Shravan Mass, श्रावण महिना, महत्त्व आणि सण समारंभ – (२०२३)

आपल्या भारत देशाला सण, समारंभ आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवांचे आयोजन केले गेले असल्याचे दिसून येते. यातला सर्वात मोठा सण-उत्सवांचा काळ आहे तो ‘श्रावण’( Shravan mass) महिन्याचा. सगळीकडे पावसाची संततधार सूरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती, धर्मातील रूढी परंपरांप्रमाणे अनेक लहान मोठ्या सण-समारंभांची रेलचेल आपल्याला अनुभवता येते.

श्रावण महिना ( Shravan mass) हा सात्विक, भक्तीभावाने पुनित असा महिना मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये केले जातात. या एका महिन्यात अनेक लहान मोठ्या सणांचे , व्रतांचे आयोजन करून त्यांचा आनंद घेतला जातो. आजच्या ‘मिसलेनियस भारत’च्या लेखात आपण श्रावण महिन्यात ( Shravan mass) साजरे करण्यात येणाऱ्या सणांची माहिती करून घेणार आहोत.

श्रावण महिन्याचे महत्त्व – (Shravan mass Importance)

वर्षभरात अनेक महिने असताना श्रावण महिन्याला ( Shravan mass) इतके धार्मिक महत्त्व का देण्यात आले आहे ? श्रावण महिन्याला सणांचा राजा असे संबोधले जाते. कारण या विशिष्ट महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्रदान करण्यात आलेले आहे. तसेच या महिन्यात भगवान शंकरांच्या उपासनेला महत्त्व आहे. याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असल्याचे आपल्याला दिसून येतील.

श्रावणी सोमवार –

श्रावण महिना ( Shravan mass) हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तीभावने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात. महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपवास केला जातो. संध्याकाळी सात्विक भोजन करून या उपवासाची सांगता केली जाते.

मंगळागौर पूजन –

महिलांमधील हे एक लोकप्रिय व्रत म्हणता येईल. नवीन लग्न झालेल्या मुलींनी लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणापासून ( Shravan mass). पुढील पाच वर्षे हे व्रत करायचे असते. इतर ओळखीतल्या नववधूंना बोलावून मंगळागौरीची पूजा मांडून, पूजा, आरती करून हे व्रत करतात. संध्याकाळी हळदीकूंकवाचा कार्यक्रम ठेवून, विविध मंगळागौरीचे खेळ, फुगड्या खेळून रात्र जागविली जाते.यावेळी गायली जाणारी गाणी हा मराठी गाण्यांचा मोठा ठेवा आहे. मंगळागौर म्हणजे ‘पार्वती’. शंकर आणि पार्वती हे गृहस्थाश्रमाचे आदर्श उदाहरण मानतात. त्यामुळे आपलाही संसार सुखाचा व्हावा म्हणून ही पूजा करतात. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर होत. तसेच

स्त्रियांना एरवी बाहेर जाण्याची मुभा त्याकाळी नसे. त्यामुळे अशा सामाजिकरित्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतातून मुलींना विरंगुळा मिळत असे. त्यासाठीच अशा व्रतांची योजना आपल्याकडे करण्यात आल्याचे दिसून येते. आज काळ बदलला असला तरी, या व्रतांमुळे महिला वर्गाला वेगळा आनंद मिळतो हे नक्की. आजही हे सण तितक्याच उत्साहाने त्यासाठीच साजरे केले जातात.

नागपंचमी-

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील ( Shravan mass) एक असा सण आहे ज्याचा संबंध आपल्या पर्यावरणाशी जोडला गेलेला सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची अथवा आपल्या परिसरात असेल तर नागाच्या वारूळाची पूजा केली जाते. नागदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यादिवसापासून नागपूजा करण्यात येते असे सांगण्यात येते.

नागपंचमीचा सण आणि महिला –

या सणाच्या निमित्ताने पूर्वी विशेषतः ग्रामीण भागात विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येण्याची प्रथा आहे. गावातील सर्व मुली, स्त्रिया झाडाला मोठे झोके बांधून गाणी गातात, झोके घेतात. कुठे, कुठे मुली हौशीने मेहेंदी काढतात, बांगड्या भरतात. अनेक ठिकाणी मुली या नागपंचमीच्या आधी काहि दिवस एकत्र येऊन फेर धरतात, गाणी गातात, झिम्मा फुगडी खेळतात. पूर्वी मुलींची लग्ने लहान वयात केली जात, त्यामुळे संसाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलींना सासरहून माहेरी आणून थोडा विरंगुळा मिळावा हा हेतू नागपंचमीच्या सणाच्या या सर्व प्रथांमधून दिसून येतो.

ग्रामीण भागातील नागपंचमी, पूजेची पद्धत –

शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त भक्ती भावाने आणि साग्रसंगीत साजरा करण्यात येणारा हा सण होय. कारण ग्रामीण भागांमध्येच जास्त शेती वाडी, त्यामुळे तेथे आढळणारे नाग, साप त्यांची वारूळे दिसून येतात. त्यामुळे स्त्रिया घराची स्वच्छता करून, जमिनी शेणाने सारवून अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. नागाच्या वारूळापाशी जाऊन त्याची पूजा करून, गाणी गाऊन नागाची पूजा केली जाते.

नागाला दूध आणि ज्वारीच्या लाह्या नैवेद्य म्हणून दाखवण्याची पद्धत रूढ आहे. खरं तर यामागे कोठलेही शास्त्रीय कारण किंवा आधार नाही की नाग हे सर्व ग्रहण करतो. मात्र त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या या पद्धती असल्याचे जाणवते. आधुनिक काळात नागपंचमीला नाग पकडून आणून त्यांना लाकडी टोपलीत बंद करून घरोघरी पूजेला नेण्याची एक विकृत पद्धती रूढ झाली होती. आज त्यावर बंदी आणली गेली आहे. हे सर्व सण आपल्या संस्कृती मध्ये पर्यावरणातील अनेक घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे करण्याची पद्धत आहे. त्याचे महत्त्व समजूनच ते साजरे करायला हवेत.

जिवंतिका पूजन –

संपूर्ण श्रावण महिन्यात ( Shravan mass) या जिवंतिका देवीची प्रतिमा देवघरातल्या भिंतीवर लावून हे जिवंतिका व्रत केले जाते. श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे वस्त्र, दुर्वा वाहून त्यांची माळ अर्पण करतात. पूजा करून पुरणाचा नेवैद्य दाखवून एका सवाष्णीला विशेषतः जिला लहान मूल आहे तिला जेवायला बोलावून तिची ओटी भरून हे व्रत केले जाते. काही ठिकाणी लहान मुलांचे औक्षण करण्याचीही पद्धत आहे. याशिवाय दर शुक्रवारी संध्याकाळी दूध- फुटाण्याचा नैवेद्य दाखवून सवाष्णींना हळदीकूंकवाला बोलावले जाते. हि पूजा मुलांच्या आरोग्यासाठी, सुखरूपतेसाठी आणि दिर्घायुष्यासाठी केली जाते.

रक्षाबंधन-

श्रावणात ( Shravan mass) येणारा हा आणखी एक लोकप्रिय सण. बहिण-भावाचं प्रेम व्यक्त करण्याचा हा एक आपल्या संस्कृतीतला सुंदर सोहळा. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाला दीर्घ आयुष्य व सुख मिळो अशी कामना करतात.

पोळा –

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या अनेक सणांमध्ये निसर्ग, त्यातले प्राणी, पक्षी, झाडे यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण साजरे करण्याच्या प्रथा आहेत. यातील शेतकऱी राजाच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे ‘पोळा’. शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र आहे, बैल. ज्याच्यामुळे त्याच्या जमिनीची नांगरणी केली जाते, शेतात पिकं घेतली जातात.

अशा बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे बैल पोळा. शेतकऱ्यांच्या घरात अगदी दिवाळी प्रमाणे या सणाची वाट पाहिली जाते. बैलांना त्यादिवशी अंघोळ घालून, त्यांना छान सजवून, त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून या दिवशी त्यांना गोडधोडाचे जेवण घातले जाते. शहरातही अनेक ठिकाणी मातीचे बैल आणून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.

श्रावणी अमावस्या ,पिठोरी अमावस्या – श्रावण महिन्यातील ( Shravan mass) कृष्ण पक्ष अमावस्येला हरियाली अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवसाला पर्यवरणीय महत्त्व आहे. यादिवशी जर झाडे लावली तर ती जोमाने वाढतात अशी समजूत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या दिवसाचे महत्त्व फार आहे. या दिवशी अनेकजण वृक्षारोपण करतात. तसेच काही ठिकाणी यालामातृदिवसाचेही महत्त्व आहे.

यादिवशी आई मुलांसाठी व्रत करते. खीर पुरी करून मुलांना ती दिव्यासह त्याचे वाण देते. अशा अनेक प्रथा या एका दिवसाशी जोडल्या गेलेल्या आहेत. जसा परदेशात मातृ दिवस साजरा केला जातो तसाच हा एकप्रकारे आपल्या संस्कृतीतील मातृदिवसच आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला –

हा श्रावण महिन्यात ( Shravan mass) येणारा शेवटचा पण अत्यंत लोकप्रिय आणि मोठा सण. श्रावणातील वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषाच साजरी केली जाते. त्याच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला केला केला जातो. दहिहंडी फोडली जाते. पुर्वी हा सण घरगुती पद्धतीने साजरा केला जायचा पण आज त्याला बरेच मोठे सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप आलेले आहे.

असा हा श्रावण महिना ( Shravan mass) घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल.

1 thought on “Shravan Mass, श्रावण महिना, महत्त्व आणि सण समारंभ – (२०२३)”

Leave a Reply