Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे.

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर हे वारकरी संप्रदायासाठी जणू पंढरीच आहे.

“आता विश्वात्मके देवे,

येणेवाग्यज्ञे तोषावे,

तोषोनि मज द्यावे पसायदान हे” !

असे आवाहन आपले गुरू निवृत्तीनाथांना करून समस्त मानवजातीसाठी पसायदान मागणाऱ्या आणि वयाच्या २१व्या वर्षी म्हणजे इ.स.१२९६ ला संजीवन समाधी घेणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची कर्मभूमी म्हणजे ‘देवाची आळंदी’  हे गाव होय.

या आळंदी गावाला ‘देवाची आळंदी’ असे म्हणतात (Devachi Alandi Pune) कारण चोराची आळंदी आणि म्हसोबाची आळंदी नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर देवाची आळंदी आहे.

Dnyaneshwar Maharaj

समग्र वारकरी सांप्रदायाचा ठेवा या ठिकाणी नांदतो. संत कवी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ या अलंकापुरीत व्यतीत केलेला आहे. समाजाला भक्तीचा मार्ग दाखवत, समाजप्रबोधन करत आणि सामान्यांसाठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करून झाल्यावर आपले कार्य समाप्त झाले असे सांगून याच गावात त्यांनी संजीवन समाधी घेतली. (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) त्यामुळे या गावाला आणि येथील समाधी स्थानाला वारसास्थळाचे महत्त्व आहे.

या समाधी स्थानाजवळील मंदिर इ.स.१५७० दरम्यान बांधण्यात आले असल्याची नोंद आहे. मंदिरातील बांधकामात वेळोवेळी बरेच बदल आणि वाढ करण्यात आल्याचे दिसून येते.

एका बंद खोलीत माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती. त्यानंतर तिथे दगडी समाधी बांधण्यात आली आणि त्याठिकाणी  माऊलींच्या पादुका स्थापित करण्यात आलेल्या आहेत. (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi)

माऊलींच्या समाधी दर्शनासाठी येथे कायमच गर्दी असते. संजीवन समाधी शिवाय याठिकाणी सुवर्णपिंपळ, नाथपार व अजानपिंपळ हे तीन पुरातन वृक्ष आहेत. ज्याचे भाविकांच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. (Devachi Alandi Pune)

सुवर्णपिंपळ –

ज्ञानेश्वरांच्या आई रूक्माणीदेवींनी संन्यास घेतलेले आपले पती विठ्ठलपंत परत यावेत यासाठी याच सुवर्णपिंपळाला दशलक्ष प्रदक्षिणा घातल्याचा उल्लेख आहे.

नाथपार

पैठणचे श्री संत एकनाथ महाराज यांना श्री माऊलींचा साक्षात्कार झाला. सर्वांच्या कल्याणासाठी समाधी अवस्थेत चिरंतन बसलेल्या माऊलींच्या कंठाशी येथील अजानवृक्षाची वाढलेली मुळी बोचू लागली होती. ती बाजूला सारण्यासाठी संत श्री एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन आळंदीस बोलावून घेण्यात आले. हा दृष्टांत झाला तेव्हा माऊलींनी समाधीस बसून ३०० वर्षे होऊन गेली होती. तत्कालीन समाजाला या समाधीचे विस्मरण झाले होते. समाधीस्थान कुठे आहे, त्यात उतरावे कसे, ती मुळी मी काढावी कशी अशा उतावीळ अवस्थेत एकनाथ महाराज ज्याठिकाणी अनुष्ठानास बसले होते त्याठिकाणाला नाथपार असे म्हणतात.

ज्ञानदेवांनी त्यांच्या आयुष्यात काही प्रसंगी चमत्कार केल्याचे सांगण्यात येते. चमत्काराशिवाय नमस्कार नाही या उक्तीप्रमाणे काही आख्यायिका सांगण्यात येतात. त्या प्रसंगातील काही जागा आळंदी येथे आहेत.

ज्ञानदेवांनी चालवलेली भिंत  –

संत ज्ञानेश्वरांनी संत चांगदेवांचे गर्वहरण करण्यासाठी निर्जीव भिंत चालवली होती. ते ठिकाण आजही येथे संरक्षित करून ठेवण्यात आलेले आहे. सध्या येथे पुनर्रचित, प्रतिकात्मक भिंत बघायला मिळते.

मुक्ताईने ज्ञानोबाच्या पाठीवर भाजले  मांडे

संन्याशाची पोरं म्हणुन समाजाकडून चारी भावंडांचा छळ केला जात असे. अशाच एका प्रसंगी बहीण मुक्ताईला मांडे भाजण्यासाठी लागणारे खापराचे भांडे देण्यास कुंभारांनी नकार दिला. तेव्हा ज्ञानोबांनी आपल्या योगसामर्थ्याने शरीरात उर्जा निर्माण करून मुक्ताईला आपल्या पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. ही घटना ज्याठिकाणी घडली त्या ठिकाणी आज एक मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिराची अवस्था फार चांगली नाही. मात्र भाविक  या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात.

मुख्य मंदिराच्या बाजूला इंद्रायणी नदीचा नयनरम्य घाट आहे. विस्तिर्ण घाट, दगडी पायऱ्या, त्याबाजूने बांधलेले कमानींचे सभामंडप हे सर्व या घाटाच्या भव्यतेत भरच घालतात.

येथे भेट दिल्यानंतर प्रत्येकाच्या ओठी एवढेच येते की,

धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा,

कृष्णपक्षी तुज निर्धारी, भेट देने जाईन,

कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरिशी दुसरी.

 कृष्णपक्षी  निर्धारिसी,तुज दिधकी असे.

संत ज्ञानेश्वर कुटंबाचा इतिहास (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi)

संत ज्ञानेश्वर हे १३व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होऊन गेले. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. कुलकर्णी हे त्यांचे उपनाव. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ , धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती.

ज्ञानोबांनी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली. अध्यात्म आणि तत्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ निर्मितीतून मराठी जगताला दिला. ज्याकाळी सामान्यजनांना संस्कृत भाषा समजत नव्हती अशावेळी संस्कृत भाषेतच असणारे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचत नव्हते तो मार्ग ज्ञानेश्वरांनी मराठीतून ग्रंथसंपदा निर्माण करून मोकळा केला.

त्यांचा जन्म इ.स.१२७५ला औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव येथे झाला. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे गाव आहे. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतला, मात्र गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थ आश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांनी पुढे जगाला ज्ञानमार्ग दाखवला. त्याकाळी संन्यासाची मुले म्हणुन या चारही भावंडांना समाजाच्या हेटाळणीला सामोरे जावे लागले. तिर्थयात्रा करत विठ्ठलपंत आळंदी (Devachi Alandi Pune) येथे येऊन स्थायिक झाले. परित्यक्त ब्राम्हण म्हणुनच त्यांना आपले आयुष्य कंठावे लागले. शेवटी ज्ञानेश्वरांच्या मात्या-पित्यांनी देहांत प्रायश्चित घेतले मात्र तरीही या भावंडांचा समाजाकडून होणारा छळ कमी झाला नव्हता. अशा परिस्थीतीत ज्ञानोबांनी आपल्या प्रतिभेने आपल्या वयाच्या १६ वर्षी, मराठीतील महत्त्वाचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिला, त्याठिकाणाचे महत्त्व काय, तसेच त्यांची इतर महत्त्वाची ग्रंथसंपदा याविषयीची माहिती पुढच्या भागात पाहणार आहोत.

Authorज्योती भालेराव.

2 thoughts on “Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!