Table of Contents
जैन लेणी (Jain Caves) , वेरूळ , एक अजरामर शिल्पाकृती ( लेणी क्रमांक ३० ते ३४)
भारतात सुमारे एक हजार लेण्यांचे वैभव आहे. त्यापैकी सुमारे आठशे लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. एक हजार लेण्यांपैकी सुमारे १०० लेण्या या हिंदू आणि जैन धर्मांच्या अनुयायांनी बांधलेल्या आहेत तर उरलेल्या सर्व लेण्या या बौध्द धर्मियांनी बांधलेल्या आहेत.
यापैकी छत्रपती संभाजी नगर शहरानजीक अजिंठा आणि वेरूळ या दोन गावांमधील लेण्यांच्या वैभवाला जागतिक स्तराचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यापैकी वेरूळ येथील लेण्यांकडे फक्त एक कला म्हणून आपल्याला पहाता येणार नाही. तर येथील लेण्यांकडे पाहून भारतात विविध धर्म हातात हात घेऊन हजारो वर्षांपासून कसे एकत्र नांदत असल्याचे या लेणी पाहून आपल्याला समजते.
वेरूळ येथे हिंदू, बौद्ध आणि जैन (Jain Caves) अशा तीन धर्मातील अनुयायांनी बांधलेल्या लेणी आहेत. या लेण्यांमुळे त्या धर्मातील शिल्पकला, वास्तूकला, त्यावेळची जीवनशैली, त्या धर्मातील तत्व, श्रद्धास्थानं असे सर्व समजून घेता येते.
वेरूळ येथे एकुण ३४ लेणी खोदलेल्या आहेत. या लेण्यांचा कालखंड पाचवे ते दहावे शतक असल्याचे तज्ञ सांगतात. या ३४ लेण्यांची विभागणी बौद्ध, हिंदू आणि जैन अशा शिल्पकलांमध्ये विभागलेली आहे.

येथे लेण्यांना जे क्रमांक देण्यात आले आहेत त्यानुसार १ ते १२ क्रमांकाची लेणी बौद्ध पद्धतीची आहे. १३ ते २९ या लेण्यांची शिल्पकला हिंदू पद्धतीची आहे. तर उरलेल्या ३० ते ३४ क्रमांकाच्या लेणी म्हणजे अवघ्या पाच लेणी या जैन पद्धतीच्या आहेत. यापूर्वीच्या पहिल्या भागात आपण हिंदू लेणींचा मागोवा घेतला. या दुसऱ्या भागात आपण जैन लेणींविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
‘कैलासमंदिरासह’ या लेण्यांच्या निर्मीतीचा कालखंड पाचवे ते दहावे शतक मानला जातो. शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असणारे ‘वेरूळ’ हे छोटेसे गाव. येथे पाचव्या ते दहाव्या शतकात या सुंदर, अद्भूत लेण्यांची निर्मीती करण्यात आली. या लेणी पहात असताना सतत आपल्या मनात त्यावेळचे वातावरण, येथे वास्तव्यास असणारे अनुयायी, येथे चालवण्यात येणारी उपचार केंद्रे आणि एकुणच आपल्या वैभवशाली संस्कृतीचा विचार आपण करत असतो.
वेरूळ लेणींना भेट द्यायची तर तुमच्याकडे भरपूर वेळ आणि खाणं आणि पाणी यांची सोय असायला हवी. या दोन गोष्टींची व्यवस्थीत तरतूद तुम्ही केलीत तर तुमची ही सफर स्वप्नवत होतेच. जैन लेणी (Jain Caves) या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोरील जागतिक वारसास्थळाची मोठी पाटी दिसते त्याच्या डाव्या बाजूला आहेत.
क्रमांक ३० ते ३४ ही पाच जैन धर्मियांची लेणी आहेत. त्यातही विशेषतः दिगंबर पंथाची लेणी जास्त प्रमाणात आहेत. या लेण्या मुख्य प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूला परंतू बऱ्याच आत आहेत. पायी जाण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. त्यासाठी प्रशासनाकडून इलेक्ट्रिक गाड्यांची सोय केलेली आहे.
अल्पदरात आपल्याला ही सुविधा घेता येते. खर तर ‘ओपन’ असणाऱ्या या गाड्यांमधून येथील निसर्गसौंदर्य न्याहाळत या लेण्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार नयनरम्य आहे. अनेक झाडी, पाण्याचे झरे, तलाव असं सर्व बघत आपण जैन लेण्यांपर्यंत पोहोचतो. सर्व जैन लेणी (Jain Caves) या एकमेकांशेजारी सलग आहेत. या प्रत्येक लेणीचे प्रवेशद्वार वेगवेगळे दर्शवले गेले असले तरी त्या आतून बऱ्याचशा संलग्न आहेत.
अनेकजण प्रथमदर्शनी दिसणारे कैलास मंदिर आणि बाजूच्या बौद्धलेणी यांनाच भेट देऊन जातात. मात्र या लेण्याही नक्कीच पहाण्यासारख्या आहेत. त्यांच्यातील अनेक बारकावे विशेष आहेत. जैन लेण्यांच्या बाजूला शिल्प काम, लेण्यांच्या सौंर्दर्यासह निसर्गसौंदर्यही भरपूर आहे.
जैन लेणी (Jain Caves) क्रमांक ३०
या लेणीच्या बाहेरील बाजूने वर पाहिल्यास डोंगरावरून एक मार्ग जाताना आढळतो. वर गणेश लेणी आहे. येथे काहीसे गुढ वातावरण जाणवते. येथे गर्भगृहात शिवलिंग आहे. या सर्व लेण्यांच्या निर्मितीचा काळ अकरावे किंवा बारावे शतक असावा. लेण्या, मंदिरं निर्मीतीचा हा शेवटचा टप्पा असावा असे या लेण्या पाहून सतत वाटत रहाते. शिल्पकलेला लागलेली उतरती कळा याठिकाणी जाणवते.

जैन लेणी (Jain Caves) क्रमांक ३१
ही लेणी खास म्हणता येईल. यालाच छोटा कैलास संबोधले जाते. द्राविडी धर्तीची बांधलेले हे मंदिर सुंदर, शांत आहे. गोपूराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला शिल्पकाम कोरीव काम केलेले आहे. डावीकडे प्रथम तिर्थकर ऋषभनाथ यांच्याविषयीची शिल्पे आहेत. पुढे तीर्थकरांच्या तीन मूर्ती आहेत. या लेणीमध्ये अग्रमंडप. मुख्य मंडप व गर्भगृह अशी रचना आहेत. गर्भगृहात भगवान महावीर यांची मुख्य मूर्ती असून त्यांच्या बाजूला इतर तीर्थकरांच्या मूर्ती आहे.

एका भींतीवर योगासनातील अष्टभूजा देवीची मूर्ती आहे. याच लेणी मध्ये छतावर अतिशय सुंदर आणि रेखीव कमलपुष्प कोरलेले आहे. आजही त्यातली सुक्ष्मता आणि कोरीवता आपल्याला अचंबित करते. आपण छताकडे स्वतःभोवती फिरून वर पाहिले तर या पुष्पाची खरी कला आपल्याला समजते. याशिवाय या लेण्यांमध्ये चतुर्मुख तीर्थंकर, पूर्णघट कोरलेले स्तंभ, अग्रमंडपातील कक्षासन, जोत्यावरील हत्ती अशी काही मोजकी पण उठावदार शिल्पे आहेत.
लेणी क्रमांक ३१ ते ३४ सलग एकमेकांशेजारी आहेत. ३१ व्या लेणी मध्ये चार खांब आहेत. गर्भगृहात महावीराची ध्यानमुद्रेतील प्रतिमा असून त्याच्यावर पुष्पमाला घेतलेले गंधर्व विहार करीत आहेत.


जैन लेणी (Jain Caves) क्रमांक ३२
ही लेणी इंद्रसभा म्हणून प्रसिद्ध आहे. दिगंबर पंथाची ओळख असणारी ही लेणी दोन मजली आहे. या लेणीतील एक देवता मातंग (धन संपत्तीची देवता ) ही पुढे काही काळाने इंद्र देवाशी साधर्म्य वाटून या लेणीला इंद्रसभा म्हणून ओळखले जाऊ लागले. या लेणीच्या मोकळ्या प्रांगणात एकाश्मक हत्ती आणि एकाश्मक मानस्तंभ विराजमान आहे. हा स्तंभ जैन धर्माच्या किर्तीचे प्रतिक समजला आहे.

प्रांगणाच्या चतुर्विद प्रवेशद्वारयुक्त सभामंडपात भगवान महावीर यांच्या सर्वतोभद्र प्रतिमा आहेत. मुखाग्र भिंतीही नक्षीकाम केलेल्या आहेत. येथे सुपार्श्वनाथ, गोमटेश्वर, मातंग, सिद्घिका यांचे शिल्प आहेत. तळमजल्यावर मोठा व्हरांडा, स्तंभयुक्त मंडप, गर्भगृह अशी रचना आहे. मुख्य कक्षात महाविरांची प्रतिमा आहे. तर भींतीवर जैन देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. वरच्या मजल्यावर मोठा व्हरांडा, स्तंभयुक्त मंडप आणि गर्भगृह आहे.
येथील भिंतींवर मातंग ( धन संपत्तीची देवता ) अंबिका ( वैभवाची देवता ) यांचे अप्रतिम शिल्पकाम आहे. येथील भींती आणि छतांवर भरपूर कोरीव काम केले आहे. गर्भगृहात धानस्थ्य भगवान महावीरांची मूर्ती कोरलेली आहे. या लेणीचे मुख्य आकर्षण येथील स्तंभांवरील नक्षीकाम आहे.


जैन लेणी (Jain Caves) क्रमांक ३३
अकराव्या शतकात निर्माण करण्यात आलेली ही लेणी (Jain Caves) दिगंबर पंथाला समर्पीत करण्यात आलेली आहे. ‘जगन्नाथ सभा’ नावाने या गुफेला ओळखले जाते. या गुफेचे मुख्य मंदिर दोन मजली आहे. तळ मजल्यावर व्हरांडासदृश्य जागा आहे. याशिवाय भव्य स्तंभांचे सभामंडप, गर्भगृह अशा स्थानांचा समावेश आहे. तळमजल्याच्या बाहेरील बाजूस मातंग (धन संपत्तीची देवता ), सिद्धीका (संपन्नतेची देवता ) अशा काही देवतांची सालंकृत शिल्प आहेत.
सभामंडपाच्या भिंतींवर जैन देवदेवतांची तर गर्भगृहात सिंहासनस्थ भगवान महावीरांची प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. येथे भूयारासदृश्य कोठीही आहे. काही अमूल्य वस्तू ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत असावा. येथील स्तंभांवर अत्यंत बारीक नक्षीकाम आहे. वरच्या मजल्याची रचनाही तळमजल्याप्रमाणेच आहे. येथे सभामंडपात सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले बारा स्तंभ आहेत. भींतीवर वेगवेगळ्या तिर्थकरांच्या बारीक कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत.



जैन लेणी (Jain Caves) क्रमांक ३४
हे लहान लेणे आहे. एका बाजूला पार्श्वनाथ तर दुसऱ्या बाजूला गोमटेश्वर यांच्या मूर्ती आहेत. सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी साचेबद्द रचना आहे. याशिवाय हत्तीवर बसलेला मातंग देव, सिद्घायिका देवीबरोबरच येथे जैन अनुयायी, गंधर्व, नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत.
जैन लेणी (Jain Caves) पहाताना या लेण्यांमध्ये तोचतोचपणा असल्याचे जाणवते. येथीव अनेक भींतीवर चित्रकारीचे, कोरीवकाम करण्यापूर्वीची आरेखने केल्याचे स्पष्टपणे जाणवतात. येथीव बरीच कामं अर्धवट राहिल्याचेही दिसून येते. जैन लेणी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे काही भागात अजिंठा प्रमाणे रंगीत शिल्पकाम , कोरीव काम केलेले आढळते.



जागतिक वारसास्थळ – इ.स. १९५१ मध्ये भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. त्यानंतर या लेणी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आल्या. युनोस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. असे असले तरी आजही येथे आणखी सुरक्षेची गरज असल्याचे जाणवेत. या लेणी फक्त आपल्या भारत देशाचाच वारसा नसून हा संपूर्ण जगासाठीचा अमूल्य खजिना आहे. त्यांची सुरक्षा त्याच दर्जाची व्हायला हवी.

वेरूळला भेट द्यायला जर तुम्ही जाणार असाल आणि एकाच दिवशी तुम्ही कैलास मंदिरासह या तीनही लेणी पाहणार असाल तर एक तर तुम्ही सकाळी लवकरात लवकर तिथे पोहोचायला हवे, म्हणजे सर्व लेण्यांना तुम्हाला निवांत भेट देता येईल.
एक संपूर्ण दिवस यासाठी तुम्हाला लागू शकतो. बाहेर आल्यावर येथे किरकोळ खरेदीसह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अनेक खास गोष्टी तुम्हाला येथे मिळतील. ‘हिमरू’ वीणकाम केलेल्या शाली, साडी, स्कार्फ ही येथील विशेष कला मानली जाते. पैठण आणि येवल्याची जशी पैठणी तशी ही हिमरू साडी. तुम्हाला खरेदीची आवड असेल तर या खरेदीसाठीही तुमचा इथे बराच वेळ जाऊ शकतो.
Jyoti Bhalerao