Table of Contents
संत निर्मळाबाई.
महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतालाच संत परंपरेचा, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा मोठा वारसा आहे. त्यांच्याकडून निर्माण करण्यात आलेल्या कवनांचा, अभंगांचा, दोह्यांचा आपल्या दैनंदीन जीवनावर मोठा प्रभाव असल्याचेही दिसून येत असते. यातील अनेक संतांचे काव्य काळाच्या ओघातही टिकून राहीले आहे मात्र असेही काही संत काव्य आहे जे काळाच्या ओघात हरवले आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत कबीर अशा अनेक संतांचे काव्य आणि त्यांची माहिती आजही सहज उपलब्ध आहे. मात्र ज्या संत कवी किंवा कवियत्रींची माहिती काळाच्या ओघात हरवली आहे. अशाच ज्ञात अज्ञात संतांची माहिती मिसलेनीयस भारतच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
या संत परंपरेतील पहिला मोती आहे संत निर्मळाबाई या होय. ज्याकाळात एका विशिष्ट वर्गालाच शिक्षणापासून, मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते, अशा काळात स्रियांची परिस्थीती तर विचारायलाच नको. अशा काळात एका महार कुटुंबातील स्री आपल्या बंधूंसह विठ्ठल भक्तीत दंग तर होतेच पण, त्याकाळच्या सामाजिक प्रश्नांवर आपल्या काव्यातून भाष्यही करते हे सर्व अचंबित करणारे आहे.
मराठी संतपरंपरेचा दाखला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, इतरत्रही दिला जातो. संतांच्या साहित्याचा वारसा गाथांमधून, ग्रंथांमधून जपला गेला आहे. त्यांची कवने, अभंग, ओव्या यांचा अभ्यास अनेकजण करतात. यात संतांबरोबरच संतकवयित्रींच्या साहित्याचाही वाटा मोठा आहे. यांपैकीच एक संतकवयित्री होत्या निर्मळाबाई. संत चोखामेळा अर्थात् चोखोबा यांच्या त्या भगिनी व संत सोयराबाई यांच्या नणंदबाई.
भक्तिपरंपरेतल्या विविध विषयांची ओघवत्या शैलीतली हाताळणी हे निर्मळाबाईंच्या अभंगरचनांचे वैशिष्ट्य. सहजसुंदर आणि समजण्यास सोप्या अशा त्यांच्या रचना भावस्पर्शी आहेत. त्यांच्या रचनांमधून पारमार्थिक, सांसारिक आदी बाबींचा उलगडा होतो. घरातूनच, म्हणजे भाऊ-भावजयीकडूनच, मिळालेला संतपरंपरेचा वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवत आपल्या परीने साहित्यात भर घातली.
संतकवयित्रींचा विचार करता मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई, बहिणाबाई, वेणाबाई आदींच्या रचना आपल्याला प्रामुख्याने आठवतात. मात्र, या मांदियाळीत निर्मळाबाईंचा उल्लेख आजवर कधी आवर्जून केला गेल्याचं स्मरत नाही. निर्मळाबाई यादवकाळात होऊन गेल्या. त्यांचा जन्म, मृत्यू यांबाबतचा निश्चित उल्लेख संतवाङ्मयाच्या इतिहासात कुठेही नमूद नाही. मात्र, संत चोखोबा यांच्या त्या भगिनी व संत सोयराबाई यांच्या नणंद असल्याने या संतदांपत्याचा जो कालखंड तोच निर्मळबाईंचाही कालखंड असणार असा तर्क केला जातो व तो वस्तुस्थितीला धरूनच आहे.
याशिवाय, त्यांच्याविषयीची कौटुंबिक माहितीही साहित्यात वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली आढळते, त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्राचा शोध घेताना अन्य कुठल्याही निष्कर्षाला ठामपणे पोहोचता येणे तसे अवघड आहे. मात्र, चोखोबा यांच्या भगिनी, त्यांच्या शिष्या आणि संतकवयित्री अशी त्यांची ओळख संतवाङ्मयाच्या अभ्यासकांना आहे. निर्मळाबाईंनी विविध विषयांवर अभंगरचना केली. पांडुरंगाची आळवणी, नामस्मरण, प्रपंचातील सुख-दु:खांचं कथन, संत चोखोबांशी असलेला बंधुत्वाचा भाव, संत सोयराबाईंविषयीचा जिव्हाळा त्यांच्या रचनांमधून साकारला आहे.
निर्मळाबाई यांच्याविषयीची माहिती
निर्मळबाई यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहूणराजा येथे झाला. पुढचे अनेक वर्षे त्या येथेच (जिल्हा : बुलढाणा, तालुका : देऊळगावराजा) वास्तव्यास होत्या असा उल्लेख आढळतो. त्या काळी त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागे, त्यामुळे त्यांच्यावर बंधनेही तितकीच होती. संत निर्मळा या संत चोखा मेळा यांची लहान बहिण होत्या तर सोयराबाई यांच्या ननंद असे त्यांचे नाते होते.
सोयराबाईंचे बंधू बंका यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. हे सर्व कुटुंबच भावीक होते. पंढरीची नित्य वारी करणारे असे हे कुटूंब कायम विठ्ठलनामस्मरणात दंग असे. पुढील काळात मेहुणराजावरूण पंढरपूरची वारी करणे त्यांना अवघड होऊन बसल्यावर हे सर्वजण पंढरपूरला वास्तव्यास आले. संत चोखामेळा यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्मळा आणि त्यांचे पती बंका परत मेहूणराजा येथे आले. आज निर्मळा नदीतीरावर त्यांच्या समाधी आहेत.
कर्मकांडाविरोधाचा आवाज !
सुमारे तेराव्या शतकाच्या काळात काही ठराविक समाजांची अवस्था वर्णव्यवस्थेतील भेदभाव आणि कर्मकांडांच्या प्रभावामुळे बिकट होती. त्याविरोधातील एक मुख्य आवाज म्हणजे संत चोखोबा आणि त्यांची बहिण निर्मळाबाई या होत. कर्मकांडांच्या नादी लागण्यापेक्षा नामस्मरण महत्त्वाचे असे सांगताना त्या लिहितात.
संसाराचे कोण कोड । नाही मज त्याची चाड ।
म्हणजे इतर कर्मकांडात अडकण्यापेक्षा नामस्मरणाची गोडी लावा. विठ्ठलाचे नाव घेतले तर काळाचीही सत्ता फिकी ठरते, असे सांगत त्यासाठी त्या शास्र पुराणांचाही हवाला देतात.
एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस ।
जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ।
शास्रे-पुराणे वदती । नाम तारक म्हणती ।
त्याकाळी त्यांना मंदिर प्रवेशाला बंदी असल्याने निर्मळाबाईंनी मनामध्ये स्थित असलेल्या पांडुरंगाची निस्सीम भक्ती केली. मंदिराच्या द्वारी उभ्या राहूनच पांडुरंगाला आळवत त्या म्हणतात…-
आनंदे वोविया तुम्हासी गाईन । जीवें-भावें वोवाळीन पायांवरी ।।१।।
सुकुमार साजिरीं । पाउलें गोजिरीं। ते हे मिरवलीं विटेवरी ।।२।।
कर कटावरी । धरोनी श्रीहरी । उभा भीमातीरीं । पंढरीये ।।३।।
महाद्वारीं चोखा । तयाची बहीण। घाली लोटांगण । उभयतां ।।४।।
ज्याकाळात त्यांना मंदिरातही प्रवेश नव्हता, माणूस म्हणूनही त्यांना जगण्याचा अधिकार दिलेला नव्हता, अशा काळात हे कुटुंब प्रबोधन करत होते, भक्तीचा सहज सोपा मार्ग त्या त्यांच्या अभंग रचनेतून देताना म्हणतात.
अनंत जन्माचे सुकृत पदरी । तोची उच्चारी ओठी हरिनाम ।।
अनंत जन्माचे पुण्य जया गाठी । तोची उच्चारी ओठी हरिनाम ।।
संत निर्मळा म्हणे अनंता जन्माचे । उच्चारिता वाचे पाप जाय ।
पाप पुण्याची भीती दाखवून समाजातील दिन दुबळ्या लोकांचे शोषण होत असे किंबहुना आजही होत आहे, त्यांना यातून सोडवण्यासाठी, भक्तीची, संसाराची सोपी पायवाट दाखवण्यासाठी नामस्मरण हा साधा मार्ग त्यांनी आपल्या रचनांमधून दाखवला.
निर्मळाबाईंच्या अवघ्या चोवीस रचना आहेत. त्यांमधून त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने आपले विचार मांडले आहेत. त्यांचा नामस्मरणावर दृढ विश्वास आहे. ‘वेदशास्त्रामध्येही नामाला महत्त्व देण्यात आलेले आहे,’ असे त्या सांगतात. तीच प्रेरणा घेत त्यांनी पांडुरंगावरील आपली भक्ती नामाच्या माध्यमातून वृद्धिंगत केली. एका रचनेत त्या म्हणतात :
परमार्थ साधावा । बोलती या गोष्टी। परी ये हातवटी। कांहीं त्याची ।।१।।
शुद्ध भक्तिभाव । नामाचे चिंतन। हेचि मुख्य कारण । परमार्था ।।२।।
संत निर्मळाबाई आणि संत सोयराबाईंचे सुंदर नाते –
निर्मळाबाईंना संसारसुखाची ओढ नसली तरी आपली कर्तव्ये पार पाडण्याविषयी त्या कायम आग्रही असायच्या. नणंद-भावजयीचे नाते एरवी फारसे सलोख्याचे नसते, असे आपल्याला भोवतालच्या काही उदाहरणांमध्ये आढळून येत असते. मात्र, निर्मळाबाई आणि सोयराबाई या नणंद-भावजयीचे नाते खूप सुंदर होते. त्यांचे अनुबंध जिवलग सखीसारखे होते.
दोघींच्या मनातील एकसमान धाग्याने – म्हणजेच पांडुरंगाच्या भक्तीने – तर त्यांना बांधून ठेवले होतेच; पण एरवीच्या नातेसंबंधांमधील गोडवाही दोघींनी चांगल्या रीतीने जपला होता. विशेष म्हणजे, त्या दोघींनी एकमेकींवरही रचनाही केल्या आहेत.
सोयराबाई एका रचनेत आपल्या नणंदबाईंविषयी, म्हणजे अर्थातच निर्मळबाईंविषयी म्हणतात :
तीर्थ उत्तम निर्मळा। वाहे भागीरथी जळा।।
ऐसी तारक मेहुणीपुरीं। म्हणे चोख्याची महारी।।
संत निर्मळाबाईंविषयी माहीती मिळवण्यासाठी –
निर्मळाबाईंच्या अभंगांमध्ये पढीकपणा नव्हता. त्यांचे व्यक्तिमत्त्व सरळ आणि साधे होते. त्यामुळे त्यांच्या रचनांमधून प्रकट होणारे भाव थेट मनाला भिडतात. अशा संतकवयित्रीविषयीचे फारसे लेखन उपलब्ध नाही. ‘दहा संतकवयित्री’, ‘मराठी संतकवयित्रींची काव्यधारा,’ ‘महाराष्ट्र संतकवयित्री,’ ‘मराठी संतकवयित्रींचा इतिहास’, ‘श्रीसंत चोखामेळामहाराज यांचे चरित्र, अभंग व गाथा’ अशा पुस्तकांमधून निर्मळाबाईंविषयी वाचायला मिळते.
त्यांच्या आयुष्याविषयी माहिती देणारे फारसे लेखन उपलब्ध नसले तरी महाराष्ट्रातील मराठी संतकवयित्रींमध्ये संत निर्मळाबाई यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जायला हवा.

Leave a Reply