Table of Contents
जन्माष्टमी, गोपालकाला आणि दहिहंडीचा लोकप्रिय उत्सव – ( ३० ऑगस्ट २०२१)
भारतामध्ये अनेक जाती-धर्म आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक समाजाच्या चालीरीती नुसार अनेक धार्मिक, सांस्कृतिक सण साजरा केले जातात. या सर्व सणांमध्ये संपूर्ण देशामधील विविध प्रांतांमध्ये साजरा होणारा उत्सव म्हणजे, श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) हा उत्सव होय. हा उत्सव घराघरामध्ये तर साजरा केला जातोच.
तसाच तो सार्वजनिक स्वरुपातही साजरा करण्यात येतो. जन्माष्टमी (Janmashtami) – या उत्सवाला गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस असेही म्हणतात. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्री कृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्याप्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो.
कसा साजरा केला जातो हा उत्सव –
भारताच्या विविध प्रांतात विविध पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात दहिहंडी केली जाते. गोकुळ, मथुरा, वृदांवन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. ओरीसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहिभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णीमान्त महिना असलेले पंचाग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृदांवनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तिने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलिलाचे सादरिकरण केले जाते.
या उत्सवाचे साधारण स्वरूप पुढील प्रमाणे – कृष्णजन्माच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळणा सजवून रांगत्या श्रीकृष्णाची साग्रसंगीत पूजा केली जाते, भजन, किर्तन आणि प्रसाद वाटून कृष्णजन्म साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, दहिहंडी साजरी करून उत्सव केला जातो.
अशा प्रकारे विविध प्रांतात विविध पद्धतिने कृष्ण भक्ती साजरी केली जाते.
विशेष गोष्ट ही की, भारताच्या बाहेरील काही देशही हा उत्सव साजरा करताना दिसतात. नेपाळ सारखे हिंदू राष्ट्र हा उत्सव साजरा करतो.रात्री पर्यंत उपवास करून जन्माष्टमी साजरी केली जाते. भक्त भगवत गीतेचा अध्याय वाचतात, पुजा करतात, भजनं म्हणतात. कृष्णाच्या मंदिराला सजवले जाते. बांग्लादेश – येथेही हा उत्सव साजरा करण्यात येतो. या देशातील ढाकेश्वरी मंदिरापासून एक यात्रा काढली जात असे. याशिवाय फिजी या देशातही कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाते.

गोपाळकाला –
कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहिहंडी आणि कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने हा प्रसाद केला जातो. गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र करणे. गोपाल कालाचा प्रसाद करण्याची कोणती एक पद्धत नाही. विविध ठिकाणी मिळणाऱ्या साध्या साध्या पदार्थांपासून हा काला तयार केला जातो. यातून श्रीकृष्ण श्रीमंतीचा नाही तर साध्या गोष्टींचा, भक्तीचा भुकेला आहे हा संदेशच दिला जातो.
पोहे, ज्वारीच्या लाह्य, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिळेल ते साहित्य एकत्र करून त्याचा काला तयार करण्यात येतो. हा काला श्रीकृष्णास फार प्रिय म्हणून त्याचे आजच्या दिवशी फार महत्त्व मानतात. श्रीकृष्ण आणि त्याचे बालसवंगडी एकत्र मिळून हा काला यमुनेच्या काठी तयार करत असत असे मानले जाते.

दहिहंडी – कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दहिकाला होतो. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन तेथे टांगलेल्या शिंकाळ्यांतील मडक्यातील दही खायचा. त्यासाठी सर्व मित्र मिळून एकमेकांची साखळी करून मनोरा रचून ते मडके फोडत असत.
कदाचित त्याचेच प्रतिक म्हणून ही दहीहंडी आजही उत्साहात साजरी केली जाते. त्यासाठी अनेक गाणी म्हटली जात. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला अशा प्रकारची गीते म्हटली जातात. नंतर गोपाळकाला करून एकत्र हा प्रसाद खाल्ला जातो. अशा प्रकारे या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील घटक एकत्र येऊन आनंद साजरा करतात. कदाचित हेच या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल.
ज्योती भालेराव.
Leave a Reply