Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey (Established – 1907)

Nagpur Zero Mile Stone

भूसर्वेक्षणाचा शून्य मैल दगड, नागपूर (स्थापना – इ.स. १९०७).

देशाची उपराजधानी तसेच ऑरेंजसीटी हीच नागपुर (Nagpur) शहराची ओळख जनसामान्यांमधे प्रचलित आहे. मात्र याच शहराची सुमारे सव्वाशे वर्षांपासून आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देशाचा केंद्रबिंदू. भौगिलीक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असणारे शहर म्हणून प्रचलित आहे. देशाचा केंद्रबींदू ही ओळख  ब्रिटीशकालीन भारतात या शहराला  देण्यात आली होती. त्याचे प्रतिक म्हणून शून्य मैलाचा दगड (zero mile stone ) या शहरात दिमाखाने उभा आहे. हा दगड आणि त्याच्या प्रतिकात्मक स्तंभाची उभारणी इ.स. १९०७ मध्ये करण्यात आलेली आहे.

Nagpur Zero Mile Stone

भारताचे क्षेत्रफळ आणि त्या बाजूचे अंतर मोजता यावे यासाठी नागपुरातच (Nagpur) एक मध्यबिंदू ठरवण्यात आला होता. ब्रिटीशांनी त्या मध्यबिंदूला झीरो माईल स्टोन म्हणजेच शून्य मैलाचा दगड असे नाव दिले. याचा वापर देशाचा नकाशा तयार करण्यासाठी करण्यात येणार होता.ज्याकाळी तंत्रज्ञान तितके पुढारलेले नव्हते, उपग्रहांसारख्या टेक्नॉलॉजी नव्हत्या त्याकाळात असे तंत्रज्ञान वापरून केलेले सर्वेक्षण आणि तयार केलेले नकाशे विशेषच म्हणावे लागतील. नागपुर येथील शून्य मैल दगड बांधण्यापर्यंतचा इतिहास बराच मोठा आणि रोचक आहे.

शून्य मैल दगडाचे बांधकाम – Zero Mile Stone Construction

या ठिकाणी शून्य मैलाचा स्तंभ तयार करण्यात आलेला आहे. त्याच्या बाजूला बऱ्यापैकी सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. त्या स्तंभाच्या बाजूलाच चार घोडे चौफेर उधळतानाच्या स्थितीतील घोड्यांचे पुतळे आपले लक्ष वेधून घेतात. चार दिशांचे प्रतिक म्हणजे हे चार घोडे निर्माण करण्यात आले आहेत. वाळू आणि दगड यांपासून तयार करण्यात आलेले घोड्यांचे हे शिल्प राजस्थानवरून मागवण्यात आले आहे.

या स्तंभावर विविध राज्यांचे अंतर चिन्हांकीत करण्यात आलेले आहेत. कवठा, हैद्राबाद, चंदा, राजपूर, जबलपूर, सीओनी, छिंदवाडा, बैतुल अशा नागपुर (Nagpur) शहराच्या चहुबाजूने असणाऱ्या शहरांची अंतरे दर्शवली आहेत. सध्या हा स्तंभ आपल्या ऐतिहासिक खुणा घेऊन उभा आहे. या ठिकाणी असणारे चार घोड्यांचे शिल्प या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालतात. ब्रिटिशांनी शून्य मैल दगडाची स्थापना केली त्यावेळी आताचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचाच भाग होते.

भारताच्या नकाशाच्या निर्मीतीचा इतिहास –

इ.स. १७६७ मध्ये ब्रिटीशांनी देशाचा नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी भारतावर ब्रिटिशांनी कब्जा केलेला नव्हता मात्र व्यापारासाठी कंपनी देशात हातपाय पसरत होती. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून देशाच्या विविध भागांचे नकाशे करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. नंतर देशावर स्वतःचे राज्य प्रस्थापित केल्यानंतर भूसर्वेक्षणासह नकाशे तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला. त्यासाठी त्यावेळी नागपुर (Nagpur) हे देशाचे मध्यवर्ती केंद्रस्थान असल्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार देशाचा नकाशा तयार करण्याचे काम करण्यात आले. अमेरिकेतील भूमीसर्वेक्षणाचे काम केल्यानंतर भारतातीत भूसर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आर्थर वेलस्ले यांनी स्विकारला. त्यानंतर ब्रिटीशांनी एप्रिल १८०२ मध्ये प्राथमिक तंत्रज्ञान वापरून ट्रिग्नॉमेट्रिक सर्वे ऑफ इंडियाची रितसर स्थापना केली. या विभागाच्या अंतर्गतच ब्रिटिश देशात रस्ते बांधण्याचे कामही हाती घेणार होते. या संस्थेअंतर्गतच सुरुवातीला चेन्नईच्या जवळपास सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्यावेळी बेसलाईन म्हणून फ्लॅट आणि टेकड्यांसारख्या टोपोग्राफिक वैशिष्ट्यांचा वापर करून जमिनीचे सर्वेक्षण केले गेले. ईस्टइंडिया कंपनीने सुरू केलेले हे सर्वेक्षणाचे काम पुढे सत्तर वर्षांनंतर १८७१ मधे पूर्ण झाले. हे सर्वेक्षण पुर्ण केल्यानंतर नकाशे बनवण्याच्या कामाला दिशा मिळाली.

विल्यम लॅम्पटन – भारतीय भूसर्वेक्षणाच्या आरंभीचा ब्रिटीश शिलेदार

ब्रिटिशांनी देशाच्या नकाशाचे काम हाती घेतल्या नंतर या प्रकल्पाची जबाबदारी विल्यम लॅम्पटन याच्यावर सोपवण्यात आली. त्याने इस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले. तो एक ब्रिटिश अधिकारी होता. जो टिपू सुलतान विरूद्ध ब्रिटिश सैन्यात सेवा बजावत होता. काही वर्षांनंतर, सर्वेक्षण सुरू ठेवण्यासाठी हैद्राबादहून नागपुरला (Nagpur) जात असताना लॅम्पटन हिंगणघाट येथे मरण पावला.
वीस वर्ष त्याने या प्रकल्पासाठी काम केले होते. या वीस वर्षात त्याने भारताच्या उपखंडातील दोन लाख चौरस मैलांचे सर्वेक्षण केले होते. त्याच्या मृत्युनंतर नकाशा तयार करण्याचे काम अनेक वर्ष रखडले.

यादरम्यान इ.स. १८१८ मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा तरूणही या कामात सामील झाला. तोपर्यंत बहुतेक भारत ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता आणि पेशव्यांना बिठूर (कानपुर ) येथे पेन्शन दिली गेली होती. या स्थित्यंतरानंतर देशाचे भूसर्वेक्षण आता उत्तरेकडे करण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर हे काम जॉर्ज एव्हरेस्टकडे गेले, ज्याने आजच्या मध्य प्रदेशात सिरोंज पर्यंत सर्वेक्षण केले. त्याचीही तब्येत बिघडल्यानंतर त्याची आजारी प्रकृती ठिक होईपर्यंत त्याला इंग्लडला परत पाठवावे लागले.

पुढे तब्बल ८४ वर्षांनंतर म्हणजे १९०७ मध्ये पुन्हा या कामाला चालना मिळाली आणि नकाशा करण्याचे काम परत जोमाने सुरू करण्यात आले. त्यानुसार नागपूरमधील (Nagpur) सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी हा शून्य मैल दगड ( zero mile stone ) बांधण्यात आला. हा स्तंभ तयार करण्यात आल्या नंतर १९०७ पासून १९४७ पर्यंत या शून्य मैल स्तंभापासूनच देशातील शहरांचे अंतर मोजले जात असे. पुढे पाकिस्तानची निर्मीती झाल्यानंतर जबलपुरजवळ भारताचा नवा मध्यबिंदू निश्चित करण्यात आला.

जी.टी.एस दगड ( GTS stone Nagpur ).

शून्य मैलाच्या शेजारीच असलेला जी.टी.एस दगड हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. देश चालवण्यासाठी महसूल गोळा करणे आवश्यक असते. त्यामुळे तो गोळा करण्यासाठी एखादी सुरळीत यंत्रणा निर्माण व्हावी आणि स्थळ दाखवणारे नकाशे अचूक सर्वेक्षण करून बनवण्याच्या मुख्य उद्देशाने जी.टी.एस.हा प्रकल्प ( GTS stone Nagpur ) राबविण्यास १९ व्या शतकाच्या प्रारंभीच सुरुवात झाली होती. कालांतराने इस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश राजवटीत याचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले. सध्या नागपुरात (Nagpur) झिरे माईल्सच्या शेजारी असलेल्या जी.टी.एस या दगडावरही त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची फुटामध्ये १०२०.१७१ अशी कोरण्यात आली आहे. आपल्या साम्राच्याच्या सीमा निश्चित करणे आणि त्यातून आपले राज्य बळकट करणे हा जरी ब्रिटिशांचा या सर्वेक्षणामागे उद्देश असला तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांनी एव्हरेस्ट, कांचनगंगा, के.टू यांसारख्या शिखरांची उंची निश्चित केली होती.

Nagpur Zero Mile Stone

स्वतंत्र भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू कोठे आहे ?

नागपुर (Nagpur) येथील शून्य मैलाचा दगड हा ब्रिटीशांनी अविभाजित भारताचा केंद्रबिंदू म्हणून वैज्ञानिक पद्धतीने मोजला होता. परंतु १९४७ ला देश स्वतंत्र झाला आधी पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशची निर्मीती होऊन देशाचे विभाजन झाले तेव्हा भारताचा केंद्रबिंदू पुन्हा नव्याने बनविण्याची गरज निर्माण झाली आणि १९८७ मध्ये सर्वेक्षणकर्त्यांनी शोधलेला नवीन केंद्र बिंदू मध्य प्रदेशातील सिहोरा जवळील करौंडी नावाच्या गावात मध्यभागी मिळाला. ही जागा जंगलाच्या आत होती आणि देशाचा केंद्रबिंदू ठरणारी जागा काही शेतकऱ्यांची होती. ती जागा त्यांच्याकडून विकत घेऊन तिथे आधुनिक भारताचे अचूक भौगोलिक केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे! जबलपूरहून सिहोरा व नंतर करौंडीकडे जाता येते. हे बरेच दुर्गम ठिकाण आहे. मात्र स्वतंत्र भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू नागपुर नसले तरी नागपुरच्या शून्य मैल दगड आणि स्तंभाचे महत्त्व तसुभरही कमी होत नाही.

Nagpur Zero Mile Stone

नागपूर शहर आता देशाचा मध्यवर्ती भाग आहे की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो मात्र त्याचे ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व नाकारता येणार नाही. वारसास्थळाचे महत्त्व या ठिकाणाला मिळायला हवे असे येथे भेट दिल्यावर वाटत रहाते. या स्तंभाविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली पाहिजे. विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती सुसंगत सोपी करून सांगण्यात यायला हवी.त्यासाठी याठिकाणी या जागेचा इतिहास, त्याच्या निर्मीतीची माहिती रंजक फलक स्वरूपात येथे लावली जावी. असे केले तर सामान्यांपर्यंत इतकी रंजक माहिती पोहोचण्यासाठी त्याची मदत होणार आहे.

खरंतर नागपुर शहर फिरण्यासाठी बरेच सुटसुटित आहे. येथील दीक्षा भूमी, फुटाळा तलाव, रामण विज्ञान संग्रहालय अशी अनेक पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत आणि तिथे भेट देण्यासाठी कोणतेही जास्त कष्ट आपल्याला पडत नाहीत. मात्र या शून्य मैलाच्या दगडाला भेट देण्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागते. वर्धा रस्त्यावरील चौकापर्यंततर आपण कोणत्याही वाहनाने पोहोचतो, परंतु चारही बाजूने सिग्नल असणाऱ्या या चौकात इतक्या महत्त्वाच्या वारसा स्थळाकडे जाण्यासाठी कोणतेही विशेष मार्गदर्शक फलक दिसत नाहीत. रस्त्याच्या अगदी लागून हा दगड आणि स्तंभ उभा आहे. जर आपण आधी याचा कोणता फोटो पाहिलेला नसेल तर तो दगड शोधताना नक्कीच गोंधळ उडतो. अशा या दुर्लक्षित मात्र महत्त्वपुर्ण वारसास्थळाविषयीची माहिती खुप रंजक आहे.

Author ज्योती भालेराव .

3 thoughts on “Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey (Established – 1907)”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!