Aaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument

Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

आगाखान पॅलेस – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय स्मारक.

महाराष्ट्रातील पुणे शहरात असताना जर तुमच्याकडे एक दिवसाचा वेळ आहे आणि फार लांब न जाता तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी, ऐतिहासिक ठेव्यासह निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायची इच्छा असेल तर तुम्ही पुणे-नगर रस्त्यालगत असणाऱ्या आगाखान पॅलेसला नक्कीच भेट द्यायला हवी. पुण्यातील आगाखान पॅलेस (Aagakhan Palace) हे ठिकाण ‘महात्मा  गांधी राष्ट्रीय स्मारक’ (Mahatma Gandhi National Monuments) म्हणुनही ओळखले जाते. एकेकाळी पॅलेस म्हणुन बांधलेली ही वास्तू ब्रिटीश काळात मात्र स्वातंत्र्यसंग्रामात देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांच्या बंदीवासाचे ठिकाण झाले होते. पॅलेसच्या आवारात असणारी भरपुर झाडी, शांत वातावरण यामुळे येथे पर्यटक बराच काळ रमतात.

आगाखान यांच्याविषयीची माहिती –

सूलतान मोहम्मद शाह (Sultan Mohammad Shah) यांच्या पूर्वजांना १८३० मध्ये पर्शियाच्या राजाने आगाखान हा किताब दिला होता. पहिले आगाखान १८४३ मध्ये पर्शियाहून भारतात आले. आगाखान दुसरे यांचा जन्म मुंबई येथे झाला. १८८५ मध्ये त्यांचा मृत्यू  झाला. त्यांचा मुलगा म्हणजे सर महंमद शाह (आगाखान तिसरे) यांनीच १८९०ला पुणे-नगर रस्त्यावर ही जमिन खरेदी केली होती आणि हा पॅलेस बांधला. यांचा जन्म २ नोव्हेंबर १८७७ ला कराची येथे झाला. वयाच्या ८व्या वर्षी ते आगाखान झाले. १९३० मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेस ते प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दोन्ही महायुद्धात त्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले होते. १९६९ मध्ये राजपुत्र शाह  करिम अल हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी ही वास्तू देशाला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २२ फेब्रुवारी १९६९ ला हा पॅलेस महात्मा गांधी स्मारक निधी कडे सुपुर्द करण्यात आला. सध्या या पॅलेसची देखभाल भारतीय पुरातत्व खात्यातर्फे करण्यात येत आहे. २००३ रोजी हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्यात आले आहे.  

आगाखान पॅलेसचा इतिहास – Agakhan Palace History

हा महाल इ.स. १८९२ मध्ये सुलतान महमंद शाह आगाखान (तिसरे) यांच्या कारकीर्दीत निर्माण केला गेला. आपल्या विश्रामासाठी ते या महालाचा वापर करत असत. त्यांनी हा महाल बांधला कारण त्याकाळी मोठा दुष्काळ पडला होता. पुण्याच्या आसपासच्या लोकांना कुठलाही रोजगार उपलब्ध नव्हता. लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या महालाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. यामुळे सुमारे एक हजार लोकांना रोजगार मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यातून लोकांच्या गरजा पुर्ण झाल्या. सुमारे पाच वर्षे याचे बांधकाम सुरु होते.

पूर्वी या इमारतीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून सुद्धा ओळखले जात असे. ७२ मीटर लांब आणि २१ मीटर रूंद अशी ही भव्य वास्तू आहे. या वास्तूच्या बांधकामात ब्रिटीश, इटालियन, फ्रेंच, मुस्लीम अशा विविध स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो. अतिशय सुंदर दिसणारी ही वास्तू आणि अन्य परिसर हा जवळजवळ १९ एकरच्या परिसरात व्यापलेला आहे. त्यातील मुख्य इमारत ७ एकरात बांधलेली असून बाकी भागात निसर्ग फुलवलेला आहे. मुख्य इमारतीसमोरील कारंजे विलोभनीय आहे. या महालात एकुण पाच दिवाणखाने आणि प्रशस्त व्हरांडे आहेत. या प्रासादात सुलतान मोहम्मद शाह आणि त्यांचे कुटुंबीय काही काळ वास्तव्यास होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारने ही वास्तू ‘ भारतीय सुरक्षा कायद्याद्वारे’ ताब्यात घेतली होती.

ब्रिटीशांकडून कारागृहाप्रमाणे वापर –

इ.स. १९४२ ला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली  ‘चले जाव’ ची चळवळ सूरू झाली. त्यावेळी  या वास्तूत महात्मा गांधी (Mahatma Gandhi )व त्यांच्या पत्‍नी कस्तुरबा गांधी (Kasturba Gandhi ) यांना ९ ऑगस्ट १९४२ मध्ये नजरकैदेत ठेवले गेले. पुढे सुमारे दोन वर्षांनी ९ मे १९४४ रोजी गांधीजींची तेथून सुटका करण्यात आली. परंतु त्याआधी याठिकाणी गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई  (Mahadev Desai)  यांचे ह्रदयविकाराने १५ ऑगस्ट १९४२ रोजी निधन झाले. तर कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी येथेच बंदिवासात असताना निधन झाले. चार्ल्स कोरिया यांनी येथे दोघांच्या समाधी बांधून घेतल्या. गांधी दांपत्यासह सरोजनी नायडु, श्रीमती मिराबेन, श्रीमती प्रभावती नारायण, डॉ. एम.डी.डी गिल्डर आणि प्यारेलाल नय्यर अशा अनेक नेत्यांना इथे बंदी ठेवण्यात आले होते.

महालाच्या मुख्य इमारतीच्या मागे काही अंतर चालून गेल्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात ‘बा’ आणि ‘महादेव भाई’ यांच्या समाधी आहेत. गांधीजींच्या (Mahatma Gandhi) मृत्युनंतर त्यांच्या अस्थींचा काही भाग येथे कस्तुरबांच्या समाधी शेजारी तुळशी वृदांवन बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणाला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.

Mahatma Gandhi

महात्म्याच्या आठवणींचे संग्रहालय – Mahatma Gandhi

आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांनी वापरलेल्या अनेक वस्तू आणि छायाचित्रे बघायला मिळतात. त्यासाठी स्वतंत्र आगाखान पॅलेस संग्रहालय (Agakhan Palace Museum) सुरू करण्यात आले आहे. गांधींजीचे वास्तव्य ज्याखोलीत होते ती खोली पर्यटकांना काचेतून पहाता येते. गांधीजींची (Mahatma Gandhi) गादी, चरका त्यातून आपल्याला दिसतो आणि आपलं मन खरोखर एका महात्म्याच्या आभासाने भरून जाते. पुढच्या दालनात  गांधीजी आणि बा यांच्या रोजच्या वापरातील भांडी, चपला, कपडे, जपाची माळ, चष्मा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. १९८० पासून गांधी स्मारक समिती आगा खान पॅलेसची व्यवस्था पाहते. हे संग्रहालय नीट पहायचे असेल तर तुमच्याकडे किमान दोन तास नक्कीच पाहिजे.

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi

प्रशस्त लॉन, मोठे व्हरांडे, मोठा बगीचा यांमुळे येथे इतिहासाची आवड असणाऱ्यांसह फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांचाही राबता असतो. येथील भेटीची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी असून प्रत्येकी १५ रूपये तिकिट दर आहे. जर तुम्हाला डिजिटल कॅमेरा आत न्यायचा असेल तर त्यासाठी वेगळे दर आकारले जातात. पुण्यात असाल तेव्हा एखादा रविवार याठिकाणासाठी राखून ठेवायला हरकत नाही हे नक्की. गांधीमय असणाऱ्या या स्मारकाची ही भेट तुम्हाला प्रेरणादायी ठरेल.  

ज्योती भालेराव.

3 thoughts on “Aaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument”

Leave a Reply