दिनविशेष : 31 मे अहिल्याबाई होळकर जयंती
आज सगळीकडे भ्रष्टाचार, स्रीयांवरील अत्याचार, समाजातील जातीय तेढ वाढलेली दिसते. कठोर पण प्रामाणिक प्रशासन, शिस्त आणि समन्वयाचा अभाव जाणवतो. प्रगतीपथावर आपण आहोत असे वाटत असतानाच समाजात तनिषा भिसे, वैष्णवी हगवणे साऱख्या घटना घडतात. आणि मग जाणवतो तो कणखर आणि संवेदनशील नेतृत्वाचा अभाव. अशावेळी आठवण होते ती इतिहासातील काही कणखर नेतृत्वांची.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जनमानसावर गारूड करणारे आणखी एक ऐतिहासिक नेतृत्व म्हणजे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’. यावर्षी अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी होत आहे. त्यांच्याविषयीची राजकिय, सामाजिक, सांस्कृतीक अंगाने समजून घेतलेली ही माहती.
अहिल्याबाई होळकर समस्त मराठीजनांसाठी अभिमानाचा विषय. ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, मात्र त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले ते सध्याच्या मध्यप्रदेशातील इंदौर याठिकाणी. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील ‘चौंडी’ या एका छोट्याशा खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे होते.
ज्याकाळात मुलींना कोणतेही अधिकार नव्हते, त्याकाळात त्यांच्या वडिलांनी छोट्या अहिल्येला लिहायला-वाचायला शिकवले होते. पुढे याच अहिल्येने आपल्या कर्तृत्वाने आणि अध्यात्मिक वृत्तीने जनतेत आदराचे स्थान प्राप्त केेले. अहिल्याबाईंचे बालपण आजही मुलींना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या राज्यकर्ती म्हणून आकाराला आलेल्या व्यक्तिमत्वाचे बीज हे असे त्यांच्या बालपणातील संगोपनाला जाते असे दिसते.
अहिल्यादेवींचे (Ahilyabai Holkar)राज्यकर्ती म्हणून असणारे कार्य फार मोठे आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह माळव्याचे सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र ‘खंडेराव होळकर’ यांच्याशी झाला. अहिल्यादेवींचे पती खंडेराव यांच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकर यांनी, त्याकाळच्या प्रथेला विरोध करत अहिल्येला सती जाऊ दिले नाही. त्यांच्या या एका निर्णयाने जनतेला एका पुण्यश्लोक राज्यकर्तीचा लाभ मिळाला.
खंडेरावांच्या मृत्यूनंतर 12 वर्षांनी अहिल्याबाईंचे सासरे मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत अहिल्याबाई, मल्हारराव होळकरांच्या बरोबर राहून राज्यकारभार सांभाळण्यात निपूण झाल्या होत्या. त्या इतक्या धडाडीने कारभार पहात असे की, त्याकाळी अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. यातून त्यांचे संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण दिसतात.
मुघल राजवटीमुळे ज्याकाळात हिंदू मंदिरं पाडली जात होती, अशाकाळात अहिल्याबाईंनी फक्त महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशमध्येच नाही तर, संपूर्ण भारतवर्षात मंदिरं, नद्यांचे घाट बांधले. अनेक मंदिरांचा जिर्णोद्वार केला. पाणपोई बांधल्या. त्यांचा राज्यकारभार अत्यंत दुरदृष्टीने चालत असे. त्यांनी महेश्वर आणि इंदौर शहरांना अतिशय सुंदर रूप दिले. फार काळजीपूर्वक त्यांनी या शहरांना आकार दिला. अनेक तीर्थक्षेत्रांजवळ त्यांनी धर्मशाळांचे बांधकाम केले. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक आणि परळी वैजनाथ ही त्यातली काही प्रमुख स्थळे सांगता येतील.
वेरावळ येथील सोमनाथाचे मंदिर गझनीच्या महंमदाने उद्धवस्त केले होते. त्यांनी उद्धस्त केलेल्या मंदिराशेजारीच शंकराचे मंदिर बांधले. भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांच्या यादीत काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा.हरिद्वार, कांची, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी आदी स्थळांचा उल्लेख आहे.
अहिल्यादेवी या जितक्या धार्मिक होत्या, तेव्हढ्याच त्या प्रगत विचारांच्या असल्याचे दिसून येते. त्यांच्या राज्यात कोणीही विधवा स्री, मुल दत्तक घेऊ शकत असे. आज ही गोष्ट फार समान्य वाटत असली तरी, त्याकाळी एका विधवा स्रीचे आयुष्य सुकर करण्याच्या दृष्टीने हे फार मोठे पाऊल म्हणता येईल. रोजच्या जगण्यातून जिला हद्दपार केले जात असे, त्या विधवेला जगण्याचे कारण देणारा हा निर्णय होता. आपल्या राज्यात शेतकरी, स्रीया, कष्टकरी यांनी सुखाने जगावे यासाठी त्या कायम प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
अहिल्याबाई राज्यकारभारात जेव्हढ्या निपूण होत्या, तितकेच त्यांना कला, संगीत आणि उद्योग यांविषयीसुद्धा फार ओढ होती. त्यांनी वसवलेली अनेक गावे आणि त्यांची राजधानी बघून आजही त्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या कारकिर्दीत उत्तमोत्तम कारागिर, मूर्तीकार, कलाकार यांना मानाचे स्थान आणि आश्रय दिला जात असे. त्याचाच परिणाम म्हणजे त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली होती.
महेश्वरी साड्यांच्या आश्रयदात्या कलासक्त अहिल्याबाई होळकर .
होळकर साम्राज्याची राजधानी 1765 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर येथे स्थापित केली होती. तेव्हा तेथील लयाला जाणाऱ्या हातमाग उद्योगाला झळाळी देण्याचे काम केले ते अहिल्याबाईंनी. त्यासाठी त्यांनी सुरत आमि मालवा प्रांतातून हातमाग विणकर बोलावून त्यांना आश्रय दिला. देशातील उत्तमोत्तम सुती आणि सिल्क धागे पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांशी त्यांनी व्यापार वाढवला. स्वतः उत्तमोत्तम साडींचे नक्षीकाम सांगून, त्यानुसार त्यांनी सुरुवातीच्या साड्या बनवून घेतल्या. त्यावेळी या साड्या फक्त सिल्क मध्ये तयार होत असत. नंतर त्या सुती आणि सुती-सिल्क अशा विणल्या जाऊ लागल्या. होळकर सम्राज्यात या साड्या नऊवारी प्रकारात विणल्या जात. महेश्वरी साडी आणि अहिल्याबाई यांचे असे जवळचे नाते आहे. उद्योगमशीलता शिकवणाऱ्या अशा राज्यकर्तीची ओळख यातून होते.
न्यायप्रियता हाही त्यांचा एक फार मोठा गुण होता. त्यांनी त्याकाळी जनमानसावर असणाऱ्या अंधश्रद्धेला मोडून काढण्यासाठीही प्रयत्न केले. सतीची प्रथा कशी अनिष्ठ आहे हे त्यांनी लोकांना त्याकाळातही पटवून देण्याता प्रयत्न केला. एकीकडे गांजलेल्या, अन्यायग्रस्त लोकांसाठी त्या मदतीचा हात पुढे करत असत .मात्र जे प्रजेला त्रास देतील त्यांना कडक शासनसुद्धा केले जाई, अशी पद्धत अहिल्याबाईंची होती. भिल्ल जातीच्या लोकांना त्यांनी आपल्या सैन्यात स्थान देऊन, जमिनी देऊन, कुकुटपालनासाठी सहाय्य करून त्यांनी चोर, लुटारू म्हणून ओळख पावलेल्या या लोाकांना मुख्य प्रवाहात आणले.
सर्वांना समान न्याय या न्यायाने त्या आयुष्यभर वागल्या. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानिक आणि समान्यजन असा भेदभाव नसे. संस्थानातील सुभेदारांकडून कोणती आगळीक घडली तर त्यांनाही शिक्षा करायला त्या कधी मागेपुढे पहात नसत. सर्वच क्षेत्रात सर्वांगिण विकास व्हावा म्हणून त्या कायम झटत असत. त्या उत्तम शासक, संघटक होत्या. आजच्या राजकारण्यांनी ज्यांचा आदर्श जरूर घ्यावा असे त्यांचे व्यक्तिमत्व म्हणता येईल. यावर्षी त्यांची 300 वी जयंती साजरी होत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन !
Leave a Reply