भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ )
जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल खजिना आहे. त्यातलं एक अनमोल रत्न म्हणजे ‘कैलास मंदिर’ (Kailasa Temple). याचे वर्णन करण्यासाठी खरोखर शब्द अपुरे पडतात. तरीही मी ‘मिसलेनीयस भारत’च्या वाचकांसाठी शब्द आणि छायाचित्रांच्या माध्यमातून कैलास मंदिराची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

खरं तर मी एकुण तीन वेळा वेरूळला भेट दिली आहे. परंतु या प्रत्येक भेटीत येथील लेण्या, त्यातील शिल्पं ही अनोखी भासतात. त्यांचे अर्थ नव्याने कळतात. वेरूळमध्ये प्रवेश करताच तुम्हाला जाणीव होते की तुम्ही एका वेगळ्या जगात प्रवेश केला आहे.
बाहेर प्रत्येक पर्यटन स्थळी जशी दुकानांची, विक्रेत्यांची गर्दी असते तशीच येथेही आहे. तुम्ही तिकीट काढून आत प्रवेश केला की एक लोखंडी कडांच्या मधून आपला मार्ग सुरू होतो. थोडं पुढं जाताच समोरच एकदम नजरेस पडतो तो कैलास मंदिराचा दर्शनी भाग. एका मोठा पहाड, त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या मोठ्या शिल्पाकृती दिसतात. येथे जाण्यासाठी एका वर्तुळकृती हिरवळीच्या दोन्ही बाजूने फरशांचा मार्ग तयार करण्यात आला आहे. कैलास मंदिराच्या बाहेर बाजूला कंपाऊंड घालून बसण्यासाठी हिरवळ तयार करण्यात आलेली आहे. त्याच्या मधे कैलास मंदिराचे (Kailasa Temple) प्रवेशद्वार आहे.

कैलास मंदिराचे अद्भूत जग –
या मंदिराच्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत पाऊल टाकले, की तुम्ही आताच्या जगापासून संपूर्णपणे विलग होता. एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा आभास तुम्हाला संपूर्ण मंदिर फिरताना होत रहातो. सुरुवातीला तुम्हाला ठरवताच येत नाही की, मी काय, कोणते आणि किती मूर्ती सौंदर्य बघू. इतका मोठा खजिना येथे तुमच्यापुढे खुला झालेला असतो.वेरूळ येथील कैलास मंदिर (Kailasa Temple) जितके सुंदर आहे तितकीच त्याच्या निर्मीतीची कथा आणि निर्मीतीची पद्धत जाणून घेणे रंजक आहे. आज आपण या मंदिराचा इतिहास, त्याची शैली जाणून घेणार आहोत आणि छायाचित्रांच्या माध्यमातून त्याची सफर करणार आहोत.












मंदिराची आगळी शैली –
कोणत्याही कामामध्ये जर यश हवं असेल तर आधी त्या कामाचा पाया रचावा लागतो, मगच त्या कामाच्या यश शिखरावर पोहोचता येते म्हणजेच त्याच्या कळसाला पोहोचता येते असं आपण पुर्वापार एकत आलो आहोत. या वाक्रप्रचाराच्या अगदी उलट करूनही आज कैलास मंदिर जगाच्या नकाशावर आपलं वेगळं स्थान टिकवून आहे.होय हे अगदी खरं आहे.जगातलं हे असं अद्भूत मंदिर आहे जे आधी कळस आणि मग पाया अशा पद्धतीने निर्माण करण्यात आलेले आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमातून, कलासक्ततेतून हे मंदिर निर्माण झाले आहे. थोडे थोडके नाही तर तब्बल १५० वर्षांच्या परिश्रमाचे फलित म्हणजे हे मंदिर होय.


खरं तर असं म्हणतात की हे मंदिर (Kailasa Temple) फक्त अठरा वर्षांच्या कालखंडात निर्माण झाले. मात्र आधुनिक पुरातत्वीय शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार इतके अद्भूत मंदिर इतक्या कमी कालावधीत बांधणे केवळ अशक्य आहे. हजारो कामगार हाताशी घेऊन जरी हे मंदिर निर्माण करण्यास सुरुवात केली तरी त्यासाठी १५० वर्षांचा काळ लागू शकतो. आणि इतिहासातही याच्या निर्मीतीचा कालखंड टप्प्याटप्प्यात असल्याचे दिसून येते.

मंदिर १८ वर्षांत बांधल्याची अख्यायिका –
या मंदिराचे (Kailasa Temple) बांधकाम ज्या राजाच्या काळात करण्यात आले ते महाराज ‘कृष्णराज’ एकदा आजारी पडले. काही केल्या त्यांचा आजार बरा होत नव्हता. तेव्हा राणीने भगवान शंकराला विनवणी केली, की राजाला बरं वाटू दे, तसे झाल्यास मी तुझे भव्य मंदिर बांधून पुर्ण करेल. आणि हे मंदिर बांधून पुर्ण होई पर्यंत मी व्रत करेल. काही दिवसात राजाला आराम मिळाला. नवस बोलल्या प्रमाणे राणीने मंदिर बांधण्याची सुरुवात केली. राजा कृष्णराज यांनाही जेथे शिवाचा वास आहे त्या कैलास पर्वताप्रमाणे हे मंदिर असावे असे वाटत होते. मात्र इतके भव्यदिव्य मंदिर बांधण्यासाठी बराच मोठा कालावधी लागणार होता.


तोपर्यंत राणीला व्रत करणे अवघड होते. परत राणीने शिवाची अराधना केली, शिवाकडे मदत मागितली. शिवाने राणीला असे अस्त्र दिले की, त्याने दगड कापला तर त्याची वाफ होत असे. अशा काही विशेष अस्त्रांचा वापर करून हे अद्भूत मंदिर कमी कालावधीत तयार झाले. नंतर हे अस्त्र मंदिराच्या पायथ्याशी पुरण्यात आले. म्हणून फक्त अठरा वर्षांत हे मंदिर पुर्ण झाल्याचे सांगण्यात येते.
मात्र आधुनिक संशोधनानुसार याला १५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागल्याचे बोलले जाते. आख्यायिका किंवा आधुनिक संशोधन यातील काय खरे हे जरी आज निश्चित सांगता येत नसले तरी, हे मात्र नक्की की, राजा कृष्णराज आणि त्यांच्या वंशजांच्या काळात या अद्भूत मंदिराची निर्मिती करण्यात आली. त्यांच्या कलाप्रेमाला दाद द्यायला हवी.























वेरुळ विषयी –
वेरूळ हे ठिकाण लेण्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे तीन प्रकारच्या लेण्यांची निर्मीती वेगवेगळ्या कालखंडात करण्यात आल्याचे दिसून येते. याठिकाणी हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीन धर्मांवर आधारीत अशा लेण्या आहेत. त्यातील सर्वांत मोठे आहे ते ‘कैलाश मंदिर’. या मंदिराचे मुळ नाव ‘कैलासनाथ’ होते. कैलास मंदिराची (Kailasa Temple) निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झालेली आहे. या लेण्यांपैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे.
इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.म्हणजे हजारो वर्षे झाली तरी हे मंदिर आजही त्याचे सौंदर्य टिकवून उभे आहे.
या मंदिराची निर्मीती हा एक चमत्कार समजतात. सम्राट कृष्णराज यांच्या नंतरही पुढील राजांच्या काळात या मंदिराचा विस्तार सुरु राहिल्याचे जाणकार सांगतात. मंदिराच्या भोवतालच्या ओवऱ्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर अशा अनेक भागांची निर्मीती पुढील काही काळात होत राहिली. हे मंदिर (Kailasa Temple) म्हणजे शैलमंदिर शिल्पप्रकारचे मंदिर आहे.
कसे बांधण्यात आले मंदिर –
आधी कळस आणि मग पाया अशा कार्यशैलीने हे मंदिर (Kailasa Temple) निर्माण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. एक मोठा दगडी पर्वत त्यासाठी निवडण्यात आला. एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास २० टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. त्याच्या पायाला मंदिराच्या गोपुरासाठी आणि मुख्य मंदिराच्या मुख्या भागासाठी काही जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर तीस मीटर रूंद आणि तितकेच खोल असे चर खणून घेण्यात आले. मध्यभागी उरलेल्या ६० मी. लांब आणि ३० मी. रुंद दगडातून हे कैलास मंदिर उभे करण्यात आले. एकुण २७६ फुट उंच आणि १५४ फुट रुंद इतकया भव्य आकारात हे मंदिर बांधण्यात आले आहे.


पुढच्या भागातून प्रवेशद्वार व गोपूर खोदण्यात आले. खरं तर या मंदिराचा आराखडा हा अगदी साधा आहे. चौकोनी गाभारा, त्याच्या भोवताली पाच छोटी देवळं, समोर चौरस मंडप, त्यासमोर नंदिंमंडप,मंडप, त्यांना जोडणारा दगडी पूल आहे. मंदिराच्या मुख्य पायालाच प्रचंड आकारातील हत्ती, सिंह, व्याघ्र यांच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. या प्राण्यांच्या डोक्यावर संपूर्ण मंदिराचा भार पेलण्यात आलेला आहे, अशी मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिराच्या (Kailasa Temple) भोवती तुम्ही जेव्हा चक्कर मारता तेव्हा तुम्हाला या सर्व मूर्ती पाहून आश्चर्य वाटत रहाते. या संपूर्ण मंदिरात उभारण्यात आलेले स्तंभ, कोनाडे, छत, शिखर हे सर्व द्राविड शैलीत आहेत. प्रत्येक शिल्प, नक्षीकाम हे अत्युच्य दर्जाचे आहे. या मंदिराच्या मुख्य चौकात भव्य गजमूर्ती आहेत. याच भागात ध्वजस्तंभ आहेत.


कैलासमंदिरातील (Kailasa Temple) कथाशिल्प –
येथील शिल्पांविषयी वर्णन करण्यासाठी आपली शब्दसंपदा तोकडी पडते. आपण जेव्हा या मंदिरात प्रवेश करतो तेव्हापासूनच आपली नजर भिरभरायला लागते. हे पाहू की ते, या भिंतीपाशी जास्त वेळ घालू की, इकडे जास्त वेळ थांबू अशी आपली अवस्था होते. येथे रामायण आणि महाभारत या आपल्या संस्कृतीतील दोन महाकाव्यातील अनेक प्रसंगाचे चित्रण आहे. काही शिल्पं आकारने बरीच भव्य आहेत. तर काही अगदीच लहान. त्यांना बरेच बारकाईने पाहिल्यावर त्यांच्यातील कथाबीज आपल्याला समजू शकते. या मंदिरात (Kailasa Temple) आपल्याला रावण व जटायू यांचा संग्राम, त्रिपुरवध असे प्रसंग कोरण्यात आलेले आहे.


येथिल कैलासउद्धारणाचा देखावा विशेष आहे. शिवपार्वतीचे अधिष्ठान जेथे आहे असा कैलास पर्वत गदागदा आपल्या भक्कम बाहूने हलवण्याचा प्रयत्न करणारा रावण, भयभीत झालेली पार्वती, शांत असणारे भगवान शंकर अशी अनेक शिल्पं येथे आहेत. या शिल्पांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी तंतोतंत दगडातून कोरून दाखवण्यात कलाकार यशस्वी झालेले आहेत. या संपूर्ण मंदिराला आतून बाहेरून रंगकाम करण्यात आले होते. काळाच्या ओघात कदाचित ते धूसर होत गेले. काही शिल्पांचे अर्थ समजण्यासाठी या लेण्यांचा एखादा अभ्यासक सोबत असणे हे तर खरं तर येथील भेटीचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी मदत होऊ शकते.






लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर (Kailasa Temple) आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगांच्या समोर मोठा सभामंडप आहे. या मुख्य सभामंडपाच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. येथेच बाजूने अनेक भव्य, सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत. त्या प्रत्येक स्तंभावर विशेष कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत.या मंदिराचं विशेष हे की येथील शिल्पातील प्राणी हे पुर्णाकृती आहेत. या मंदिराची रचना एखाद्या रथाप्रमाणे असून, हा रथ हत्ती, सिंह यांच्या डोक्यावर तारलेला आहे. मंदिराच्या गोल फिरून आपण ही सर्व शिल्पे पहात राहतो. हे मंदिर म्हणजे गोपुरं दिसतात. तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात.
२० हजार टन दगडांचं पुढं काय करण्यात आलं –
या मंदिराच्या निर्मीतीकाळात सुमारे २० हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आल्याचा अंदाज अभ्यासक वर्तवतात. मात्र नंतर इतक्या मोठ्या प्रमाणातील दगड मंदिराच्या आसपास कुठेच सापडले नाहीत. त्याचं पुढे काय करण्यात आलं याचे अनेक तर्कवितर्क सांगण्यात येतात. कैलास मंदिराच्या आसपास अनेक लहान मोठे मंदिरं आहेत, तसेच वेरूळ ज्या भागात आहे त्या मराठवाड्यात अनेक मंदिर आहेत, जी चालुक्य आणि राष्ट्रकुट काळात बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरातील काही मंदिरांचे बांधकाम कैलास मंदिराच्या बांधकामावेळी बाहेर पडलेल्या दगडातून केले असल्याचीही एक शक्यता वर्तवली जाते.
जेव्हा कैलास मंदिराची (Kailasa Temple) निर्मीती करण्यात आली तेव्हा हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या रंगात रंगवलेले होते. कारण भगवान शंकराचा वास जेथे असतो तो कैलास पर्वत बर्फाच्छादित असतो. तसेच हे मंदिर दिसावे हा त्यामागचा हेतू. असेही सांगतात की, राजा कृष्णराज यांना जी प्रजा कैलास पर्वतावर जाऊ शकत नाही त्यांना आपल्याच राज्यात शिवाचे दर्शन व्हावे या हेतूने त्यांनी कैलासमंदिराला कैलास पर्वताचे रुप दिले. काळाच्या ओघात हा पांढरा रंग उतरल्याचे दिसून येते. मात्र मंदिराच्या काही भागाला आजही या रंगाचे अवशेष असल्याचे दिसून येते.
सांडपाणी वाहून नेण्याची अद्भूत सोय –
हजारो वर्षांपासून आपले अढळ स्थान टिकवून ठेवणाऱ्या या मंदिरातील सांडपाणी वाहून नेण्याची सोय अद्भूत म्हणता येईल. कारण पावसाळ्यात येथे कुठेही पाणी साठून रहात नाही. कोणत्याही भींतीवर, फरशीवर तुम्हाला शेवाळे साचलेले दिसत नाही. पाणी वाहून नेण्याची सोय अशा पद्धतीने केलेली आहे की, ठरावीक ठिकाणी उंच, सखलपणा, पन्हाळे की वरवर ते दिसत नसले तरी पाणी कोठेही साठून रहात नाही, त्यामुळे मंदिर ज्या दगडात बांधण्यात आले आहे त्याचे आयुष्यमान वाढून ते टिकण्यास मदत झालेली आहे.
या ठिकाणाला भेट द्यायला कसे पोहोचता येईल –
औरंगाबाद शहरापासून वेरूळ हे गाव सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर औरंगाबाद शहरात मुक्कीमी असाल तर सकाळी लवकर तेथे पोहोचू शकता. स्वतःचे वाहन, बस, रिक्षा अशा अनेक पर्यायांचा वापर करणे सोयीस्कर आहे.
वेरूळच्या लेण्या आणि कैलास मंदिर (Kailasa Temple) पहाताना आपल्याकडे भरपूर वेळ असायला हवा. तरच हे लेणी सौंदर्य आपल्याला अगदी निवांत बघता येईल.
खरोखर आजच्या काळात इतके अप्रतिम, पौराणिक मंदिर आपल्याला पहाता येतयं हे खरं तर भाग्यच. संपूर्ण जगाने ज्या लेण्यांना वैश्विक वारसा असल्याची मान्यता दिली आहे, ते आपण भारतीयांनी जपणं, त्यांचा आनंद घेत त्याची महती इतरांपर्यंत पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे. कारण हा वारसा पुढील अनेक पिढ्यांनाही तितकाच समृद्ध करणारा आहे.
ज्योती भालेराव !