Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळा हा मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj ) यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक आणि समस्त मराठीजनांनाचा स्वाभिमान जागवणारा सोहळा आहे. हा सोहळा 6 जून 1674 या मंगलदिवशी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. ज्यामुळे शिवाजी महाराजांना अधिकृतपणे “छत्रपती” म्हणून घोषीत करण्यात आले. त्याआधीच कितीतरी वर्षांपूर्वी जनमानसात शिवाजी महाराजांनी लाडक्या राजाचे स्थान प्राप्त केले होते. मात्र त्याकाळाच्या पद्धती, रितीनुसार राज्याभिषेक होणे महत्त्वाचे होते. त्यानुसार अथक परिश्रम, धाडस आणि कौशल्याने आपल्या राजांनी मुघल साम्राज्याला आवाहन देत मराठा साम्राज्या उभारले होते. या साम्राज्याला विधीवत पूर्णत्व देण्याचा दिवस म्हणजे 6 जून 1674 हा होय.
महाराजांच्या जीवनातील हा दिवस फक्त मराठी रयतेसाठीच नाहीतर संपूर्ण भारतवासीयांच्या दृष्टीने एक बदल घडवणारा दिवस होता. इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या सोहळ्याची माहीती आपण जाणून घेऊ.
Table of Contents
का केला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही, मोगल साम्राज्य आणि इतर परकीय सत्तांविरूद्ध लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा पाया घातला. स्वराझ्या स्थापन केल्यानंतर, त्याला अधिकृत मान्यता मिळावी, महाराजांना स्वतंत्र हिंदू राजा म्हणून घोषित करावे, यासाठी हा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. तोपर्यंत महाराष्ट्रात कोणीही असे काम केले नव्हते. सर्वजण कोणाच्याना कोणाच्या चाकरीत होते. म्हणून शिवाजी महाराजांचे छत्रपती होणे इतिहासात विशेष ठरते.
शिवराज्याभिषेकाचा दिवस आणि ठिकाण
पहिला शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,शालिवाहन शके 1596 ) रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी मे 1656 मध्ये स्वराज्यात सामील केला होता आणि स्वराज्याची राजधानी म्हणून त्याची निवड केली होती. काही तांत्रिक आणि धार्मिक कारणांमुळे शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 रोजी (अश्विन शुद्ध पंचमी ) पुराणोक्त पद्धतीने केला.
सोहळ्याची तयारी
या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 11,000 ब्राम्हण आणि जवळपास एक लाख लोक रायगडावर जमले होते. यासाठी चार महिने आधीपासून जय्यत तयारी सुरू होती. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन बनवण्यात आले होते. ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले.
सोहळ्याची वैशिष्ट्ये
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरू केली.
शिवराई (चांदीची नाणी ) आणि होन (सोन्याची नाणी ) ही स्वतंत्र चलने चलनात आणली.
महाराजांनी अष्टप्रधान मंडळ अधिकृतपणे स्थापन केले.
हा सोहळा हिंदू परंपरेच्या पुनरूज्जनाचा आणि स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा प्रतीकात्मक संदेश होता. यामुळे मराठ्यांमध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण झाली.
या सोहळ्यामुळे मराठा स्वराज्याला अधिकृतपणे स्वतंत्र राज्याची मान्यता मिळाली.
आज साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा
दरवर्षी हा सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला (तिथीनुसार) हा सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 2025 मध्ये 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी रायगडावक ध्वजारोहण, गड पूजन, शिरकाई देवीचा गोंधळ, पालखी सोहळा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वराज्याच्या विषयी प्रेम, आदर आणि अभिमान जागृत करणारा असा सोहळा आहे.
Leave a Reply