Qutub Minar – World Famous High Tower, Delhi – (Building period – 1199 to 1230)

Qutub Minar
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

कुतुबमिनार – जगप्रसिद्ध उंच मनोरा, दिल्ली – (निर्मिती काळ – इ.स. ११९९ ते इ.स.१२३०)

दिल्ली शहरातील एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कुतुबमिनार (Qutub Minar) हे होय. जगातील सर्वात उंच मिनार असा बहुमान मिळालेल्या या ऐतिहासिक वास्तूला अनेक विवादांची किनारही लाभलेली आहे. कुतुबमिनार (Qutub Minar) कोणी बांधला?  कसा बांधला?  का बांधला? याचा इतिहास बराच रंजक आहे. विवाद आहेतच मात्र तरीही भारतीय स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या वास्तूला एकदातरी भेट द्यायलाच हवी. दिल्लीच्या दक्षिणेस १७.७ कि.मी. अंतरावरील मेहरोली भागात हा उंच मनोरा आहे.

Qutub Minar

कुतुबमिनारचा (Qutub Minar) निर्माता कोण ?

दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने प्रथम कुव्वतुल इस्लाम ही दिल्लीची पहिली मशिद बांधली होती. या मशिदीच्याजवळच त्याने पुढे जाऊन कुतुब मिनारच्या (Qutub Minar) निर्मीतीला इ.स. ११९९ला सुरूवात केली होती. या मनोऱ्याला उभारण्याचे कारण असे होते की, या जवळच्या मशिदीमध्ये नमाजसाठी तेथून सगळ्यांना आवाज देता यावा. याशिवाय हा मनोरा म्हणजे सुलतान कुतुबुद्दीन ऐबकच्या पराक्रमाच्या विजयाचा स्तंभ किंवा प्रतिक म्हणून कुतुबमिनार (Qutub Minar) ओळखला जावा अशी त्याची इच्छा होती.

Qutub Minar

कुतुबुद्दीन ऐबकच्या हयातीत या मिनाराचा (Qutub Minar) फक्त पहिला मजलाच निर्माण होऊ शकला. याच्या निर्मीतीकाळातच म्हणजे इ.स. १२१०ला त्याचे निधन झाले आणि दिल्लीच्या गादीवर सुलतान शम्सुद्दीन अल्तमश आला आणि त्याने मिनारचे पुढील काम पूर्ण केले. अखेर इ.स. १२३० मध्ये कुतुबमिनार (Qutub Minar) बांधून पूर्ण झाला. मात्र या काळानंतर सुद्धा या मिनारच्या बांधकामात अनेक बदल, दुरूस्त्या होत राहिल्या. पुढे चौदाव्या शतकात मनोऱ्याच्या (Qutub Minar) शिरोभागाची विजेच्या आघाताने नासधूस झाली.

तेव्हा फिरोजशहा तुघलकाने १३६८ मध्ये चौथ्या मजल्याची पुर्नरचना केली, त्यावर पाचवा मजला चढवला व त्यास घुमटाची जोड दिली. तरीही नंतर हा घुमट १८०३ मध्ये भूकंपामुळे खाली आला. त्यावेळी स्मिथ नावाच्या स्थापत्यविशारदाने नवा घुमट चढवला तथिपि तो मुळ वास्तूच्या शैलीपासून बराच विजोड होता, त्यामुळे त्याला नापसंती दर्शवण्यात आली. शेवटी तो खाली उतरवण्यात आला. आजही हा काढून टाकण्यात आलेला भाग या परिसरात आहे.

Qutub Minar

अशी आहे कुतुबमिनारची (Qutub Minar) रचना !

हा मनोरा (Qutub Minar) हिंदू-मुस्लिम स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. मनोऱ्याच्या वास्तूकल्प इस्लामी वास्तूविशारदाचा आहे तर प्रत्यक्ष बांधणी मात्र तत्कालिन हिंदू कारागिरांनी केली असावी, असे तज्ञ सांगतात. त्यामुळेच या वास्तूच्या बांधणीत भारतीय वास्तूशैलीची वैशिष्ट्ये आढळतात. प्रथम तीन मजल्यापर्यंत असणारा हा मिनार पुढे फिरोज शहा तुघलक ने मिनारच्या चौथ्या मजल्याचे काम पुर्ण करून त्यावर पाचवा मजलाही चढवला. त्यावर गोल घुमटाचे बांधकाम करण्यात आले. ह्याची उंची ७२.५६ मीटर, तळाचा व्यास १४.४० मीटर व शिरोभागाचा व्यास २.७४ मीटर आहे.  विटांपासुन बनलेला हा जगातील सर्वात ऊंच मिनार (Qutub Minar) आहे.

Qutub Minar

कुतुबमिनारच्या (Qutub Minar) खालचे तीन मजले तांबड्या पिवळ्या वाळूचे बांधण्यात आलेले आहे. तर वरचे दोन मजले पांढऱ्या संगमरवरात आहेत व त्यावर तांबड्या वाळूचे आडवे पट्टे आहेत. सुशोभिकरणाच्या दृष्टीने पहिल्या मजल्याच्या रचनेत गोलाकार, तर तिसऱ्या मजल्यात कोनाकृती अशा उभ्या खाचा आहेत. वरचे सर्वात दोन मजले मात्र सपाट गोलाकार आहेत. मनोऱ्याच्या पृष्ठभाग खाचांप्रमाणे आडव्या कोरीव नक्षीने सजवण्यात आलेला आहे. त्यावरच कुराणातील वचने खोदून तसेच अरेबस्क नक्षीप्रकाराचा वापर करून सजावट करण्यात आलेली आहे. या मनोऱ्याच्या (Qutub Minar) आत एकुण ३७६ पायऱ्या आहेत.

Qutub Minar

कुतुब मिनारच्या (Qutub Minar) निर्मिती आधी ह्या परिसरात लाल कोट ही दिल्ली (त्यावेळी धिल्लीका) चे शेवटचे हिंदू राजे तोमर आणि चौहान ह्यांची राजधानी होती. ह्या परिसरात आधी २७ हिंदू आणि जैन मंदिरे होती.ही मंदिरे उध्वस्त करून त्यांच्या दगड – विटांपासुन कुतुब मिनार ची निर्मिती केली गेली. कुतुब मिनारावर (Qutub Minar) एका ठिकाणी “श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता” असे कोरलेले आढळते. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात पहायला मिळतात. कुतुब मिनार ह्या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज ऊभा आहे.

Qutub Minar
Qutub Minar

या मनोऱ्याच्या अगदी समोर कोणत्याही बाजूने उभे राहिले आणि वरपासून खालपर्यंत पाहात गेले तर त्याच्या भव्यतेने आपला जीव दडपून जातो. तसेच त्याची कलाकारी बघून आपण कितीवेळ तरी त्याच्या भवती रेंगाळत रहातो. हा झाला या कुतुबमिनारचा (Qutub Minar) प्राथमिक इतिहास आणि त्याची रचना. आज तुम्ही हा मनोरा पाहायला जाता तेव्हा तुम्हाला आत जाईपर्यंत जाणीव नसते की, तुम्हाला आतमधे फक्त हा मनोराच नाही तर त्याबाजूचा एक विस्तिर्ण कलाकृतीमय परिसर बघायला मिळणार आहे, ज्याचा कोपरानकोपरा पुरातन वास्तूशैलीने भरलेला आहे. येथील प्रत्येक दगड न दगड, भिंतींचे अवशेष, स्तंभ, कोरीव कामं हे आपल्याला अक्षरशः वेड लावतात.

Qutub Minar
Qutub Minar

येथील मुख्य स्तंभ तर प्रेक्षणीय आहेच, मात्र संपूर्ण परिसर एका वेगळ्या वातावरणाने भारलेला आहे. अनेक तास तुम्ही येथे फिरून व्यतीत करू शकतात. येथे भेट द्यायला जायच्या आधी बरेचदा या वास्तूविषयी फार माहिती नसते. फक्त एक उंच मनोरा असणार आहे अशी आपली कल्पना होते. प्रत्यक्षात मात्र येथे भारतीय वास्तूशिल्पाचा अनोखा खजिना दडलेला आहे..

काय आहेत कुतुबमिनारविषयीचे वाद ?

काही इतिहासकारांच्या मते कुतुबमिनार (Qutub Minar) ही आधी हिंदू वास्तू होती, नंतर त्या वास्तूमध्ये थोडेशे बदल करून तिला कुतुबमिनाराचे स्वरूप देण्यात आले. या मनोऱ्याला दिल्लीचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी ११७८ -११९२ मध्येच बांधून घेतले होते, त्याला पृथ्वीलाट असे संबोधले जात असे.  तर आणखी काही जाणकारांच्या मते येथे हिंदू जैन मंदिरे होती. या परिसरात नक्षत्रांची मंदिरे आणि त्याच्या मधोमध हो मनोरा उभा करण्यात आलेला होता. विक्रमादित्याच्या काळातील वेधशाळेचा हा मुख्य निरिक्षण स्तंभ असावा असेही सांगण्यात येते.  

मात्र वास्तूशैलीच्या दृष्टीने या सगळ्याबाबत बरेच विवाद आणि मतभेद असल्याचे दिसून येते. काहींच्यामते मुस्लिमांनी गझनी येथे सुद्धा कुतुबमिनार सारखे दिसणारे दोन मनोरे उभारलेले आढळून आले होते, मात्र हिंदूंचे मनोरे आणि त्यांचे मनोरे यात बरीच तफावत असल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे अनेक वादविवाद असूनही ही वास्तू खुपच प्रेक्षणीय आहे. येथे भेट देण्याआधी या वास्तूविषयीविषयीच्या अनेक कथा, वाद माहीत करून घ्यायला हवेत. म्हणजे सर्वंकष नजरेतून आपण सर्व परिसर पाहू शकतो. ज्यांना फोटोग्राफी, व्हिडीयोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी तर कुतुबमिनारच्या (Qutub Minar) परिसरातील कोपरानकोपरा म्हणजे पर्वणी आहे.

फोटोग्राफीचे फार नियम नसल्याने तुम्ही येथे मनसोक्त फोटो काढू शकता, फिरू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर जवळजवळ तुम्ही याठिकाणी अर्धा दिवसापेक्षा जास्त काळ घालवू शकता. येथील भेटीची वेळ आहे सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत. भारतीय पर्यटकांसाठी सुमारे ३५ रुपये तिकिट दर, तर विदेशी पर्यटकांसाठी सुमारे ५५० तिकीट दर आहे. दिल्लीस्थित सर्वात उंच असा हा कुतुबमिनार (Qutub Minar)  एकदातरी पहावा असाच आहे.

Author ज्योती भालेराव.

या ठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

5 thoughts on “Qutub Minar – World Famous High Tower, Delhi – (Building period – 1199 to 1230)”

  1. ज्योती बेटी, बऱ्याच दिवसानी आपली पोस्ट वाचायला मिळाली याचा आनंद शब्दातीत आहे.
    कुतुब मिनार विषयी, ऐतिहासीक पार्श्वभूमी, या मनोऱ्या विषची स्थापत्य कलेचा तपशील, बांधकामाबद्दल अथ पासून इतिपर्यंतचा प्रवास, मनोऱ्या संबंधी चे विवाद, आणि मनोऱ्या सभोवतालच्या इतर प्रेक्षणीय वास्तू यांचे विवरण खूपच सुंदर केले आहे.
    आपल्या अशा लेखांमुळे आम्हां सामान्यांना घर बसल्या देशभरातील प्रेक्षणीय स्थळांची इत्थंभूत माहीती मिळते. त्या बद्धल अनेक धन्यवाद.
    बेटी एक शंका आहे. या लेखातील ” जगातील सर्वात उंच मनोरा ” असे जे विधान केले आहे ते कृपया तपासून घ्यावे कारण युनायटेड अमिराती मधील ” बुर्ज खलीफा ” या मनोऱ्या ची उंची थोडी तपासून घेणे जरुरीचे आहे.
    ( कृपया मागील दोन महीन्यातील लेख पण लवकरात लवकर, अर्थात आपल्या सोयीनुसार पाठविले तर उपकृत होईन.)
    आनंद ग . मयेकर
    ठाणे.

    Reply

Leave a Reply