दिल्ली : 2025-05-04
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्यक्ष प्रत्युत्तर देण्यासंदर्भात देशात सध्या खलबतं सुरू आहेत. मात्र त्या आधी भारत सरकारने पाकिस्तानबाबत अनेक कठोर पावले उचलली आहेत. 22 एप्रिलला जम्मूकश्मिरमधील पहलगाम या ठिकाणी पाक आश्रित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली, सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
आत्तापर्यंत भारत सरकारने पाकिस्तान विरूद्ध कोणते निर्णय घेतले आहेत ते आपण पाहू
सिंधू जल करार स्थगित – पहलगाम येथे हल्ला झाल्यावर भारताने तातडीने घोषणा केली ती, सिंधू जल करार रद्द करण्याची. ही घोषणा करून भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडल्याची भावना आहे. तेव्हा काय आहे हा सिंधू जल करार ते आपण पाहू.
हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेल्या नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भातील करार आहे. सिंधू नदी आणि तिच्या खोऱ्यातील इतर काही नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात जागतिक बँकेच्या पुढाकाराने दोन देशांत करार करण्यात आला. जवळपास दहा वर्षे वाटाघाटी झाल्यानंतर दोन्ही देशांनी पाकिस्तानात कराची येथे 19 सप्टेंबर 1960 ला स्वाक्षऱ्या केल्या होत्या. भारतातर्फे तत्कालिन पंतप्रघान जवाहरलाल नेहरू यांनी आणि पाकिस्तानतर्फे अध्यक्ष अयुब खान यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडील वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी पाकिस्तानला वापरता येईल तर रावी, बियास आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याबाबत भारताला सर्व अधिकार असतील. पश्चिमेकडील नद्यांमधील भारताला एकुण पाण्यापैकी 20 टक्के पाणी उपलब्ध असेल.
असा हा महत्त्वाचा करार आज भारताने संपुष्टात आणून पाकिस्तानला कोंडीत पकडले आहे.
- हवाई हद्द बंदी
भारताने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान च्या विरोधात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानच्या विमानांसाठीचे आपले विमानतळांच्या जागा बंद करण्यात आल्या आहेत. 23 मे 2025 पर्यंत हा निर्णय रहाणार आहे. यामुळे पाकिस्तानचे बरेच आर्थिक नुकसान होणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या विमानांना लांबच्या हवाई रस्त्याने येजा करावी लाहणार आहे. त्यासाठी त्यांना जास्त इंधनाचा वापर करावा लागणार आहे. आणि त्यांचा वेळही वाया जाणार आहे.
- पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द –
पाकिस्तानच्या नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची जी परवानगी देण्यात आली होती, ती आता रद्द करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानच्या नागरिकांना जे व्हिसा देण्यात आले होते, ते आता रद्द करण्यात आले आहे. एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडावा लागला आहे.
- टपाल सेवा बंद ,
- आयात निर्यात बंद
- पाकिस्तानी जहाजांना प्रतिबंध
भारत सरकारचा हा आणखी महत्त्वाचा निर्णय आहे. भारताने पाकिस्तानकडून येणाऱ्या आणि भारतातून तिकडे जाणाऱ्या सर्व टपास सेवा त्वरित बंद केल्या आहेत. सगळ्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागांतर्फे जाहिर करण्यात आले आहे की, भारत सरकारकडून हवाई आणि जमिन अशा दोन्ही टपाल सेवा, मेल आणि पार्सल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या आधी पाकिस्तानने अशी टपास सेवा काही काळ बंद केली होती, जेव्हा भारताने 370 कलम हटवले होते. मात्र तीन महिन्यानंतर ही सेवा पुर्ववत करण्यात आली होती. आता भारताने ही सेवा पुर्णतः बंद केली आहे.
सध्या पाकिस्तान सोबत भारताने युद्ध करावे की नाही या संदर्भात जनमानसात चर्चा होताना दिसते. मात्र भारतसरकारने सध्या असे काही निर्णय घेऊन प्रशासकिय पातळीवर पाकिस्तानची कोंडी केलेली पहायला मिळत आहे.
Leave a Reply