Table of Contents
खगोलशास्त्राची अविस्मरणीय जंतर मंतर नगरी, जयपूर ( निर्मिती कालावधी इ.स. १७२४ ते १७३४ )
जंतर मंतर (Jantar Mantar) हा शब्द एकला की एक तर आपल्याला काहीतरी जादू आठवते किंवा लहानमुलांशी निगडित एखादा खेळ. मात्र जयपूर मधील शहरात जंतरमंतर (Jantar Mantar) हा शब्द जोडला गेला आहे तो येथील एका जगत्मान्य वास्तूशी, जिचे स्वरूप आणि काम बघून आपण थक्क होतो. येथील जंतर मंतर (Jantar Mantar) म्हणजे काही जादूचे खेळ नाही, तर ही आहे एक खगोल शास्त्राची वेधशाळा. मात्र या वेध शाळेच्या निर्मितीचा काळ, त्याची भव्यता आणि आजचे तिचे स्वरूप बघितले की खरच असे वाटते की किती मोठ्या ज्ञानाची साठवणूक याठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे.
आज अनेक यंत्र, संगणक अनेक सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. विज्ञानाने आज खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. परंतु ही वेधशाळा पाहून समजते की, त्याकाळी अवकाशाचा वेध घेण्यासाठी, त्याच्या अंतरंगातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी किती अभ्यास करून, कष्ट घेऊन हे सर्व उभारले असेल.
राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर मधील जंतर मंतर (Jantar Mantar) हे ठिकाण म्हणजे एक खगोलशास्त्राची वेधशाळा आहे. या वेधशाळेची निर्मिती १७२४ ते १७३४ या कालावधीदरम्यान सवाई राजा जयसिंहद्वारा (savai Raja Jaysinha) करण्यात आली होती.
युनेस्कोच्या (Unesco) जागतिक वारसास्थळांच्या यादीत या जंतर मंतर (Jantar Mantar)वेधशाळेला स्थान देण्यात आलेले आहे. या वेधशाळेत प्रमुख १४ यंत्र आहेत. वेळ मोजणे, ग्रहणाच्या तारखा ठरवणे, तारांच्या दिशा आणि गती ठरवणे, सौरमंडलाच्या ग्रहांच्या गती जाणून घेणे अशा अनेक खगोलशास्त्रीय गोष्टी जाणून घेण्याच्या कामात या यंत्रांची मदत होत असे.
जंतर मंतर (Jantar Mantar) येथील यंत्र पाहून आपल्याला भारतीयांच्या अचाट खगोलीय ज्ञानाची प्रचिती येते. त्याकाळीही भारतीयांना गणित आणि खगोलशास्त्र या दोन शाखामधील जटिल संकल्पनांचे सखोल ज्ञान होते की, ते या संकल्पनांना एका शैक्षिणक वेधशाळेच्या स्वरूपात सादर करू शकत होते. अशा वेधशाळेमुळे सामान्य जनताही या संकल्पना समजू शकत असे आणि या शास्त्राचा आनंदही घेऊ शकत असे.
जयपूरमध्ये असणाऱ्या जुन्या चंद्रमहालाशी निगडित एक आश्चर्यजनक वास्तू म्हणजे जंतर मंतर (Jantar Mantar) ही खगोलशास्रीय वेधशाळा होय. खगोलशास्त्रीय यंत्र आणि गणिती संरचना यांच्या माध्यमातून ज्योतिषी आणि खगोलीय घटनांचा अर्थ लावून विश्लेषण करण्यासाठी तसेच त्यासंबंधी भविष्यवाणी करण्यासाठी या जगप्रसिद्ध अशा वेधशाळेची निर्मिती जयपूर शहराचे संस्थापक आणि आमेरचे राजा सवाई जयसिंह (द्वितीय) यांनी १७२८ मध्ये आपल्या वैयक्तिक देखरेखीखाली या वेधशाळेच्या निर्मितीची सुरुवात केली.
या वेधशाळेचे काम १७३४ मध्ये पूर्ण झाले. सवाई जयसिंह यांची ओळख एक खगोल वैज्ञानिक म्हणूनही होती. त्यांच्या या महत्त्वपूर्ण पैलूंची ओळख आणि प्रशंसा पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Javaharlal Neharu ) यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ( भारत एक खोज ) या पुस्तकात केलेली आहे. त्यांनी त्यांच्या खगोलीय योगदानाविषयी यात सांगीतले आहे.
जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळेच्या निर्मितीच्या आधी सवाई जयसिंह यांनी बराच अभ्यास केला होता. त्यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये आपले संस्कृतिक दूत पाठवून त्या देशातील खगोल विज्ञानविषयीचे प्राचीन आणि महत्त्वपूर्ण असे ग्रंथ मागवले होते. या ग्रंथांचे त्यांनी आपल्या ग्रंथभांडारात जतन करून ठेवले होते.
हे ग्रंथ अभ्यासण्यासाठी त्यांचा अनुवादही करून घेतला होता. महाराजा जयसिंह (दुसरे ) यांनी देशभरात एकूण अशा पाच वेधशाळांची निर्मिती केली होती. जयपूर, (Jaipur), दिल्ली, (Delhi), वारणसी, (Varanasi), मथुरा, (Mathura) आणि उज्जैन (Ujjaini) या पाच ठिकाणी या वेधशाळा बांधण्यात आल्या होत्या. त्यासाठी त्याकाळातील महान खगोलशास्त्रज्ञाची मदत घेण्यात आली होती.
सर्वप्रथम उजैन येथे सम्राट यंत्र निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली येथील जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळेची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी जयपूर येथील या जंतरमंतर (Jantar Mantar) वेधशाळेची निर्मिती करण्यात आली होती.
या पाचही वेधशाळांपैकी जयपूर येथील जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळा सर्वात मोठी आहे. या वेधशाळेच्या निर्मितीसाठी १७२४ ला सुरुवात करण्यात आली आणि १७३४ मध्ये हे काम पूर्ण झाले. ही वेधशाळा फक्त मोठीच नाही तर येथील यंत्र आणि शिल्प यांची बरोबरी इतर कुठल्याही वेधशाळेशी होऊ शकत नाही हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
सवाई जयसिंह यांनी निर्माण केलेल्या पाच वेधशाळेपैकी आज आपल्याला फक्त दिल्ली आणि जयपूर या दोनच ठिकाणच्या जंतरमंतर (Jantar Mantar) वेधशाळा पाहायला शिल्लक आहेत. बाकी तीन ठिकाणच्या वेधशाळा काळाच्या ओघात नामशेष झालेल्या आहेत.
जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश –
युनेस्कोने १ ऑगस्ट २०१० ला जगातील सात स्मारकांचा समावेश जागतिक वासास्थळांच्या यादीत केला. यात जयपूर येथील या जंतरमंतर (Jantar Mantar) वेधशाळेचा समावेश केला गेला. ब्राजीलची राजधानी ब्रासिलिया येथील वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या ३४व्या आंतरराष्ट्रीय संमलेनामध्ये या वेधशाळेला जागतिक वारसास्थळाच्या यादीत स्थान देण्यात आले.
या वेधशाळेला हा मान मिळाला कारण, आज इतक्या वर्षांनंतरही येथील प्रत्येक यंत्र चांगल्या स्थितीत असून त्यांच्या साहाय्याने बदलते हवामान, ग्रह, नक्षत्र, ग्रहण आदी खगोल शास्त्रीय घटनांची नोंद करता येऊ शकते. जयपूर येथील या जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळेला २०१० मध्ये जागतिक वारसास्थळात स्थान मिळाले. राजस्थानमधील पहिले तर भारतातील २३ वे वारसास्थळ आहे जे जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. इतक्या वैभव संपन्न वारसास्थळाच्या निर्मितीचे सर्व श्रेय महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनाच जाते.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी लाकूड, चुना, दगड आणि अन्य धातू यांच्या साहाय्याने येथील यंत्र निर्माण करण्यात आले होते. यांच्या सहाय्याने अवकाशीय घटनांचा अभ्यास करण्याच्या भारतीयांच्या पद्धतीला अदभूत मानून त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला. याच वेधशाळेतील यंत्राचा वापर करून आजही जयपूर येथील स्थानिक पंचागाचे प्रकाशन करण्यात येते.
दरवर्षी आषाढ पौर्णिमेला खगोलशास्त्रातील पवन धारणा प्रक्रियेच्या साहायाने येणाऱ्या नवीन वर्षातील महत्त्वाच्या घडामोडींचे भविष्य माहिती करून घेतले जाते. येथील यंत्रांपैकी सम्राट यंत्र जे की एक विशाल सूर्य घड्याळ आहे. जयप्रकाश यंत्र आणि राम यंत्र सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. यातील सम्राट यंत्र सर्वाधिक उंच म्हणजे सुमारे जमिनीपासून पुढे जवळजवळ ९० फूट उंच आहे. ज्याच्या मदतीने अचूक वेळ सांगितली जाते.
जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळेतील काही प्रमुख यंत्र
येथील प्रमुख यंत्रांची नावे आहेत- बृहत सम्राट यंत्र, लघु सम्राट यंत्र, जयप्रकाश यंत्र, रामयंत्र, ध्रुवयंत्र, दक्षिणायंत्र, नाडीवलय यंत्र, राशीवलय, दिशायंत्र, लघुक्रान्ती यंत्र, दीर्घक्रान्ती यंत्र, राजयंत्र, उन्नतांश यंत्र आणि दिगंश यंत्र. याशिवाय येथे ज्योतषीय गणना आणि खागोलीय मोजमापासाठीचे क्रान्तीवृत्त यंत्र, यंत्र राज इत्यादी यंत्रानी प्रयोग करण्यात येत असे.
उन्नतांश यंत्र –
जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळेत प्रवेश करताच डावीकडील बाजूस एका गोलाकार बांधलेल्या ओट्यावर दोन मोठे खांब बांधण्यात आलेले आहे. त्या दोन खांबांच्या मधे एक मोठा धातूचा गोळा लटकवलेला आहे. याच गोळ्याला उन्नतांश यंत्र म्हणून ओळखले जाते. या यंत्राने आकाशाचे विविध कोनातील उंचीचे मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग होतो.
दक्षिणोदक भित्ति यंत्र
उन्नतांश यंत्राच्या पूर्वेला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एक इमारत सदृश्य बांधकाम करण्यात आलेले आहे. हेच ते दक्षिणोत्त भित्तीयंत्र होय. या बांधकामाच्या समोरच्या भागातीळ भिंतीच्या मध्य भागातून दोन्ही बाजूनी पायऱ्या केलेल्या आहेत ज्या भिंतीच्या वरपर्यंत बांधलेल्या आहेत. या भिंतीच्या वरचा पृष्ठभाग सपाट करण्यात आलेले आहे. या यंत्राचा उपयोग सूर्याच्या विविध स्थिती, सूर्य क्रांती आणि दिनमान या सर्व गोष्टी जाणण्यासाठी केला जातो.
दिशा यंत्र
हे एक साधे यंत्र आहे. या परिसराच्या मधोमध एक लाल दगडातील समतल वर्गाकार वृत्त तयार करण्यात आलेले आहे. त्याच्या केंद्रापासून चारही बाजूनी समकोण क्रॉस बनवण्यात आलेला आहे. हे एका दिशा यंत्र आहे. ज्याच्या साहाय्याने दिशांचे ज्ञान करून घेण्यात येत असे.
सम्राट यंत्र
जंतर मंतर (Jantar Mantar) मधील सर्वात सर्वात विशाल आकाराचे हे यंत्र आहे. आपली भव्यता आणि विशालता यामुळे याला सम्राट यंत्र असे संबोधण्यात आले. सम्राट यंत्र म्हणजे ज़नु यंत्रांचा राजा. येथे दोन सम्राट यंत्र म्हणजे उन्हातील घड्याळ आहे. एक लहान आणि एक मोठे असे सम्राट यंत्र होय. हे यंत्र सर्वात मोठे असूनही अचूकता आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी हे प्रसिद्ध आहे.
लघु आणि विशाल सम्राट यंत्र म्हणजे उन्हात वेळ दर्शवणारी घड्याळ आहेत. ज्यांची कार्यप्रणाली सामान आहेत. लघु सम्राट यंत्र म्हणजे २० सेकंदात आणि विशाल सम्राट यंत्र २ सेकंदात सूक्ष्म वेळ सांगू शकते. याची भव्यता यांच्या जमिनीपासूनच्या ९० फूट उंचीवरून लक्षात येते. या यंत्राच्या वर एका छत्रीही बांधण्यात आलेली आहे. हे यंत्र ग्रह, नक्षत्र यांची प्रगती, त्यांच्या स्थिती, त्यांच्या वेळा या माहितीसाठी हे यंत्र तयार करण्यात आले होते.
षष्ठांश यंत्र
षष्ठांश यंत्र हे सम्राट यंत्राचाच एक भाग आहे. हे वलयाकार यंत्र सम्राट यंत्राच्या आधाराने पूर्व आणि पश्चिम दिशेला चंद्राच्या आकारात करण्यात आलेले आहे. हे यंत्र ही ग्रह आणि तारे यांच्या स्थिती आणि अंश कोनाची माहिती मिळवण्यासाठी करण्यात येत असे.
ध्रुवदर्शक पट्टिका
जंतर मंतर (Jantar Mantar) येथील हे सर्वात साधे यंत्र आहे. याच्या नावातच त्याचे कार्य दडलेले आहे. हे यंत्र ध्रुव ताऱ्याची स्थिती आणि माहिती मिळवण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. ध्रुवदर्शक चक्रला दिशा दर्शक यंत्र सुद्धा म्हटले जाते.
राशीवलय यंत्र
खगोलीय अक्षांश आणि रेखांश रेषा एका राशीच्या साधनाने मोजली जातात. त्यामध्ये उपस्थित 12 यंत्र 12 राशीची चिन्हे दर्शवितात. जेव्हा प्रत्येक राशी मध्य रेषा ओलांड़ून पुढे जाते तेव्हा प्रत्येक राशीचे यंत्र वापरले जाते. या यंत्राची रचना सम्राट यंत्रासारखीच आहे, परंतु शंकूच्या आकार आणि कोनावर अवलंबून अशी ही 12 यंत्रे भिन्न आहेत. जयपूर वेधशाळेशिवाय अन्य कोणत्याही वेधशाळेमध्ये राशिचक्र उपलब्ध नाही. याशिवाय येथे अनेक लहान मोठे यंत्र आहेत.
याठिकाणाला भेट देण्यासाठी हाती भरपूर वेळ हवा. म्हणजे तुम्हाला येथील प्रत्येक यंत्र नीट पारखून, अभ्यासून बघता येते. विशेषतः आपल्या बरोबर शालेय वयाची लहान मुले असल्यास येथे फिरण्याचा वेळ आणखी वाढू शकतो. इतक्या भव्य आणि विशाल वेधशाळेला भेट देताना आपल्याला भारतीय संस्कृती आणि येथील ज्ञानाचा अभिमान वाटतो.
जंतर मंतर (Jantar Mantar) वेधशाळेला भेट देण्यासाठीच्या काही सूचना.
१) हे स्थान जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत हे स्थान पर्यटकांसाठी खुले असते.
२) येथे भेट देण्यासाठी भारतीय नागरिकांना रुपये ५० तर विदेशी नागरिकांसाठी रुपये २०० इतके शुल्क आकारले जाते.
३) जयपूर शहराच्या अगदी मधोमध ही वेधशाळा आहे, त्यामुळे येथे भेट देणे सोपे आहे.
४) येथील प्रत्येक यंत्र फारच इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला खगोलीय ज्ञान, सायन्स यात विशेष रुची असेल तर येथे तुम्हाला फिरण्यासाठी तीन चार तास लागू शकतात.
५) येथे जर तुम्हाला गाईड ची अवश्यकता असेल तर त्याचा जरूर विचार करावा मात्र त्यांचे दर ठरवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
या ठिकाणाला भेट देण्यासाठे कसे जाल ?
ज्योती भालेराव.