अष्टविनायक गणपती यात्रा – महाराष्ट्र (२०२४)

अष्टविनायक गणपती
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

संपूर्ण भारतातच नाही तर देशविदेशातही आपल्या लाडक्या गणेशाच्या मूर्ती सापडल्याचे उल्लेख आढळतात. इतका हा बाप्पा ग्लोबल आहे. हिंदू धर्मात तर, कोणत्याही कामाची सुरूवात याच आराध्य दैवताच्या पूजनाने करतात. अशा या लाडक्या दैवताची अनेक मंदिरं भारतात आहेत, मात्र महाराष्ट्रातील आठ गणेश मंदिरं भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. ज्यांच्या दर्शनाने अनेक लाभ होतात अशी त्यांची  ख्याती आहे. या आठही गणपती दर्शनाच्या यात्रेला ‘अष्टविनायकाची यात्रा’ असेही म्हणतात. तेव्हा आज आपण या अष्टविनायकांचा महिमा जाणून घेणार आहोत.

अष्टविनायक  गणपती

अष्टविनायक यात्रा –

महाराष्ट्रात विशेषतः या अष्टविनायक यात्रेला महत्त्व आहे. या आठ गणेश मंदिरांना सलग भेट देऊन दर्शन घेण्याच्या प्रथेला ‘अष्टविनायक यात्रा’ म्हटले जाते. खरं तर या आठ गणपती मंदिरांपैकी पाच मंदिरे तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहेत. तर बाकीच्या तीन मंदिरांपैकी दोन रायगड जिल्ह्यात आहेत आणि एक अहमदनगर जिल्ह्यात आहे. तेव्हा या सर्व गणेशांची नावे आणि ती कुठे आहेत ते पाहू –

पहिला गणपती – मोरगाव (पुणे जिल्हा )  – मोरेश्वर

दुसरा गणपती – थेऊर ( पुणे जिल्हा )  – श्री चिंतामणी

तिसरा गणपती – सिद्धटेक (अहमदनगर जिल्हा, कर्जत तालुका)

चौथा गणपती – रांजणगाव (पुणे जिल्हा ) – महागणपती

पाचवा गणपती – ओझर – (पुणे जिल्हा – जून्नर तालुका) -विघ्नेश्वर

सहावा गणपती – लेण्याद्री – ( पुणे जिल्हा ) – श्री गिरिजात्मज

सातवा गणपती – महड – (रायगड जिल्हा ) – वरदविनायक

आठवा गणपती – पाली – (रायगड जिल्हा – सुधागड तालुका ) – श्री बल्लाळेश्वर

या अष्टविनायकांच्या महतीची, त्यांच्या मंदिरांच्या निर्मीतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ –

पहिला गणपती – मोरगावचा मोरेश्वर –

अष्टविनायकांमधिल हा सर्वात पहिला गणेश. यालाच मयुरेश्वर असेही संबोधले जाते. थोर गणेशभक्त ‘श्री मोरया गोसावी महाराज’ यांनी गणेशाची मोठी तपस्या केली होती. त्यांची या गणेशावर गाढ भक्ती होती. त्यांच्या अथक तपस्येतून मोरेश्वर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीवार्द दिला की, तुझ्या अतुलनिय भक्तीने मी प्रसन्न होऊन तुला वरदान देतो की, इथुनपुढे माझ्या नावा सोबतच मानवजात तुझ्या नावाचाही जयघोष करतील, आणि यातूनच “मंगलमूर्ती मोरया” असा जयघोष करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. हे ठिकाण स्वयंभू आहे.

मोरेश्वर

या ठिकाणी संत रामदास स्वामींनीही भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. आपण सगळे जी गणेशाची आरती म्हणतो- सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती रामदास स्वामींना येथेच स्फुरल्याचे सांगतात. इतके याठिकाणाचे महत्त्व आहे. मोरेश्वराची मूर्ती फार सुंदर आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवण्यात आले आहे. मंदिराच्या बाजूने ‘कऱ्हा नदी’ वाहते. या मंदिराचा परिसर एखाद्या छोट्याशा गढी सारखा भासतो. येथील दगडी बांधकाम फार जुने आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुणे शहरातील बारामती तालुक्यात मोरगांव हे गणेशाचे स्वयंभू ठिकाण आहे.

अष्टविनायक यात्रा येथूनच सुरू केली जाते. एरवी संपूर्ण यात्रा करण्याचा मानस नसेल तेव्हा पुणेकर या एका गणपतीच्या दर्शनासाठी येतात. येथून पुढेच महाराष्ट्राचे लाडके दैवत जेजुरीचा खंडोबा असल्याने दोन्ही दैवतांच्या दर्शनाचा लाभ एकाच दिवसात घेता येतो. पुणे शहरातून येथे येण्यासाठी तुम्ही खासगी वाहन तर घेऊन येऊ शकताच. परंतू सार्वजनिक वाहतूकीच्या उत्तम सोयी आहेत.

दुसरा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी –

थेऊरचा श्री चिंतामणी आणि थोरले माधवराव पेशवे यांचे एक अतूट नाते आहे. गणेशभक्तांसाठी हा महत्त्वाचा गणपती आहेच त्यासह पराक्रमी अशा माधवराव पेशव्यांचा मृत्यूही या मंदिराच्या प्रांगणात झाल्याने या मंदिराला अध्यात्मिकतेसह ऐतिहासिक महत्त्व आहे. याच गावात माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या होत्या. अशी सगळी पार्श्वभूमी या ठिकाणाला आहे.

चिंचवडचे सत्पुरूष श्री चिंतामणी महाराज देव यांनी हे मंदिर बांधले. यांच्या कारकिर्दीनंतर सुमारे १०० वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराच्या रचनेत बदल करत त्याच्या वैभवात भर घातली. आज जो लाकडी सभामंडम आपण पहातो तो त्यांच्याच काळातील असल्याचे सांगतात. त्यानंतर पेशव्यांच्या अनेक कारभाऱ्यांनी मंदिराच्या सुशोभिकरणात भर घातली.

या मंदिराचा परिसर फार सुंदर आणि प्रशस्त आहे. मध्यभागी लहान परंतु सुबक मंदिर, मंदिराचा गाभारा, लाकडी सभा मंडप आहे. बाजूचा परिसर बराच मोठा आहे. मंदिराच्या बाजूची तटबंदी सुबक आणि भव्य आहे. पुजारी, भक्तगण यांच्यासाठी रहाण्याची सोयही येथे आहे.

गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

श्री चिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. हा गणराया मांडी घातलेल्या अवस्थेत आहे. येथे एक कदंब वृक्ष आहे. याच ठिकाणी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले होते अशी अख्यायिका आहे. पुण्यापासून थेऊर ३० किमी अंतरावर आहे. मंदिराच्या बाहेर मोठा बाजार भरलेला असतो. त्याच्याच पुढे चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूकीचीही उत्तम सोय आहे.

मंदिराच्या उलट दिशेने चालत गेल्यावर एक घाट लागतो. येथेच माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांचे समाधीस्थळ आहे. ज्या श्री चिंतामणीची भक्ती करत थोरल्या माधवराव पेशव्यांनी कारभार केला त्या आपल्या दैवताच्या दारातच त्यांनी प्राण त्यागावे हा विलक्षण योग म्हणता येईल. असे हे श्री चिंतामणी चे स्थान सुंदर आहे.

तिसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक

हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. या मंदिरात शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमूख आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. श्री सिद्धीविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे, श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण आहे. दौंडपासून १९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

गणपती – सिद्धटेक

चौथा गणपती- रांजणगावचा महागणपती

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव याठिकाणी हे मंदिर आहे. महागणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. याविषयीची दंतकथा अशी – त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी शिवशंकरांना श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हणतात.

महागणपती

या गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. अष्टविनायकांपैकी (Ashtavinayaka) सर्वात प्रभावशाली विनायकाचे रूप मानले जाते. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णेद्वार केला. दहा हात असणारी ही प्रसन्न मूर्ती आणि हे स्थान इ.स. दहाव्या शतकातील आहे. रस्त्यालगतच असणारे हे देवस्थान भक्तांमध्ये बरेच प्रसिद्ध आहे.

पाचवा गणपती – ओझरचा विघ्नेश्वर –

पुणे जिल्ह्यातील जून्नर तालुक्यातील हे प्रसिद्ध गणपती देवस्थान. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. हा गणराया भक्तांचे विघ्न हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या परिसरात भविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची व्यवस्था आहे.

विघ्नेश्वर

सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज

लेण्याद्रीच्या लेण्यांमध्ये वसलेला हा गणपती. कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर वसलेले हे स्वयंभू ठिकाण आहे. पेशवेकाळातच याचा जिर्णोद्वार झालेला आहे. एखाद्या गुंफेसारखे हे मंदिर आहे. लेण्याद्री लेण्यांमुळे येथे कायम पर्यटकांची गर्दी असते.

श्री गिरिजात्मज

सातवा गणपती – महडचा वरदविनायक –

गणेशाचे हे स्वयंभू ठाणे आहे. अष्टविनायकांपैकी हा सातवा गणपती. याला मठ असेही म्हणतात. हे मंदिर फार साधे आहे. अगदी एखाद्या साध्या घरासारखे दिसते. त्याचे छत कौलारू आहे. मंदिराला घुमट आहे. आणि त्याला सुंदर सोनेरी कळस आहे.

वरदविनायक

या मंदिरातील मूर्तीविषयी एक अख्यायिका आहे, सांगितले जाते की, एका गणेश भक्ताला एक स्वप्न पडले, त्या स्वप्नात त्याला एका तळ्यात मूर्ती असल्याचे दिसले. त्या स्वप्नानुसार त्याने तळ्यात शोध घेतला असता, त्याला गणेशाची मूर्ती सापडली. तीच मूर्ती मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे. येथील गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, ही मूर्ती सिंहासनारूढ आहे. पेशवेकाळात इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात बांधण्यात आहे आहे.

आठवा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. या गणपतीची मूर्ती फार सूंदर आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून, डोळ्यात हिरे आहेत. संपूर्ण मंदिर चिरेबंदी आहे. मंदिराच्या आवारात मोठी घंटा आहे, पेशवे चिमाजी अप्पा यांनी ती येथे अर्पण केल्याचे सांगतात. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याला लागून व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसवलेले आहे. पाली खोपोलीपासून ३८ कि.मी अंतरावर आहे तर पुण्यापासून ११ कि.मी अंतरावर आहे.

श्री बल्लाळेश्वर

हे आठही गणेशाचे स्थान निसर्गरम्य आहेत. येथे भक्तांची कायम वर्दळ असते. अनेक जण वेगवेगळे किंवा सलग असे या गणेशांच्या दर्शनासाठी येत असतात. अष्टविनायकांच्या सलग दर्शन यात्रेला अष्टविनायक यात्रा असेही म्हणतात. महाराष्ट्रातील भाविक नेहमीच ही यात्रा करण्याला प्राधान्य देतात. महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून संपूर्ण यात्रा करण्यासाठी महामंडळांच्या बसेस आणि खाजगी गाड्यांच्याही अनेक यात्राबसच्या अनेक सुविधा आहेत. या बसने किंवा खाजगी वाहनांनी तुम्ही अष्टविनायकाची यात्रा करू शकता.

जर तुम्ही धार्मिक असाल तर तुम्हाला धार्मिक समाधान तर मिळेलच पण जर तुम्हाला इतिहास, जुनी मंदिरं यांच्या अभ्यासाची आवड असेल तर त्यासाठीही तुम्ही ही यात्रा करू शकता. त्याचाही तुम्हाला निश्चितच आनंद मिळेल.

  • ज्योती भालेराव.

Leave a Reply