Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन होत आहे. पालखी स्वागतासाठी मंदिर परिसरात रोषणाई, मंडप, दर्शन व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या निवास आणि भोजनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
पुणे : 09-07-2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज (दिनांक 9 ) पुण्यात (Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi) आगमन होत आहे.या पार्श्वभूमीवर पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे स्वागताची जय्यत तयारी कऱण्यात आली आहे. मंदिर परिसराची रंगोरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई, मंडप उभारणी, दर्शन रांगांची व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या निवास व भोजनाची तयारी पूर्ण झाली आहे.
आळंदी आणि देहू येथून लाखो वारकऱ्यांसह विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या दोन्ही संतांच्या पालख्या पुण्यात पहिल्या मुक्कामासाठी दाखल होतात. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पुण्यात दाखल होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांना पालखीचे मुखदर्शन सहज घेता यावे यासाठी पालखी चौक आणि हमाल तालीम चौक येथे डिजिटल स्क्रिन बसविण्यात येत आहेत. तसेच गर्दीचे नियोजन, दर्शन रांगा आणि वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी दिले.
मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी (Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi)
नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे पूर्ण झाली आहेत. मंदिराबाहेर भव्य मंडप उभारण्यात आला असून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेतर्फे पालखी मार्गावर स्वागत मंडप उभारण्यात आले असून विविध शिल्पांच्या माध्यमातून परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
पालखी विठोबा मंदिर परिसरातही महापालिकेच्या सहकार्याने रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यंदाच्या वारीमध्ये ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ संदेश देण्यात येणार असून स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे.
यंदा पालखी विठोबा मंदिराचा परिसर अधिक प्रशस्त (Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi)
पालखी विठोबा मंदिरात दरवर्षी जागेअभावी भाविकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी अन्यत्र हलविण्याची चर्चा सुरू होती. मात्र यंदा मंदिराशेजारील खासगी जागा शासनाच्या सहाय्याने मंदिर परिसरात समाविष्ट करण्यात आली आहे.