The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case : नुकतीच सोनी लाईव्ह प्लॅटफॉर्मवर एक वेबसिरीज रिलिज झाली आहे. एक सुन्न अनुभव देणारी अशी ही कलाकृती आहे. काय विषय आहे त्याचा हे नावातूनच समजतं. पण त्याचा बाकी गाभा काय आहे, हे आपण जाणून घेऊ.
प्रासंगिक लेख : 16/07/2025
भारताच्या राजकारणातील एक अतिशय दुःखद घटना म्हणजे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची झालेली निर्घुण हत्या. या हत्येमुळे त्यावेळचे समाजकारण, राजकारण ढवळून निघाले होते. तमिळी भाषिक आणि भाषावाद उफाळून आला होता. भारताच्या या तरूण, तडफदार पंतप्रधानाची हत्या 21 मे 1991 ला आत्मघातकी हल्ल्यात करण्यात आली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात श्रीलंकेत शांती सेना पाठवली होती. त्यामुळे LTTE म्हणजेच ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम’ ही तमिळ बंडखोर संघटना त्यांच्यावर नाराज झाली होती.
राजीव गांधीची हत्या झाली ती एका मानवी बॉम्बचा वापर करून. या हत्येविषयी माहिती देणारी अनेक पुस्तकं काळाच्या ओघात लिहिण्यात आली आहेत. काही चित्रपट, डॉक्युमेंटरी सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या हत्येनंतर तपासयंत्रणांनी कशा पद्धतीने काम केले, त्यांच्यासमोर काय आव्हाने त्याकाळी होती, तंत्रज्ञान तेव्हा इतके प्रगत नसताना, पोलीस आणि एसआयटी टीममधील अधिकारी हे गुन्हेगारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचले, या सगळ्यांविषयी जनसामान्यांना तितकीशी माहिती नव्हती. परंतु सध्या सोनी लाईव्हवर एक जबरदस्त वेबसिरिज रिलिज झाली आहे. या वेब सिरिजचं नाव आहे, ” द हंट : द राजीव गांधी असॅसिएशन केस “.
वेबसिरीजचा प्रवास (The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case )
या वेब सिरिजचा प्लॉट आहे, तो पंतप्रधान राजीव गांधी यांची लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी झालेली हत्या, त्या हत्येच्या तपासासाठी तत्कालिन केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेली टीम, त्या टीम कडून प्रामाणिक पणे करण्यात येणारा तपास, गुन्हेगारांपर्यंत त्यांची पोहोचण्याची पद्धती, अर्मीच्या अधिकाऱ्यांचे योगदान, राजकारणी लोकांचा हस्तक्षेप आणि या सर्व प्रवासाचा शेवट अशी साधारण या सात भागांची कथा आहे.
कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. यातील 90 टक्के भाग हा खरा घडून गेलेला भूतकाळ आहे, याची तुम्हाला सतत जाणीव होत असते. अनेक प्रसंग अंगावर काटा आणतात. तर अनेकवेळा माणसाच्या आयुष्याविषयी विचार करण्यास प्रवृत्त करतात. “नाईन्टी डेज” या ‘अनिरूध्या मित्रा’ यांच्या पुस्तकावर बेतण्यात आलेली ही सिरिज, राजीव गांधींच्या हत्येविषयी अनेक नविन माहिती पुरवते.
खिळवून ठेवणारे चित्रण (The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case )
राजीव गांधी यांची हत्या होण्याच्या आधीच्या पंधरा मिनिटांपासून त्यांची हत्या झाल्याची घटना पडद्यावर थोडक्यात पण परिणामकारक पणे दाखवण्यात आली आहे. त्यानंतर तपासासाठी स्पेशल इन्व्हिस्टिगेशन टिम (SIT) नेमण्यापासून जो प्रवास सुरू होतो, तो शेवटी मुख्य गुन्हेगार, राजीव गांधींच्या हत्येचा कट रचणाऱ्या ‘सिवरासन’ याने, त्याच्या साथिदारांसह केलेल्या आत्महत्येपर्यंत संपतो. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत वेगाने आपल्या समोर येतो. यातील अनेक घटना, प्रसंग आपण वाचलेल्या असतात. मात्र त्याच्या मागच्या बारीकसारीक गोष्टी, प्रसंग पाहून या घटनेची अनेक राजकीय अंगे आपल्याला समजतात.
इतिहासाची आवड आणि राजीव गांधींविषयीच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण असणाऱ्या प्रत्येकासाठी ही वेबसिरीज आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या नागेश कुक्कुनुर यांनी. सर्वच कलाकारांची कामे अप्रतिम आहेत. या हत्येच्या गुन्ह्यात सामील असणाऱ्या एकुण 12 आरोपींना शिक्षा झाली होती. त्यातील मुख्य आरोपी नलिनी आणि तिचा पती यांना पकडण्यासाठी एसआयटी टिमच्या अधिकाऱ्यांनी किती आणि कशी मेहनत घेतली होती, हा भाग फार परिणामकारक झाला आहे.
याशिवाय एलटीटीचा इतिहास, त्यांता म्होरक्या प्रभाकरण, त्याने कसे लोकांना प्रशिक्षण देऊन या हत्येसाठी चिथवले होते हे सर्व या सिरीजमध्ये थोडक्यात मात्र परिणामकारक पणे दाखवले आहे. सर्वात प्रभावी ठरले आहे, ते कलाकारांची निवड. प्रत्येकाची निवड आणि काम अप्रतिम असेच आहे. ‘सिवराजन’ या पात्राचे काम तर कमाल म्हणता येईल. राजीव गांधींची हत्या कोणी केली हे जगाला माहित आहे. प्रत्यक्ष हत्या कोणी केली, कशी केली ? हे सर्व आजपर्यंत माहित आहे, असे वाटणार्या सर्व सामान्यांसाठी ही सिरिज अनेक प्रश्न निर्माण करते. ज्यांना पुस्तकं वाचायला वेळ नाही त्यांनी आवर्जून पहावी अशी ही वेबसीरीज आहे.
आपल्या देशाला कायमची एक जखम देणाऱ्या या घटनेचे बारिकसारिक तपशिल दर्शवणारी, अशी ही कलाकृती आहे. देशाच्या प्रशासनातील अनेक विभाग कसे काम करतात, त्यांच्यावर कोणाचे निश्चित नियंत्रण असते ? देशप्रेम म्हणजे तरी नक्की काय ? आणि शेवटी राजीव गांधींची हत्या नक्की केली कोणी ? एलटीटीई सारख्या अतिरेकी संघटनेने की, सुरक्षाव्यवस्थेतील अत्यंत क्षुल्लक त्रुटींनी की आणखी कोणी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित करून ही सिरीज संपते.
Leave a Reply