Table of Contents
“रमजान ईद “-मुस्लिम धर्मींयांचा पवित्र सण २०२१
मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा असणारा महिना म्हणजे रमजानचा महिना, या महिन्यात पाळण्यात येणारे रोजा उपवास आणि रमजान ईदचा (Ramadan Eid) उत्सव होय. भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातींचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण समारंभ साजरे करण्याचे स्वरुप कालानुरुप बदलले आहे, तर काहींचे पालन आजही परंपरेप्रमाणेच होताना दिसते. प्रत्येक धर्माचे सण साजरे करण्याच्या पाठीमागे विविध कथा, दंतकथा आणि काही विशेष कारणं आहेत. मात्र बऱ्याचदा आपल्या संस्कृतीत हे सण का साजरे होतात हे पूर्णपणे माहित करून घेतले जात नाही. सर्व जातीधर्मातील हे सण का साजरे होतात याची माहिती होण्यासाठीच ‘मिसलेनियस भारतच्या’ माध्यमातून आपल्या सण-समारंभांची माहिती एकत्रित देणार आहोत.
‘रमजानईद’ (Ramadan Eid) म्हणजे काय –
रमजान म्हणजे ‘बरकती’ आणि ईद म्हणजे ‘आनंद’. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. ह्याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ मिळाले होते. अर्थात त्यामुळे त्यांना अल्लाह (मुस्लिमांचा देव) चे दर्शन झाले. मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगितले जाते. रमजान ईद (Ramadan Eid) या दिवसाला ‘ईद-उल-फित्र’ असेही म्हणतात. फित्र म्हणजे दान करणे. म्हणूनच रमजान ईद (Ramadan Eid) च्या दिवशी अन्नाच्या रुपात दान केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो.
ईद अल्-फित्र –
हा मुस्लिम धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद उल्-सगीर असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या रमजान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात, ज्यांना रोजे पाळणे असे म्हणतात. रमजानचा पवित्र व शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल ह्या दहाव्या महिन्याचा प्रारंभ होतो. या दिवशी उपवासाचे पारणे फेडले जाते. या दिवसाला ईद अल्-फित्र असे म्हणतात. ‘ईद’ म्हणजे आनंद किंवा खुशी. फित्र हे ‘फित्रा’चे छोटे स्वरूप आहे.
फित्रा म्हणजे काय ?
फित्रा हे एक प्रकारचे मापन आहे.प्रचलित, वापरात असलेल्या अंदाजे दोन किलो दान करण्यासाठी काढलेल्या धान्याचा हिस्सा म्हणजे एक फित्रा असतो. ईदपूर्वी एक दिवस हा फित्रा परिसरातील गोरगरिबांना दिला जातो. याचा हेतू हाच की, दुसऱ्या दिवशी ईदच्या नमाजीला जाताना त्यांनी उपाशी पोटी न जाता खाऊन-पिऊन जावे. हा फित्रा कुटुंबातील प्रत्येक जीविताच्या वतीने कुटुंबप्रमुखाने स्वतः लाभार्थीच्या घरी जाऊन, त्याला मानाने दिला पाहिजे. किमान एक फित्रा एका लाभार्थीला देणे अपेक्षित असून गरजेनुसार त्यात वाढ करता येते.
माणसाने आनंद साजरा करताना बेफाम होऊन पैशाची उधळपट्टी न करता आपल्या आनंदात आपल्या आजूबाजूच्या दिन- दु:खी आणि गरजू लोकांना सहभागी करून घेण्यात खरा आनंद आहे, ही इस्लामची शिकवण आहे. थोडक्यात ईद उल्-फित्र म्हणजे ‘फित्रा’ वाटप करण्याचा आनंदाचा दिवस होय.
या ईदपेक्षा बकरी ईद मोठ्या प्रमाणात साजरी करत असल्याने तिला मोठी ईद आणि रमजान ईदला (Ramadan Eid) लहान ईद म्हणतात. या प्रसंगी यथाशक्ती गरजूंना दानधर्म करतात म्हणून हिला ‘ईदुस्सदका’ असेही म्हणतात. ‘सदका’ या शब्दाचा अर्थ ओवाळून टाकणे असा आहे.
करण्यात येणाऱ्या दानाचे महत्त्व आणि ते कोणाला करावे ?
इस्लाममध्ये ज्या व्यक्तीकडे साडेसात तोळे सोने, वर्षभर शिल्लक आहे त्याला एकूण मालमत्तेच्या अडीच टक्के रक्कम ‘जकात’ या अनिवार्य दानाखाली आठ प्रकारच्या गरजू लोकांना (विधवा, वाटसरू, गरजू विद्यार्थी, आई वडिलांचे छत्र हरवलेली प्रौढत्वास न पोहोचलेली व्यक्ती, कर्जाने जर्जर व्यक्ती, इ.) देण्याची प्रथा आहे. हे फक्त वर्षातून एकदा द्यावयाचे असते. या व्यतिरिक्त वर्षभर जे दान स्वखुशीने (सिदके दिल से) दिले जाते, त्याला ‘सदका’ असे म्हणतात. लोकांच्या सोयीकरिता एखाद्याने पिण्याच्या पाण्याची सोय केली, तर त्याला ‘सदका’ असे म्हणतात.
या प्रसंगी विविध प्रकारे आनंद साजरा केला जातो. दानधर्म करणे, प्रार्थना करणे अथवा नमाज पढणे, गोडधोडाचे जेवण करणे आणि नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणे असा कार्यक्रम या दिवशी असतो. या दिवशी सकाळी स्नान करतात. त्यानंतर आपापल्या इच्छेनुसार कपडे, धान्य किंवा पैसे या रूपात खैरात अर्थात दानधर्म करतात. दानधर्म केल्यावरच प्रार्थनेची अनुमती मिळते. दानानंतर उपवास सोडला जातो.रमजान ईदच्या (Ramadan Eid) दिवशी पक्वान्नात खारका, खजूर, द्राक्षे, शेवया (शीरखुर्मा) यांचा समावेश असतो. नंतर नवीन वस्त्र परिधान करून प्रार्थनेसाठी बाहेर पडतात. ही प्रार्थना सकाळच्या वेळेत केली जाते. या दिवशी विशेष प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेला ‘सलत’ असे म्हटले जाते. यामध्ये दोन भाग असतात. प्रार्थना सामान्यत: गावातील किंवा गावाबाहेरील मोठ्या मोकळ्या पटांगणावर केली जाते. या जागेला ‘ईदगाह’ असे म्हटले जाते.
प्रार्थना संपल्यावर ती चालविणारा मुख्य इमाम ‘खुत्बा’ पढतो. खुत्बा म्हणजे कर्तव्यांचा उपदेश. या उपदेशानंतर सर्वजण अल्लाहकडे अर्थात ईश्वराकडे आपल्या सर्वतोपरी कल्याणासाठी मागणे मागतात, ज्याला ‘मुनाजात’ असे म्हणतात. ते झाल्यावर इमाम ‘आमीन’ म्हणजेच ‘शांती असो’ असे म्हणतात. हा प्रार्थनेचा कार्यक्रम संपल्यावर सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन भेटतात आणि ‘ईद मुबारक’ (Ramadan Eid) अर्थात ‘ही ईद तुमच्यासाठी आनंददायी असो’ असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात. नंतरच्या दिवसभरात परिचितांसह मेजवान्या, मित्र नातेवाईकांच्या भेटीगाठी, असा आनंदोत्सव केला जातो.
ज्योती भालेराव.
2 thoughts on ““Ramadan Eid” – The holy festival of Muslims -2021”
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!