Hindi Compulsion In Maharashtra School Update : राज्य सरकारने आता हिंदी सक्ती बाबत एक नवीन धोरण अंमलात आणणार असल्याची मोठी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. काय आहे हे नविन धोरण?
मुंबई : 26/06/2025
राज्य सरकार इयत्ता पहिली पासून तृतीय भाषा म्हणून हिंदी विषयाचा समावेश करणार आहे. सरकारच्या या धोरणाला मात्र विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती (Hindi Compulsion) योग्य नाही, असे विरोधकांचे मत आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या भूमिकेला विरोध म्हणून मनसेसारख्या पक्षाने येत्या 5 जुलैला मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. अशी विरोधाची परिस्थिती असताना, आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषेच्या धोरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत तृतीय भाषेचे (हिंदी भाषा) मौखिक शिक्षण दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
पहिली ते तिसरी पर्यंत मौखिक भाषेचे शिक्षण
दादा भुसे यांनी आज (26 जून) पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच हिंदी भाषेवरील राज्याची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेशी ते म्हणाले की, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाईल. पुस्तकं ही शिक्षकांसाठी असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही तिसऱ्या भाषेबाबत हे लिहिलेलं आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.
अजित पवारांचे याबाबत मत
आता सरकारच्या या भूमितेनंतर विरोधक नेमका काय पवित्रा घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती नको, अशी भूमिका घेतली आहे. एवढ्या लवकर विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा शिकण्याचं ओझं नको. इयत्ता पाचवीपासून हिंदी भाषा विषयाचा समावेश असावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
Leave a Reply