Raj Thackeray Rally :गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शैक्षणिक निर्णयामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी ही भाषा सक्तीची करण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आता आक्रमक झाले आहेत. सरकारला आपली हिंदी विरोधातील ताकद दाखवण्यासाठी त्यांनी महामोर्चाचे आयोजन केले आहे.
मुंबई : 26/06/2025
शाळेत पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 5 जूलै रोजी गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या मनात काय हे सरकारला दाखवणार आहोत, असं त्यांनी म्हटले आहे. राज्यात पहिल्या इयत्तेपासून तिसऱ्या भाषेचं शिक्षण अनिवार्य करतानाच ही भाषा हिंदीच राहील, असं शुद्धीपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केले. अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे ठेवतानाच शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली. त्याविरोधात मनसेनं परखड भूमिका घेतली आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसेंसह चर्चा
राज ठाकरे यांनी सांगितले की, शिक्षणमंत्री दादा भुसे येऊन गेले, त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला, जी मी संपूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितले आहे. पाचवीनंतर तिसऱ्या भाषेचा विषय येतो . त्यांनी हे मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. राज्यांवर टाकलेली गोष्ट आहे. राज्यावर गोष्ट टाकली तर हे करत आहे, हे अजूनही अनाकलनीय आहे. सीबीएससी शाळा आल्या, त्या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढण्यात आल्या होत्या. त्या शाळांचे वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याचा प्रयत्न होत आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिकाऱ्यांचा अजेंडा आहे.
5 जूलैला मोर्चा
“आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. येत्या 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचा कोणताही झेंडा नसेल, तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. साहित्यिक, शिक्षण तज्ञ आणि इतरांशी बोलणार आहे.आम्ही त्यांना आमंत्रण देणार आहोत. सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना बोलावणार आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकारला दाखवणार आहोत. सरकारला ताकद दाखवणार आहोत. रविवारी सर्वांना येता यावे म्हणून हा दिवस निवडला आहे. सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याला ‘कट’ म्हणतात
हिंदी भाषासक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांनी कट असं म्हटलंय. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे, तो उद्धस्त कऱण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी,भगिनींनी या मोर्चात सहभागी व्हावं. या मोर्चाचा अजेंडा हा फक्त मराठी असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं. साहित्यिक एलकुंचवार यांनीही विरोध केला आहे. राजकीय पक्षांव्यतरिक्त या मोर्चात कोण कोण सहभागी होतात, हे मला पहायचं आहे. या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं, 5 जूलैला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Leave a Reply