Dr.Dipak Tilak

Dr. Dipak Tilak : डॉ. दिपक टिळक यांचे आज (16 जुलै) निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

पुणे : 16/07/2025 

केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉय दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी , नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

डॉ. दीपक टिळक यांच्या कार्याविषयी ( Dr. Dipak Tilak )

डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्यासा वारसा त्यांनी प्रामाणिक पणे पुढे नेला. तसेच, डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शोक व्यक्त ( Dr. Dipak Tilak )

लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व असलेले दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे, अशा शोकभावना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत .

मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि त्यांचे सुपुत्र दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे, असंही फडणवीस म्हणाले. 

डॉ.दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. टिळक यांच्या निधनामुले त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळे, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्धगती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वाहिली श्रद्धांजली 

जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. 

 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!