाची आपल्याला कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजुचा जिना व खिडक्यांची दारे ही युरोपियन शैलीची आहेत. या मंदिराचा पाया काळ्या दगडात बांधलेला असून, वरील भाग राजस्थानी पिवळ्या दगडात बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्या सर्वात वरच्या भागावर अनेक साधू-संतांच्या मूर्ती ठराविक अंतरावर बसवण्यात आल्या आहेत. मंदिराचा कळसही अतिशय प्रेक्षणीय आहे. या मंदिरातील मुख्य भाग एखाद्या राजसभेसारखा वाटतो. आतिल भागात शिंदे कुटुंबातील सदस्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत






वास्तूशास्राचे नियम पाळून ही वास्तू निर्माण करण्यात आली आहे. भारतीय वास्तूशास्र पूराणकाळापासून फार प्रगतशील आहे. भारतातील विविध भागातील मंदिरं बघितली तर, प्रत्येक मंदिराची एक वेगळी शैली आहे हे समजते. याठिकाणी तर भारतीय वास्तूशैलीसह युरोपीयन बांधकामशैलीशी संयोग केलेला दिसून येतो. त्यामुळे ही शैली आपल्याला प्रेमात पाडते. इतिहास आणि छायाचित्रणाची आवड असणार्यांसाठी या एतिहासिक स्थळाला भेट देणे मोठी पर्वणी ठरू शकते.



– ज्योती भालेराव
2 thoughts on “Mahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.”
छान, माहीती व सवॅ फोटो सुंदर
अभिनंदन !
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.