Table of Contents
अजरामर योद्धा बाजीराव पेशव्यांची पत्नी श्रीमंत मस्तानीबाईचे ( Mastani ) स्मृतीस्थळ – (मृत्यु १७४० पुणे,पाबळ )
मस्तानीबाई (Mastani) या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांच्या सौंदर्यांबरोबरच त्या शौर्यशक्तीसाठीही ओळखल्या जात.परंतु परधर्मीय म्हणजे ‘प्रणामी पंथाच्या’ (Pranami Pantha) असल्यामुळे पुण्यातील कर्मठ समाजाने त्यांचा कधीही स्वीकार केला नाही.

पुण्यातील समाजाने नाकारल्यामुळे शिरूरजवळील (Shirur ) पाबळ या ठिकाणी पेशव्यांनी त्यांच्या वास्तव्याची सोय केली होती. मस्तानीबाईंचे (Mastani) वास्तव्य पुण्यात (Pune) काही काळ शनिवारवाड्यात, (Shanivarwada) तसेच कोथरूड (Kothrud) येथे होते. तो अपवाद वगळता त्यांचे वास्तव्य बहुतांश पाबळलाच राहिले. आज याच ठिकाणी मस्तानीबाईंचा देह विसावलेला आहे.
बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसात म्हणजे इ.स.१७४० मध्ये निजामावर स्वारी करून उत्तरकडे मोठा विजय प्राप्त केला होता, तेव्हा मस्तानीला तिकडे नेण्याचा त्यांचा मानस समजल्यामुळे पुत्र नानासाहेबांनी तिला कैदेत ठेवले, ही गोष्ट बाजीरावांच्या जिव्हारी लागून ते आजारी पडले.
त्यांनी मस्तानीचा (Mastani) ध्यास घेतला असल्याचे समजताच शनिवारावाडा येथे नानासाहेबांच्या कैदेत असलेल्या मस्तानीची सुटका करण्यात आली. तेथून सुटका झाल्यावर ती पाबळ याठिकाणी पोहोचताच बाजीरावांच्या मृत्युची बातमी तीला समजली, तेव्हा मस्तानीनेही विष खाऊन आपल्या जीवनाचा अंत येथेच केला. त्यामुळे पाबळ येथेच तिचा देह विसावलेला आहे. असा या प्रेमकहानीच्या अंताचा इतिहास आहे.
अपराजित योद्धा बाजीरावाच्या पत्नीच्या ( Mastani ‘s ) कबरीचे ठिकाण – पुणे पाबळ
पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर शिरूर तालुक्यात पाबळ आहे. २००० चौरस फुट एवढ्या जागेत मस्तानी गढीचा आवाका आहे. गावात प्रवेश केल्यावर पत्ता विचारत आपण मस्तानीबाईच्या (Mastani) गढी जवळ पोहोचतो. अनेक गावांमध्ये जशी साधी घरे असतात त्यासमान दोन दरवाजे असणारी एक वास्तू आपल्या नजरेस पडते आणि क्षणभर आपल्या काळजात कालवाकालव होते. बाहेर मस्तानी कबरीकडे असा फलक लावला असल्यामुळे याठिकाणाचे महत्त्वतरी अधोरेखीत होते.

आत प्रवेश केल्यावर समोरच थोड्या अंतरावर मस्तानीचे (Mastani) स्मृतीस्थळ आपल्या नजरेस पडते आणि मस्तानी व तिच्या प्रेमाच्या अस्तिवाची जाणीव आपल्याला होते. खर तर पर्यटनाच्या दृष्टीने पाहिल्यास येथे फार काही हाती लागत नाही. मात्र तुम्ही ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या प्रेमात असाल तर तुम्ही येथे रेंगाळत राहता.

हिंदू व मुस्लिम (Hindu and Muslim) दोघांनाही मस्तानी आपली वाटत असल्यामुळे, येथे तिच्या समाधीपुढे दोन्ही पद्धतीची प्रार्थना करण्यासाठीची सोय करण्यात आली आहे. समाधीच्या शेजारी हिंदू पद्धतीने दिवा लावण्यासाठी कोनाडावजा जागा आहे. समोरच्या बाजूला नमाज अदा करण्यासाठी प्रशस्त ओसरी आहे. या ओसरीवर पेशवे बाजीराव आणि मस्तानीबाईंच्या (Mastani) माहितीचा फलक आणि मस्तानीचे छायाचित्र लावण्यात आलेले आहे.
याच्या बाजूने लाकडी कमानींचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. छत्रसाल राजाची (Chatrasal raja ) कन्या मस्तानीबाई या बुंदेलखंडाहून पेशव्यांसोबत पुण्यात आल्या, तेव्हा त्यांचे सेवकही आले होते. त्यांच्याही कबरी येथे आहेत. या कबरींचा ठेवा सोडला तर जुन्याकाळच्या वैभवाचे कोणतेही अवशेष आज आपल्याला येथे सापडत नाहीत.

मस्तानीबाई जीवंत असताना जशी एक भग्न पोकळी तिच्या आयुष्यात होती, तशाच भग्नावस्थेत आज हे वारसास्थळ आहे. असे असूनही तुरळक प्रमाणात का होईना पर्यटकांची गर्दी येथे होते हे विशेष. बाजीराव-मस्तानी यांच्या अजरामर प्रेम कहानीला असणाऱ्या वलयामुळे तसेच मस्तानीच्या अस्तित्वाला, तिच्या अमर प्रेमाला दाद देण्यासाठी ही गर्दी होत असावी असे येथे फिरताना वाटत रहाते.
बुंदेलखंडच्या (BundelKhand) मस्तानीचा असा झाला बाजीरावाशी विवाह – Mastani History
दिल्लीचा वजीर “मोहम्मद खान बंगेश” छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा चिकाटी आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध होता.
त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल राजाने आपण शरण आलोय असे भासवून, हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले आणि मदतीची याचना केली.
कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तो एकच परमप्रतापी पुरुष त्यावेळी भारतात होता. त्याने “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा “गजन्तमोक्षाचा” हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली.
पत्र मिळाल्यावर लगेचच ३५-४० हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही.
बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. या मुलुखासह आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी “मस्तानी” बाजीरावास दिली. अशा प्रकारे या राजकीय प्रसंगातून झालेल्या विवाहाचे कालांतराने एका अजरामर प्रेमकहानीत रूपातर झालेले सगळ्या जगाने बघितले.
मस्तानीबाई विषयीचे काही अपसमज –
मस्तानी ही राजनर्तकी होती हा एक लोकप्रिय अपसमज. मात्र ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या होती. राजा जरी हिंदू होता मात्र त्याला मुस्लिम राणीपासून झालेली होती मस्तानी ही कन्या. त्यामुळे ती अनौरस असल्याचा अपसमजही त्याकाळी जाणूनबूजून पसरवल्याचे लक्षात येते.
छत्रसाल हा प्रणामी पंथाचा होता. हा पंथ सेक्युलर विचारांचा. छात्रसाल राजा त्या पंथाचा महत्त्वाचा भाग होता. त्याच्या त्या पंथाच्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली. त्यामुळेच ती नमाजही अदा करत असे आणि कृष्णाची पूजाही करत असे. मात्र त्याकाळच्या पुण्यातील कर्मठ समाजाने हेतुपरस्त तीला फक्त मुस्लीम ठरवून बाजीरावाच्या या पत्नीला नाकारले.
मस्तानी ही उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार नृत्यकुशल होती. कृष्णाची भजने गात ती नाचत असे. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतीण वा वारयोषिता नव्हती.मात्र तिच्या विषयी अशा अनेक कंड्या पिकवण्यात तत्कालीन समाज यशस्वी झाल्याचे समजते.
मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. असे म्हणतात की तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे. याला मात्र काही ठोस पुरावा नाही मात्र ती अलौकीक सौंदर्यशालीन होती हे खरं.
मस्तानी (Mastani) ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली होती आणि त्यांना समशेर बहादुर (Samsher Bahadur) नावाचा मुलगा होता. हेच एतिहासिक सत्य होय.
ज्याकाळी बहुपत्नीत्व ही प्रथा सर्वसामान्य होती त्याकाळी असे अनेक अपसमज पसरवून मस्तानीला (Mastani) कायम दुय्यम लेखले गेले. तीचा बाजीरावाची पत्नी असण्याचा हक्क हिरावून घेतला गेला.
मात्र नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात मस्तानी प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिने अभ्यास केला होता. अशा विद्नान स्त्रीला आपल्या पत्नीचा दर्जा देण्यासाठी आयुष्यभर बाजीरावाला मोठा संघर्ष करावा लागला. अपराजेय योद्धा असणाऱ्या बाजीरावाच्या वैयक्तीक आयुष्याची ही शोकांतिकाच ठरली.
आयुष्यभर ज्या मस्तानीची आणि तिच्या प्रेमाची उपेक्षा झाली, ती तिच्या मृत्यूनंतरही संपली नसल्याचे तिच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर जाणवत राहते. सध्या या समाधीची देखभाल मस्तानीचे वंशज महंमद इनामदार हे करतात. मात्र शासन आणि लोकसहभागातून येथे पर्यटनपूरक बदल करायलाच हवेत असे प्रत्येक सच्च्या इतिहास प्रेमीला वाटते. जास्तीत जास्त लोकांनी या स्थळाला भेट देऊन,शूरवीर पेशवा बाजीराव आणि मस्तानी यांच्या अजरामर प्रेमाला एकदा सलाम करावा, असे हे स्थळ आहे हे निश्चित.
– ज्योती भालेराव.
Leave a Reply