Bachchu Kadu

Bachchu Kadu Hunger Strike : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले. आज त्यांच्या अन्नत्यागा आंदोलनाचा 6 वा दिवस आहे. मंत्री बावनकुळे यांनी आज त्यांची भेट घेतली. 

महाराष्ट्र : 2025-06-13

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू ( Bachchu Kadu )यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे. दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू  यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणल्याते समजते.

काय म्हणाले मुख्यमंत्री ? 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी तातडीने एक समिती तयार केली जाईल. त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेण्यात येईल. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असे फडणवीस यांनी म्हटले आहे. अशी माहिकी मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. 

बावनकुळेंनी दिलेली माहीती 

ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत, त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू यांची देखील उपस्थिती असेल. दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आणावे लागते, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल. त्यामध्ये किती वाढ करायची, ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन, ती माहिती जमा केली जाईल. त्यानंतर त्यावर तोडगा काढू, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. बावनकुळेंच्या या माहितीनंतर, त्वरीत कडू यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विचारले की, तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का ? त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून, सरसकट कर्जमाफी व्हावी असं म्हटले आहे. 

कर्जमाफी होईरपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिले आहे. मात्र बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आम्ही यावर समाधानी नाही, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असे यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!